रविवार, ३० मे, २०२१

गॉसिप...!


एके दिवशी सॉक्रेटीसचा एक अनुयायी तावातावाने सॉक्रेटीसपाशी आला. त्याला मुळीच धीर धरवत नव्हता. त्याच्या चेहऱ्यावरून तो खूपच अस्वस्थ आणि उत्तेजित असल्याचे अगदी स्पष्ट दिसत होते. तो सॉक्रेटीसला म्हणाला, ‘महाराज, मी आत्ता आपल्याबद्दल असे काही ऐकले आहे की ते मला आपल्याला ताबडतोब सांगायलाच हवे...'

‘अरे वा, असे आहे का? बघू या तरी...’ नेहमीच्या शांतपणे सॉक्रेटीस उत्तरला.
याला सॉक्रेटीसची अनुमती समजून उतावळा अनुयायी बोलायला लागला,
‘मी आत्ता अमुकला बोलतांना ऐकलं...’
‘हं, हं, थांब जरा. हे बघ कुणीही मला काही सांगू म्हटले तर त्याला माझ्या तीन चाचण्यांवर खरे उतरावे लागते. ही माझी तीन-पदरी चाळणी आहेस म्हणालास तरी चालेल.’
‘महाराज, मी इथे तुम्हाला काही महत्वाचं सांगू पहातोय अन तुम्ही हे चाळण्याचं काय काढलंत?’

‘कसं आहे ना मित्रा, दुसऱ्याबद्दल तिसऱ्याने सांगितलेली गोष्ट चौथ्याला रंगवून सांगणे हा मनुष्य स्वभाव आहे, त्यात आश्चर्य वाटण्यासारखे काही नाही. पण आपण काय ऐकावे आणि कशाकडे दुर्लक्ष करावे हा अधिकार ज्याचा त्याच्याकडे सुरक्षित आहेच की... मी त्याचा तंतोतंत वापर करतो एवढचं !’

‘बरं, बरं... सांगा तरी काय चाळण्या आहेत तुमच्या?’ अनुयायी नाराजीने म्हणाला. त्याच्या उत्साहावर पाणी तर पडलेच होते पण जे ऐकले ते सांगण्याची उर्मी कमी झाली नव्हती.      

‘पहिली चाळणी, जी गोष्ट तू मला सागणार आहेस ती पूर्णत: सत्य असल्याची तुला खात्री आहे...?’
‘तसं मला खात्रीपूर्वक कसं सांगता येईल, ती गोष्ट मला दुसऱ्या कुणी सांगितली आहे...’
‘हरकत नाही, बरं ती गोष्ट माझ्याबद्दलची एखादी चांगली गोष्ट आहे की वाईट आहे...?’
‘खरं तर वाईटच आहे, म्हणून तर मला राग आला आणि ताबडतोब तुम्हाला सांगावीशी वाटली...’
‘असं होय, किती माया करतोस माझ्यावर ! पण तरी एक शेवटची चाचणी तरी पास होते का बघू या...’
‘तेवढी पास झाली तर सांगू द्याल ना मला...?’
‘अवश्य ! आता मला सांग, तू मला जे सांगू म्हणतोयस त्याने माझा किंवा किमान तुझा तरी काही फायदा होणार आहे ? त्या गोष्टीचा मला, तुला किंवा खरं तर कुणालाही काही उपयोग आहे...?
खजील झालेला, हिरमुलेला अनुयायी मान खाली घालून म्हणाला,
‘नाही, महाराज मला नाही वाटत त्या गोष्टीचा कुणालाही, विशेषत: तुम्हाला, काहीही उपयोग होईल...!’
 
‘मित्रा, जी गोष्ट मुळात सत्य आहे की नाही माहित नाही, जी चांगली देखील नाही आणि जिचा कुणालाच काही उपयोग होण्याची सुतराम शक्यता नाही अशी गोष्ट तुला सांगावीशीच का वाटते...? आणि त्यासाठी एवढं अधीर होण्याचं, उत्तेजित होण्याचं काय कारण...? हीच उर्जा अधिक चांगल्या विधायक कामी नाही वापरता येणार...?’

-------------------------------------- 

मुळात ‘गॉसिप’ हे माणसाचं अत्यंत आदिम, सर्वव्यापी आणि मोफत मनोरंजनाचं साधन आहे. अनुपस्थित असलेल्या आपल्या ‘स्नेही’जनांबद्दल अनुचित बोलणे, त्यांच्या सवयी, धारणा, श्रद्धा यांची टिंगल उडविणे हा एक हलक्या प्रतीच्या करमणुकीचा सुलभ (विशेषणाचे निवड जाणीवपूर्वक केलेली आहे !) मार्ग आहे.

त्यातून आजच्या सोशल मिडीयाच्या काळात या गॉसिप प्रकारांना विविधरंगी आणि बहुढंगी व्यासपीठं उपलब्ध झाल्याने सगळीकडे नुसता गदारोळ माजला आहे आणि एकमेकाची उणीदुणी काढण्याची, एकमेकाबद्दल गरळ ओकण्याची जणू काही स्पर्धाच लागली आहे. या पार्श्वभूमीवर सॉक्रेटीसची ही शहाणीव केवळ मार्गदर्शक नाही तर अनुकरणीय ठरावी म्हणून ही उठाठेव !

‘आला मेसेज की ढकल पुढे...’ या सवयीला जरा मुरड घालून, सॉक्रेटीसच्या वरील तीन चाळण्या लावून जे काही गाळीव उरेल(?) तेवढ्याचीच ढकलाढकल करण्याचे आणि सर्वांना सोसल तेवढच सोशल करण्याचे पथ्य पाळले तरी, समाजमाध्यमांच्या नियमन करणाऱ्या व्यवस्थेवरील ताण बऱ्यापैकी कमी होईल...
 
