रविवार, २३ एप्रिल, २०२३

उत्थान...!


जेत्यांचा इतिहास घडविण्याच्या नादात
जगाचा भूगोल बदलतो राहतो सतत
आणि घटना-पुनर्लेखनाच्या कर्मठपणात
परंपरेची जळमटं लटकत राहतात...

गैरसोयीच्या गोष्टींपासून पळ काढण्यासाठी 
नामांतराने विषयांतर साधत असेल,
पण म्हणून लोकसंख्येच्या विस्फोटाने  
लोकशाही समृद्ध होत नसते...

तरीही, वंशसातत्य या महत्वाच्या विषयात,
 शेजाऱ्याला मागे टाकून आपण पहिला नंबर काढला
आणि एकादशीच्या घरी शिवरात्र बोलावली
या सांस्कृतिक उत्थानाचे झेंडे मिरवू नये... 

...असे काही नाही !

रविवार, १६ एप्रिल, २०२३

#प्रिये

“As you write more and more personal 
becomes more and more universal.”

वपुंच्या 'पार्टनर' मधील या वाक्याची 'गुड रीड्स'ने 'क्वोटेबल क्वोट्स'मध्ये नोंद घ्यावी याचे जेव्हढे अप्रूप तेवढाच आनंद आणि अभिमान ! पण आज मुद्दा तो नाही. आज मुद्दा आहे व्यक्त होण्याचा.

नागराज म्हणतो,
'माझ्या हातात नसती लेखणी
तर असती छिन्नी, सतार, बासरी 
किंवा कुंचला... 
मी कशानेही उपसत राहीलो असतो
हा अतोनात कोलाहल मनातला...' 

याच धर्तीवर आज म्हणावसं वाटतंय, 
'माझ्या उरावर नसती देणी 
तर असती निरूपणं, स्फुटं, ललितं  
किंवा कविता...
मी निवांत व्यक्त होत राहिला असतो
मांडायला खळबळ जनमनातली...'

जगरहाटी आणि दुनियादारीच्या धबडग्यात हल्ली हे थोडे बाजूला पडतंय, मान्य. 
पण प्रत्येकवेळी आपलीच प्रतिभा पणाला लावून संवेदना मूर्त करायला हवी असा काही नियम नाही. आणि सॅटिसफॅक्शन नसतांना करत रहायला तो काही जॉब ही नाही. (बाय द वे, 'जॉब सॅटिसफॅक्शन' हे पण एक ऑक्सिमोरॉन असल्याचा शोध नव्यानेच लागला, ती ही एक उपरती !)

आपलीच भावना कुणी अधिक प्रभावीपणे व्यक्त केली आणि आपण तिच्याशी सबाह्याभ्यंतरी तादाम्य पावू शकत असू, तर अशा प्रतिभाविष्काराचे यथोचित श्रेय-नामोल्लेखासह प्रयोजन का असू नये...?

कवी नारायण पुरी यांची २०१७ मध्ये, #प्रिये ने सोशल मीडियावर गाजलेली 'प्रेमाचा जांगडगुत्ता' ही आत्यंतिक प्रामाणिक तथा मनस्वी कळकळ, काही नवीन संदर्भांसह ताज्या रूपात... 

शनिवार, १ एप्रिल, २०२३

अमर...?


'ही कविता मरत नाही' - या २२ जून २०२२ च्या पोस्टमध्ये विंदांनी त्यांच्या 'सब घोडे बारा टक्के...' या कवितेच्या सादरीकरणात त्या कवितेतील परिस्थती काही केल्या बदलत नसल्याने ती कविता मरत नसल्याची खंत व्यक्त केली होती. कवितेच्या भलत्याच अमरत्वाचे दु:ख विंदांनी मांडले.

कवी हा मर्त्य मानवच असल्याने त्याला मृत्यू अटळ आहे. पण विचार, फिलॉसॉफी आणि इंटेंशन कालातीत असल्याने ते व्यक्तीच्या मृत्यूनंतरही भूत बनून मानगुटीवर बसू शकतात. मग  आयुष्यभर सचोटीने जगलेल्या आणि व्यवस्थेत सुधार करण्याची जिद्द न सोडणाऱ्या 'आझाद'चा असा 'भूतनाथ' होतो आणि त्याला, '...जिसके पास डेसिग्नेशन है उसके पास इंटेंशन नहीं और जिसके पास सजेशन है उसके पास पोझिशन नहीं...' याचा विषाद वाटतो.

तथापि, मेल्यावरही समाजसेवेचा वसा सोडू न शकणाऱ्या अशा सजग नागरिकाची संभावना, 'सद्रक्षणाय खलनिग्रहणाय' हे ब्रीद मिरवणारा व्यवस्थेचा अग्रीम प्रतिनिधी, "xxxxx याचं काही होत नाही, इसको मरनेके बादभी अकल नही आयी...!" अशी करतो... 

हेच अंतिम (आणि कालातीत ?) सत्य, बाकी जगत मिथ्या !

चालायचंच...?