...आणि हो, ‘मना’चा ब्रेक उत्तम ब्रेक’ या तत्वावर आधारित 'सेल्फ-सेन्सॉरशीप इज द बेस्ट सेन्सॉरशीप' हेही लक्षात असू द्यावे म्हणजे अभ्यासोन विवेकाने प्रकटल्यास कुठल्याच कारवाईची, कुठल्याही समाजमाध्यमावर बंदी केली जाण्याची वेळ येणार नाही !

शुभम भवतु !

रविवार, २३ मे, २०२१

या चिमण्यांनो...


एक छोटीशी चिमणी आपल्याच नादात चिवचिवत भुर्रकन इथून तिथे उडत होती. तेवढ्यात एक भलामोठा भेसूर काळा पक्षी तिला ओलांडून पुढे झेपावला आणि मागे वळून चिमणीकडे बघत स्वतःशीच पुटपुटला, 'हे कसे शक्य आहे...?'

त्याचा अवतार, अविर्भाव आणि उद्गाराने भ्यायलेली चिमणी आणखी जोरात उडू लागली. काहीच वेळात पुन्हा तो काळा पक्षी तिच्या मागून येऊन तिला ओलांडून जातांना पुन्हा पुटपुटला, 'हे कसे शक्य आहे...?'

आता प्राणभयाने थरथरणारी चिमणी आपल्या इवल्याशा पंखात सगळी शक्ती एकवटून सर्व ताकदीनिशी उडू लागली. पुन्हा काहीच वेळात काळा पक्षी तिच्याच मागावर असल्यासारखा झेपावला आणि जाता जाता म्हणाला, 'हे कसे शक्य आहे...?'

भीतीने अर्धमेली झालेली चिमणी नकळत इतक्या वर गेली की साऱ्या छोट्या पक्षांचे टप्पे ओलांडून थेट गरुडाच्या अवकाशात दाखल झाली. गगनभरारी मारत सावजाचा शोध घेणारा गरुड आपल्या बाजूला इवल्याशा चिऊताईला बघून हादरला !

'चिऊताई, तू इथे एवढ्या वर काय करतेस...?'
'बर झालं गरुडदादा तू भेटलास. अरे, एक भलामोठा काळा पक्षी केव्हापासून माझ्या मागे लागलाय आणि, 'हे कसे शक्य आहे, हे कसे शक्य आहे...' असे म्हणून मला घाबरवतोय...'
'काळजी करु नकोस, मी तुला लांब त्या उंच डोंगरकपारीत नेऊन ठेवतो. तू तिथे विश्रांती घे, तोपर्यंत तो पक्षीही तू सापडत नाहीस म्हणून कंटाळून निघून जाईल. मग तू सावकाश खाली उतर आणि जा आपल्या घरट्यात परत. चल, बस माझ्या पाठीवर, मी आत्ता पोहोचवतो तुला उंच डोंगरात...'

चिमणीला खूपच हायसे वाटले आणि सुरक्षित होण्याच्या कल्पनेने ती पटकन् गरुडाच्या पाठीवर बसली. गरुड ढगांच्या वर आकाशात झेपावला आणि खरोखरच अगदी काही क्षणात उंच डोंगर कपारीत पोहचला. तिथे सारे कसे शांत शांत आहे हे पाहून चिऊताईला हुरूप आला. 

'गरुडदादा, तुझे आभार कसे मानावे तेच कळत नाही, आज तू नसतास तर मी काही वाचले नसते बघ !' 'काय चिऊताई तू पण, आपण पंखवाले पक्षी एकमेकांच्या उपयोगी नाही पडलो तर काय शेपटीवाले प्राणी येतील आपल्या मदतीला...? काहीतरीच तुझं ! बरं, आता इथे थोडावेळ विश्रांती घे, फळं खा, पाणी पी आणि ताजीतवानी होऊन सावकाश खाली उतर, मला निघायला हवं...'

चिमणीच्या निरोप घेऊन गरुड खाली झेपावला आणि पुन्हा सावज शोधण्याच्या कामात गर्क झाला. असाच काही वेळ गेला आणि उंच डोंगरावरच्या आपल्या गरुडासनाकडे परतत असताना वाटेत गरुडाला तो काळा पक्षी भेटला.

'अरे, तू इथे काय करतोयस ? पुन्हा त्या बिचाऱ्या चिमणीला उगाच घाबरवू नकोस !' गरुड म्हणाला.
'पक्षीराज, मी स्वतःच्या इच्छेने काही करत नसतो, मी फक्त आज्ञापालन करतो!' काळा पक्षी उत्तरला.
'म्हणजे ? मी समजलो नाही !' गरुडाने विस्मयाने विचारले.
'अहो, पक्षीराज मी काळदूत आहे, माझा मालक काळ जेव्हा सांगेल तेव्हा, जिथे सांगेल तिथे आणि ज्यांचे सांगेल त्यांचे प्राण हरण करणे हेच माझे काम !'
अजूनही निटसा उलगडा न झालेला गरुडाने विचारले, 'पण मग त्यासाठी चिऊताईला घाबरवायची काय गरज...?'

'अहो असं काय करताय ? त्या चिमणीचाच जीव घ्यायचा आदेश होता पण ते काम मला उंच डोंगरकपारीत करण्याच्या सूचना होत्या. वेळ भरत चालली होती आणि इतक्या कमी वेळात ही एवढीशी चिमणी एवढ्या उंच डोंगरावरच्या कपारीत पोहचणार कशी हेच मला समजत नव्हतं. काळाची वेळ आणि ठिकाण चुकणं कदापि शक्य नाही म्हणून मी म्हणत होतो, 'हे कसे शक्य आहे...!' असो, आपल्या मदतीने माझी कामगिरी फत्ते झाली त्याबद्दल आपले मनापसून आभार...!'

-------------------------------------------------------------------

या पारंपारिक जातककथेचे बाळबोध तात्पर्य 'काळाचा महिमा गौरविणारे विधिलिखित' असे काहीसे असावे. तथापि आजच्या संदर्भात हे तात्पर्य आपण 'भित्यापाठी ब्रह्मराक्षस' असे समजायला हरकत नाही. चिऊताई हे आपल्यासारख्या सामान्य प्रजेचे रूपक असेल तर पक्षीराज गरुड ही 'व्यवस्था' अर्थात 'सिस्टीम' मानायला हरकत नाही, जिचा एक पंख शासन, दुसरा प्रशासन आणि चोच अर्थात मुखपत्र म्हणजे मिडिया आहे. काळ घिरट्या मारतो आहेच आणि अजाणतेपणी ही व्यवस्थाच चिऊताईची वेळ भरण्यास मदत करून काळदूताची सोय करतेय... 

तेव्हा, सुमारे ९०% विकार हे मानसिक असतात, दुर्बल मन शरीराची प्रतिकारशक्ती (इम्युनिटी) कमी करते आणि अशक्त शरीरसंस्था किटाणू-विषाणूंच्या सहज शिकार होतात... एवढी त्रिसूत्री लक्षात ठेवून सर्व खबरदारी नेमस्तपणे घेतली तर गरुडाच्या अवकाशात पोहचण्याची वेळच येणार नाही...

शुभम भवतु !
----------------------------------------------------------

बाय द वे... बरेच वर्ष झाले, टेरेसवर पसरलेले दाणे टिपायला आणि भांड्यातले पाणी प्यायला सकाळी चिवचिवाट करणाऱ्या चिमण्या अलीकडे दिसत नाहीत. कुठे गेल्यात कोण जाणे... की वयोमानानुसार आपलीच दृष्टी अधू झालीय...?

शनिवार, २२ मे, २०२१

वि-भक्त...!

https://ibpf.org/seclusion-being-on-the-other-side-of-the-door/

आता मी माझा नाही
पण म्हणून तुमचा आहे असेही नाही

दिंडीत नाचलो म्हणून वारकरी झालो नाही
पिंडीत साचलो म्हणून धारकरी झालो नाही
याच्या विनोदाला हसतो म्हणून उजवा होत नाही
त्याच्या मांडणीला फसतो म्हणून डावाही होत नाही

माझ्या असण्याचे वाटप लशीइतके स्वस्त नाही आणि
माझे नसणे पोकळी निर्माण करण्याएवढे ध्वस्त नाही
मला गृहीत धरून चालणे ही असू शकेल त्यांची भूक
किंवा निर्णयाच्या क्षणी अवसानघात करेल अशी चूक...?

कळपांना वळण लावून थेट करता येते सरळ
बुद्धिभेद करून ओकायला लावता येते गरळ
सारेच प्राणी-मात्र आज्ञा मानतीलच असे नाही
काही मूर्खांना वाटते असावे आपले मत काही

तुमच्यात बसतो-हसतो म्हणून माझा कणा मोडत नाही
गारूड्याचे दुध प्यायला म्हणून नाग फणा सोडत नाही
रचणाऱ्यांना जेव्हा जडेल अपौरुषाची व्याधी
उतावळा अभिमन्यूच भेदेल चक्रव्यूह कधी

हल्ली माझ्यात मी नसेनही
पण म्हणून मी तुमच्यातलाही होत नाही...!

रविवार, १६ मे, २०२१

अग अग लशी...

चित्र सौजन्य: स्त्रोत

दुर्लभं भारते जन्म मानुष्यं तत्र दुर्लभम् II

‘मुळात या भारतवर्षात जन्म मिळणे हेच दुरापास्त आणि त्यात मनुष्य जन्म मिळणे हे तर अहो भाग्यम्!’ अशा अर्थाचा एक श्लोक वेदांमध्ये असल्याचे स्मरते. अगदी परवा परवापर्यन्त आमची या गृहितकावर गाढ श्रद्धा होती... ७ वर्षांपूर्वी आम्हीच बघितलेल्या (कर्म आमचं !) कुणी दाखविलेल्या नव्हे (जैसे ज्याचे कर्म...?) स्वप्नावर होती तेवढीच... तंतोतंत ! आणि आमच्यासारख्या दुर्लभ भारतीय मनाची स्वप्ने काय, ‘उद्या लस मिळेल..!’ अशी अप्पलपोटी संकुचित मध्यमवर्गीय असेल म्हणता... नाव नको ! जरा एक नजर टाका आमच्या स्वप्नसूचीवर...

‘आपण आपल्याकडील थोर ज्ञानसंपदेचा, नैसर्गिक साधनसंपत्तीचा आणि होतकरू तरुणाईचा जगाला फायदा करून देणार... सारे जग, जे आज आपल्याकडे ‘एक निरंतर वाढणारी अधाशी बाजारपेठ’ (बघा: ‘अपने ॲमेझॉनपे...? अमेझिंग !') म्हणून बघतेय ते लवकरच आपल्या अतुलनीय ज्ञानाची, अद्भुत कला-कौशलयांची आणि अथक उत्पादनक्षमतेची जाणीव झाल्याने आपल्याकडे केवळ ग्राहक वा वितरक म्हणून नाही तर सृजनशील निर्माता, कुशल संघटक तथा स्वयंपूर्ण उत्पादक म्हणून आदराने बघणार... नव्या रचनेतील नव्या बाजारपेठांच्या नव्या व्यवस्था आपण, ‘कर लो दुनिया मुठ्ठीमें...’ म्हणत सहज काबीज करणार... आणि ‘हे विश्व माझेची घर !’ या उदात्त, उन्नत भावनेने साऱ्या जगाचे, उपकारकर्ते पोशिंदे होणार... अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा ठेका केवळ प्रगत राष्ट्रांकडेच का असावा, आपण आपल्या देशातही अतिप्रगत तंत्रज्ञानाचे चित्तचक्षुचमत्कारिक प्रयोग लावून साऱ्यांचे मनोरंजन करणार... शिवाय, या सगळ्या भौतिक साधनांच्या पलीकडे, जे आपले युएसपी आहे, ते जीवन तत्वज्ञान आणि अध्यात्मदर्शन यांच्या साधनेतून, शारीर गोष्टीत अडकलेल्या अजाण, विषयासक्त, मर्त्य मानवाला त्याचे बोट धरून विकारातून विचाराकडे नेणार आणि निखळ आनंदाची अप्राप्य अशी प्रचिती देणार... सारे सारे सच्चिदानंद करून टाकणार आणि आपल्यावर पडलेल्या विश्वकल्याणाच्या जबाबदारीमुळे स्वाभाविकपणे विश्वगुरु होणार…!’

पण हाय रे दैवा ! मुल्ला नसीरउद्दीन अधिक शेखचिल्ली गुणिले मुंगेरीलाल अशा समिकरणाच्या साखरझोपेतल्या हसीन सपन्यांवर कुणीतरी घागर उताणी करून स्वप्नभंग करावा आणि रिॲलीटी चेक अर्थात भकास वास्तवाचे प्रच्छन्न दर्शन घडावे तसे आम्ही दाणकन् जमिनीवर आदळलो आणि पार्श्वभागाची कळ मस्तीष्कापर्यंत पोहचल्याने, करोंना घालवायला थाळ्या झंकारल्या तसे, आपादमस्तक झंकारलो ! ‘बुलेट ट्रेन’, ‘हायपरलूप’ने क्षणार्धात इथून तिथे पोहचण्याची आणि ‘५ जी’ने इफेक्टिव्हली कम्युनिकेट करण्याची स्वप्ने बघता बघता आम्ही ‘उघडा डोळे, बघा नीट’ हा उपदेश शिरसावंद्य मानून भोवताली नजर फिरवली तर आम्ही उभे आहोत रांगेत आणि ती रांग, गोगलगायसुद्धा युसेन बोल्ट ठरावी अशा वेगाने सरपटते आहे म्हणतांना जीवनाच्या वास्तव-दर्शनाने आमची (तळपत्या उन्हात) लाही लाही होऊ लागली !

बरे, दुर्लभ भारतीय असण्याचे बाळकडू आम्हाला चांगलेच पचले असल्याचे गुटगुटीत बालक स्पर्धेत उत्तेजनार्थ बक्षीस मिळवून सिद्ध केलेले आम्ही, ‘रांग दिसली की नंबर लावायचा, ती कशासाठी आहे हे कळेपर्यंत उशीर होतो...’ या आजवरच्या संचित व्यावहारिक ज्ञानाने या कामी अजिबात हयगय करीत नाही. दोन-तीन वेळा भलत्याच रांगेत लागल्याने थोडा कालापव्यवय झाला आणि सामाजिक प्रतिष्ठा(?) धोक्यात येण्याची शक्यता निर्माण झाली पण एवढयातेवढ्या घटनांनी आमचा वर्षानुवर्षीच्या शहाणिवेतून आलेला दृढनिश्चय ढळतो की काय ? तर आम्ही नेट लावून (फोनवर) नेमस्तपणे रांगेत उभे राहिलो आणि आपल्या तोंडावर खिडकी बंद होण्याची प्रतीक्षा करू लागलो. हो, साऱ्याच गोष्टी नशिबाने मिळाव्या लागतात, ‘हम जहां खडे होते है लाईन वही से शुरू होती है...!’ हा कॉन्फीडन्स येण्यासाठी जी उंची गाठावी लागते ती, कुठल्याही क्षेत्रात सोडा, नैसर्गिक वाढीनेसुद्धा गाठू न शकल्याने, आमच्या नशिबी, ‘हमारा नंबर जब आता है, खिडकी तब ही बंद होती है !’ एवढेच विदारक सत्य…

तर साक्षात्कार झाला तो असा की सांप्रत काळी महामारी पसरवणारा जो काही विषाणू कार्यरत झाला आहे म्हणे, त्याला अटकाव करण्यासाठी जी काही लस मिळणार आहे म्हणे, तिच्या नावनोंदणीसाठी भल्या पहाटे जे काय टोकन मिळणार आहे म्हणे, ते हस्तगत करण्यासाठी ही रांग आहे... आपलं, होती म्हणे, जी, आपापल्या प्रभागातील नागरिकांच्या सेवेचे असिधारा व्रत घेतलेल्या टोकन वितरकाच्या हस्तकांनी सारे (अवघे ५०... अबब !) टोकन हस्तगत केल्याने अप्रस्तुत ठरल्याने आता लांबवली न जाता पांगवली जात आहे... म्हणे !

आजचे आपले ‘आत्मनिर्भर’ असण्याचे कर्तव्य बजावल्याने कृतकृत्य होत्साता आम्ही, ‘हाच खेळ उद्या पुन्हा...’ या, दुर्दशन वाहिन्यांवर पोसलेल्या आमच्या पिंडाला समजावत आणि धीर देत स्वत:ला पुन्हा एकदा २४ तास स्थानबद्ध करून घेण्यासाठी स्वगृही परतलो. वेळ घालविण्यासाठी आणि मनोरंजनासाठी बातम्या बघाव्या म्हणून टीव्ही लावला तर पुण्याचा लस निर्माता साहेबाकडे जाऊन राहिल्याची बातमी. अलीकडे कुणीही लंडनला (पळून ?) गेलाय म्हटलं की आम्हाला आमच्या बँकेतल्या ठेवी आठवतात. हो, असेना का त्या हजारात, आमच्यासाठी त्या लंडनला पळून जाणाऱ्यांच्या हजारो कोटींइतक्याच मौल्यवान आहेत. आणि आमचा हा खारीचा वाटा त्यांच्या कोटीच्या कोटी उड्डाणांची भरपाई करायच्या कामी येणारच नाही असेही नाही... कुणी सांगावे...?

टीव्हीवरच्या बातम्यांमध्ये ‘टीआरपी’मुळे काही राम उरला नाही असे म्हणत आम्ही आमचा मोर्चा वर्तमानपत्रांकडे वळवला (हो, आयुष्यात आम्हाला एवढा एकच मोर्चा काढता आणि वळवताही येतो, उगाच शेतकऱ्यांचे, उपेक्षितांचे नेतृत्व करायच्या गमजा कशाला मारा ?) तर वर्तमानपत्रात मती गुंग करणारी आकडेवारी ! फक्त २५ चा 'कोटा' करूनही आपल्या जवळच्या(?) नातेवाईकांची, झालंच तर आमच्या राहत्या सोसायटीची लोकसंख्या मोजतांना आम्ही चार वेळा चुकतो तिथे आपल्या शहराची, जिल्ह्याची, राज्याची, देशाची आणि जगाची लोकसंख्या आणि त्यातील टेस्टेड, निगेटिव्ह, पॉझिटिव्ह, होमक्वारंटाईन्ड, हॉस्पिटलाईज्ड, रिकव्हर्ड आणि डिसीज्ड असे सारे आकडे बघून आम्हालाच डिस-ईज व्हायला झाले !

परवा एका मित्राचा फोन आला, फारच काळजीत होता, आम्हाला वाटलं पॉझिटिव्ह झाला की काय ? काय दैवदुर्विलास आहे पहा, निगेटिव्ह असणं ही पॉझिटिव्ह न्यूज झालीय आणि पॉझिटिव्ह ‘निघालो’ तर ऊर्ध्व लागायची वेळ, याहून अधिक घोर कलियुग काय असणार ? गेल्या वर्षभरात – एक अदृश्य पण सर्वव्यापी (हे वर्णन पूर्वी ऐकल्यासारखे का वाटतेय?) विषाणू, त्याचे लगेचच जाणवणारे आणि दूरगामी परिणाम, त्याने माणसाच्या आयुष्यात केलेली अभूतपूर्व उलथापालथ, त्यावर आधारित अर्थकारण आणि त्यामुळे ओघानेच येणारे राजकारण – या इतका दुसरा कुठलाही विषय (खुद्द तो तथाकथित व्हायरस देखील) व्हायरल झाल्याचे आम्हाला स्मरत नाही ! सारे काही अनित्य असणाऱ्या या जगात (बघा: बुद्ध आणि विपश्चना), ‘पुरून उरणे’ म्हणजे काय याचा वस्तुपाठ ठरत चाललेला हा विषाणू आता, मोंघलांना संताजी-धनाजी दिसायचे तसा, जळी-स्थळी-काष्ठी-पाषाणी दिसू लागल्याने इतर क्षुल्लक गोष्टी जसे की – शिक्षण, रोजगार, कला-क्रीडा, मनोरंजन आणि जिचा विनाकारण स्तोम माजवून ठेवलेय ती लोकशाही (म्हणजे काय रे भाऊ?) – यांनी बॅकसीट घेतलीय की स्टँडिंग आहे तेच कळेनासे झालेय ! हे असे होते, विषय कुठलाही काढा, तो फिरून त्याच ठिकाणी येतो, श्वास घ्यायलाही फुरसत देत नाही... अर्थात ऑक्सीजन तरी कुठे शिल्लक आहे म्हणा...?

ते असो! मुद्दा... मित्राचा फोन... तर सकाळ-संध्याकाळ नित्यनेमाने संध्या करणारा नेमस्त मित्र म्हणाला,
‘तुला महितेय, पुण्याचा पॉझीटीव्हीटी रेट जास्त वाटला तरी रिकव्हरी रेट पण ॲव्हरेजपेक्षा लिटिल बीट हाय आहे आणि डेथरेट तर ग्लोबल ॲव्हरेजच्या कितीतरी खाली आहे, कम्पैरीझनमध्ये ऑलमोस्ट झिरो, यू नो !’
‘असणार तर, आपण पुणेकर आहोतच क्रिटीकली पॉझिटिव्ह... त्याशिवाय का पुण्याने होकारलं ते जगाने स्वीकारल अस म्हणतात !’
आम्ही त्याही परिस्थितीत क्षीण विनोद करून पाहिला (नाहीतरी विनोदबुद्धी शिवाय आता हाती काय उरलंय ? अर्थात काही लोकांच्या नाकाचा वास आणि तोंडाची चव जाण्याआधी डोक्याचा सेन्स ऑफ ह्युमर गेल्याचेही अनुभव आहेत म्हणा) पण तोही पडला... मित्र नव्हे, आमचा क्षीण विनोद ! सांख्यिकीवाला मित्र भडकलाच...
‘तुझ्या या अशा कशावरही बाष्कळ विनोद करण्यामुळे तुझी प्रगती होत नाही. आपल्या अवतीभोवती काय चाललय याचा जरा बारकाईने अभ्यास करायला शिका आणि आपल्या वयाला शोभेलसे वागा... आयुष्य जरा सिरियसली घ्या, यू हॅव नो मॅच्युरिटी ॲट ऑल, रबीश ! जग कुठे चाललयं बघा...’
‘मसणात...’ आम्ही मनातल्या मनात हजरजबाबीपणा करून घेतला, हो, पुन्हा कोण लेक्चर ऐकणार ? तरी बरं थोड्या वेळाने आम्हाला लाडीगोडी लावण्यासाठी हाच मित्र ‘गण्या आणि मास्तर’वाले जोक पाठवणार आणि ‘महाराष्ट्राची हस्यजत्रा’ किंवा ‘कॉमेडी बिमेडी’, अगदीच गेला बाजार ‘चला हवा येऊ द्या...’ (अक्षरश: ... दुसरा कुठलाही कार्यक्रम आपल्या नावाला इतका जागल्याचे आमच्या तरी पाहण्यात नाही !) यातील ‘दर्जेदार’ विनोदांच्या क्लिप्स आम्हाला धाडणार. त्यातल्या त्यात एमएचजे तरी ठीक, तिथे बाकी काही नाही तरी प्राजक्ताचा सडा पडतो... पण मुद्दा प्राजक्त फुलण्याचा किंवा खुलण्याचा नसून, ‘एवढी प्रखर बुद्धिमत्ता, जाज्वल्य पक्षनिष्ठा, निष्पक्ष विवेकविचार आणि उच्च अभिरुची जोपासणाऱ्या मित्राने आमच्या बाणेदार विनोदाला बाष्कळ म्हणावे का ?’ हा आहे.

खर तर मुद्दा तो ही नाही... मुद्दा एवढाच आहे की सार्वजनिक आरोग्य हा चर्चा करण्याचा, धंदा करण्याचा, राजकारण करण्याचा किंवा विनोद करण्याचा विषय आहे का ? या संदर्भात आपल्या सर्व सार्वजनिक व्यवस्था आणि लोकाभिमुख नियोजन यांचे जे पितळ उघडे पडले आहे तो हसून सोडून द्यायचा विषय आहे का ? मुळात या सर्व जगजाहीर नाचक्कीला जबाबदार कोण आणि का यावर चिंतन करून काही योजनाबद्ध धोरणे आखावी जेणे करून भविष्यात याची पुनरावृत्ति होणार नाही याची आपण खबरदारी आणि जबाबदारी घ्यायला नको ?

‘सॉरी, आमचं... रादर आपलं… चुकलंच जरा’ एवढी छोटीशी प्रामाणिक कबुली देऊन प्रायश्चित्त घ्यायला कुणीच पुढे येऊ नये ? साऱ्यांनी एकमेकांना ट्रोल करून आपण (ॲन्टी) सोशल (मीडिया) ॲनिमल आहोत हे सिद्ध करण्याचा चंगच बांधावा…? आम्ही बघितलेली स्वप्ने आभासी नाहीत, खोटी नाहीत. फक्त ते स्वप्नरंजन आपण डोळे मिटून व्यक्तिनिष्ठ अंधश्रद्धेने न करता, सतर्क जागेपणी, विचारनिष्ठ विवेकाने केल्यास त्यातील प्रत्येक स्वप्न हे केवळ संभाव्य नाही तर संभावित आहे हे सूज्ञ मनाला कळून येईल. मुद्दा एवढाच की ते वेदवचन पुराणोक्त ठरवायचे की शास्त्रोक्त हा निर्णय आपलाच, आपल्या सर्वांचा आहे... असावा !

‘अहो, लक्ष कुठेय तुमचं...? आजही लस संपलीय म्हणे, उद्या या म्हणताय. मी काय म्हणते, कोवैक्सीन चालणार असेल तर ताईला विचारून बघू का...?’

तोंडाला फेस आणणाऱ्या विषाणूची लस आणि तोंडाला पाणी सुटण्यास भाग पाडणारा हापूस (देवगड की रत्नागिरी ?) यात फरक न करणाऱ्या आणि कुठल्याही टेस्टच्या हवाली नसलेल्या पॉझीटीव्हीटीने सर्वकाळ भरून वाहणाऱ्या आपल्या गृहस्वामिनीकडे ऋणाईत लाभार्थ्याच्या कौतुकभरल्या स्नेहादराने पाहत आम्ही पुन्हा एकदा घरचा रस्ता धरला...

शनिवार, ८ मे, २०२१

शीर्षकगीत...!


भारताचा ५००० वर्षांचा इतिहास एका ग्रंथात सामाविणे हीच मुळात थोर कामगिरी. हे शिवधनुष्य पेलले पंडित जवाहरलाल नेहरू या स्वतंत्र भारताच्या पहिल्या पंतप्रधानांनी डिस्कव्हरी ऑफ इंडिया अशा अत्यंत सूचक व समर्पक ग्रंथाच्या रूपाने! कुठल्याही परंपरेचा बडेजाव किंवा सांस्कृतिक अभिनिवेषाशिवाय भारताचा भूतकाळ अत्यंत साक्षेपी पद्धतीने मांडण्याच्या आणि तो भारताच्या आजबरोबरच उद्याशीही जोडून देण्याच्या त्यांच्या या द्रष्टया प्रयत्नाला सोन्याचे कोंदण दिले ते श्याम बेनेगल या अत्यंत प्रतिभावंत, मर्मग्राही आणि विचक्षण दिग्दर्शकाने! आणि, आम्हाला आमच्या संस्कारक्षम वयात अतिशय प्रगल्भ अशा संस्कारांनी मूल्यशिक्षणाची जी पर्वणी लाभली तिच्यात एक अमूल्य भर पडली भारत एक खोज! उण्यापुऱ्या ५२ भागांच्या या मालिकेने आमचे शालेय जीवन तर समृद्ध केलेच पण आम्हाला आपल्या स्वत:च्या संपृक्त इतिहासाची जाणीव करून देवून आमचे जगण्याचे भान विस्तारले, आम्हाला शोध घेण्याची, स्वतंत्र, वेगळा विचार करण्याची सवयही लावली आणि गोडीही!

मुळातच संहितेपासून सादरीकरणापर्यंत अगदीच विलक्षण असलेल्या (आपादमस्तक निळ्या रंगात रंगविलेला कृष्ण – सलीम घोस, नसीरउद्दीन शाह यांनी साकारलेले शिवाजी महाराज आणि ओम पुरींनी जीवंत केलेला औरंगजेब, हे आजच्या भारतीय सामाजिक अवकाशाच्या संदर्भात निषेधार्य ठरणारच नाही असे नाही!) या प्रयोगातून आमची साहित्यिक-सांस्कृतिक वाढ तर झालीच पण त्यानिमित्ताने आम्हाला दृकश्राव्य माध्यमाची एक वेगळीच जाण विकसित व्हायला मदत झाली. अत्यंत मर्यादित साधन-सुविधांच्या आधारे, एका अभ्यासपूर्ण संहितेची विवेकी हाताळणी करून काहीतरी अभिजात घडवता येते याचा वस्तुपाठ आम्हाला ज्या अनेक उपक्रमातून मिळाला त्यात ‘भारत एक खोज’चे नाव नेहमीच अग्रभागी राहील. आणि हे नमनाला घडाभर तेल ज्यासाठी घातले ते ‘भारत एक खोज’चे शीर्षक गीत अर्थात टायटल सॉन्ग...

एवढ्या सशक्त रचनेला, तत्कालीन भारतीय मनाला पटेल, पचेल आणि रुचेल असे नाट्यरूपांतरण करणे हेच अत्यंत अद्भुत, उल्लेखनीय आणि वंदनीय कार्य, त्याला चार चाँद लागले ते त्याच्या शीर्षक गीताने. ब्रह्मांडच्या निर्मितीचा ऊहापोह करणाऱ्या, ऋग्वेदातील नासदीय सूक्ताच्या एका ऋचेची यासाठी योजना करण्याची कल्पना ज्याला सुचली त्या निर्मात्याच्या संवेदनशील प्रज्ञेची केवळ कल्पनाच करता येईल आणि तिला शतश: नमन करता येईल! सृष्टीचा कर्ता कोण याचा शोध घेण्याचा प्रयत्न करणारी ही ऋचा खऱ्या अर्थाने आदिम – आद्या, आत्मरूपा, स्वसंवेद्या आणि वेदप्रतिपाद्या ठरावी. शब्दांनीच गारुड करावे अशी ही रचना पण तिची मोहिनी अधिकच गर्द गहीरी केली ती तिला लाभलेल्या अक्षरश: स्वर्गीय स्वरसाजाने! ही किमया साधली ती अलौकिक प्रतिभेचा धनी असलेल्या अवलिया संगीतकार  वनराज भाटीया यांनी... काल वयाच्या ९३ व्या वर्षी या किमायागाराने या जगाचा निरोप घेतला आणि त्या निमित्ताने, लहानपणी एका वर्षात ५२ वेळा ऐकलेला आणि संगणकावर हवे ते बघण्याची, ऐकण्याची युक्ती सापडल्यावर आम्ही प्रभातगीतांची जी सूची बनवली त्यात मानाचे स्थान मिळवल्याने, गेली सुमारे १२-१५ वर्षे जवळपास रोज सकाळी कानावर पडणाऱ्या या फिलॉसॉफिकल लीरिक्स आणि फिनॉमिनल मेलडीनीने आठवणींचा आणि ‘मना’चाही तळ ढवळून काढला...

जे आमच्या भावनांशी तादात्म्य पावू शकतील त्यांच्यासाठी निखळ आनंदाचा पुन:प्रत्यय म्हणून आणि ज्यांना अद्याप या विषयाची ओळखही नाही त्यांच्यासाठी एका अमूल्य खजिन्याची चावी म्हणून, भारत एक खोज चे संपूर्ण शीर्षक गीत इथे देत आहे... त्याचा शब्द अन् शब्द आणि स्वर अन् स्वर रंध्री भरून घेणे हीच त्या अगाध प्रतिभेच्या संगीतकाराला स्वरांजली...                       

सृष्टी से पहले सत् नहीं था
असत् भी नहीं 
अन्तरिक्ष भी नहीं 
आकाश भी नहीं था 
छिपा था क्या
कहाँकिसने ढका था
उस पल तो अगम अतल जल भी कहाँ था?

रविवार, २ मे, २०२१

कानूस...?

साक्षर म्हणजे सुशिक्षित नव्हे. सुशिक्षित म्हणजे सज्ञान असे नाही. सज्ञान व्यक्ती सुसंस्कृत असेलच असे नाही आणि सुसंस्कृत म्हणजे सूज्ञ नव्हे. सूज्ञ असूनही संवेदनशील असणे जसे वेगळे तसेच संवेदनशील असून सजग असणे महत्वाचे. शिवाय केवळ सजग असणे पुरेसे नाही तर सक्रीय असणे अधिक श्रेयस्कर!

तद्वतच निरक्षर म्हणजे अडाणी नव्हे आणि अशिक्षित म्हणजे अनभिज्ञ किंवा अविवेकी नव्हे. याच कारणाने ‘सखाराम बाईंडर’ मधली चंद्राची भूमिका, ती साकारणाऱ्या लालन सारंग यांना समजावून सांगतांना तेंडूलकर म्हणाले, ‘पुस्तकी ज्ञान नसेल पण चंद्राची जगण्याची जाण आणि भान मोठे आहे...!’

आमच्या खान्देशी बहिणाबाई निरक्षर आणि अशिक्षित जरूर होत्या पण त्यांचे जगण्याचे भान असीम तर होतेच पण त्यांची ‘माणसा’ची जाण किती अलौकिक आणि कालातीत होती हे, आजच्या दाहक वास्तवावर परखड भाष्य करणाऱ्या,  त्यांनी १०० वर्षांपूर्वी केलेल्या तंतोतंत कवितांवरून निर्विवाद सिद्ध होते.

‘टिळक गेल्यानंतर, ज्याला समोरून येतांना बघून हातातली विडी टाकून द्यावी असा माणूस पुण्यात उरला नाही...’ अशी ‘खंत’ व्यक्त करणारे एकमेवाद्वितीय आचार्य अत्रे, बहिणाबाईंची प्रतिभा बघून, ‘जुन्यात चमकेल आणि नव्यात झळकेल असे हे बावनकशी सोने आहे...!’ असे म्हणतात यावरून बहिणाबाईंच्या रचनांचा दर्जा लक्षात यावा.

बहिणाबाई ‘निरक्षर’ असल्याने त्यांनी स्वत: यातले काहीही लिहून काढले नाही, त्या सुचेल तसे गात गेल्या आणि ऐकणाऱ्यांनी जमेल तसे उतरवून घेतले त्यामुळे बहिणाबाईंची कविता जशी ‘आधी कळस मग पाया...’च्या धर्तीवर ‘आधी गीत मग कविता’ असा अध्यात्मिक (उलटा?) प्रवास करते तसेच तुकोबांची गाथा जशी लोकगंगेने तारली (इति: पुलं) तशीच केवळ त्यांच्या तोंडून निघणारा शब्द उतरवून पुढल्या पिढ्यांवर उपकार करणाऱ्यांचे ऋणही मानायलाच हवे !

आणखी एक - खान्देशी ‘अशिक्षित’ असल्याने बहिणाबाई आपल्या मायबोली अर्थात ‘माझी माय सरसोती’च्या भाषेत म्हणजे आमच्या अहिराणीत गात असल्याने, मराठीचाच एक अवतार असला तरी, यातील काही शब्द समजणार नाहीत, पण भाव जाणून घेतला तर अर्थ लागायला हरकत नसावी. शिवाय, कानाला अतिशय गोड वाटणाऱ्या आमच्या अहिराणीचा, त्यानिमित्त अभ्यास केलात तर मराठी भाषा मुळातच किती समृद्ध आहे आणि तिला अभिजात भाषेचा दर्जा देण्याच्या विनंत्या करण्यापेक्षा तिचा स्वाभिमानी बाज समजावून घेऊन व्यवहारात वापर वाढवला तर ही जनसामान्यांची आणि छत्रपतींची भाषा कधीही कुणाची मिंधी होणार नाही... असो! तो एक वेगळाच विषय आहे...

साऱ्याच सर्वसामान्य व्यक्तींनीही माणूस म्हणून सूज्ञ, सुसंस्कृत, संवेदनशील आणि सक्रीय असण्याची अपेक्षा असेल तर समाजधुरीण, धोरणकर्ते आणि उच्चपदस्थ यांच्याकडून ही अपेक्षा शतपटीने वाढल्यास नवल नाही. सर्वच आलबेल असतांना आणि परिस्थिती अनुकूल असतांना धोरणीपणाचा, नेतृत्वाचा कस लागेलच असे नाही पण आणीबाणीच्या प्रसंगी शीर्षस्थ व्यक्ती किती सर्वसमावेशक विचार करू शकते आणि आपल्या धोरण-निर्णयांचा साधक-बाधक विचार करतांना किती संवेदनशीलता दाखवते यावरून नेतृत्वगुणांचा कस तर लागतोच पण या निमित्ताने त्या माणसाच्या व्यक्तित्वाचा पोत आणि दर्जा जसा दिसून येतो तसे ‘जगण्या’ची जाण आणि भानही समजते.

आजच्या अत्यंत बिकट परिस्थितीत, जगण्यासाठी धडपडणाऱ्या अगतिक बहुसंख्यांची विवंचना एकीकडे आणि अशाही परिस्थितीत, मढ्याच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्या आपमतलबी अविवेकी संधिसाधूंची वखवख दुसरीकडे, अशा विदारक परिस्थितीत बहिणाबाईंच्या या दोन रचना कसा प्रकाश टाकतात बघा. बहिणाबाईंनी कुठल्याही रचनेचं बारसं केलं असण्याची शक्यता नसल्याने, त्यांची ही दोन ‘गाणी’ त्यांच्याच शब्दात...

जीव देवानं धाडला जल्म म्हणे 'आला आला'
जव्हा आलं बोलावणं मौत म्हणे 'गेला गेला'
 
दीस गेला कामामधी रात नीजमधी गेली
मरणाची नीज जाता जलमाची जाग आली
 
नही सरलं सरलं जीव तुझ येन जान
जसा घडला मुक्काम त्याले म्हनती रे जीन
 
आला सास, गेला सास जीव तुझं रे तंतर
अरे जगणं-मरणं एका सासाचं अंतर!
 
येरे येरे माझ्या जीवा काम पडलं अमाप
काम करता करता देख देवाजीच रूप
 
ऐक ऐक माझ्या जीवा पीडयेलाच कण्हणं?
देरे गांजल्याले हात त्याच ऐक रे म्हनन
 
अरे निमानतोंडयाच्या वढ पाठीवर्हे धांडा
नाच नाच माझ्या जीवा संसाराचा झालझेंडा
 
हास हास माझ्या जीवा असा संसारात हास
इडा पीडा संकटाच्या तोंडावर्हे कायं फास
 
जग जगमाझ्या जीवा असं जगनं तोलाचं
उच्च गगनासाराख्या धरत्रीच्या रे मोलाचं
 
 
मानूस मानूस
मतलबी रे मानसा,
तुले फार हाव
तुझी हाकाकेल आशा
 
मानसा मानसा,
तुझी नियत बेकार
तुझ्याहून बरं
गोठ्यांतलं जनावर
 
भरला डाडोर
भूलीसनी जातो सूद
खाईसनी चारा
गायम्हैस देते दूध
 
मतलबासाठीं
मान मानूस डोलये
इमानाच्यासाठीं
कुत्रा शेंपूट हालये
 
मानसा मानसा,
कधीं व्हशीन मानूस
लोभासाठी झाला
मानसाचा रे कानूस !

बहिणाबाईंच्या आणखी कविता इथे वाचा.