अभोगी आयुष्य माझे
नसण्याचे दु:ख रिकामे,
असण्याचे सुंदर ओझे…!
सहा वर्षांपूर्वी २०२०च्या वर्षारंभी फेसबुकावर पोस्टलेल्या मजकुराचे पुनर्वसन झाल्यावर, तिथे नव्याने फ्रेंड झालेल्या जुन्या आप्तस्वकीयांच्या त्यावरील उत्साहवर्धक प्रतिक्रिया/प्रतिसादाने हुरूप आला आणि याच मुहूर्तावर पुन्हा काही लिहावेसे वाटले. तथापि नव्या नवलाईच्या उत्साहात नवनवीन धाडसी संकल्प सोडतांना (‘करतांना’च ‘सोडायची’ सोय असलेली 'संकल्प' ही संकल्पना, तिच्या कर्त्याला मानवी स्खलनशीलतेची सटीक कल्पना असण्याचे द्रष्टेपण मानावे काय!), ते किती दिवस टिकतात पाहणे उद्बोधक ठरते असा अनुभव असल्याने, नववर्षाचे नव्या नव्हाळीचे नऊ दिवस पार पडल्यावर दहाव्या दिवशी नववर्षाची पहिली पोस्ट करावी अशा सूज्ञ(?) विचाराने थोडी कळ काढली!
या निमित्ताने काय लिहावे असा विचार चालू असतांना, धबधब्यासारख्या अहोरात्र अविरत कोसळणाऱ्या कन्टेन्ट मधून नीरक्षीर-विवेकाने सात्विक सत्वशुद्ध तेव्हढे निवडून पाठवणारा राजहंसी योगगुरू कलाकार बंधुसखा कुमार नेहमीप्रमाणे मदतीला धावून आला. त्याने पाठवलेल्या युट्युब लिंकवर, गालिबच्या जयंती निमित्त डॉ. आनंद नाडकर्णी यांनी डॉ. नंदू मुलमुले यांच्या ‘गालिब’ पुस्तकाच्या माध्यमातून त्यांचीच घेतलेली मुलाखत अनुभवायला मिळाली.
'मी महाकवी दुःखाचा
प्राचीन नदीपरी खोल
दगडाचे माझ्या हाती
वेगाने होते फूल…'
असं म्हणणाऱ्या ग्रेससारखा गालिबही सोपा नाही… वाचायला, समजायला, कळायला आणखीन आकळायला! तेव्हा असं कुणी बोट धरून गालिबच्या भावविश्वाची सफर (मराठीतली! आणि उर्दूतली सफ़र) अक्षरश: शब्द शब्द सोडवून समजावून सांगत असेल तर अशी पर्वणी कोण सोडतो! शिवाय 'अस्तित्ववादी शून्यवाद' (Existential Nihilism) या गूढ-गंभीर तत्वाचे चिंतन थेट बुद्ध, ज्ञानेश्वर, चार्वाकापासून व्हाया गालिब, बहिणाबाई, ते गुलज़ार, सुरेश भट, ग्रेसपर्यंत येतांना होणारे साक्षात्कार दैवी नाही असे कोण म्हणेल?
गालिबच्या बहुतेक प्रसिद्ध आणि सुपरिचित शेरो-शायरीचा या संवादात उहापोह झाला असला आणि तो अतिशय रंजक असला तरी यात, ‘न था कुछ तो ख़ुदा था, कुछ न होता तो ख़ुदा होता’ या रचनेतल्या अजून एका महत्वाच्या शेरची सखोल चर्चा व्हायला हवी होती याची रुखरुख राहिलीच...
‘हुआ जब ग़म से यूँ बेहिस,
तो ग़म क्या सर के कटने का
न होता गर जुदा तन से,
तो जानू पर धरा होता…’
असो! परिपूर्ण असायला मानवी आयुष्य म्हणजे काही समस्त जगत नव्हे, असलेच तर त्यातील शून्य आहे. ‘ॐ पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते।’ म्हटल्यासारखे. शिवाय गालिबने म्हटले आहे तसे अपूर्णतेचीच तर सारी मौज आहे…
हासिल-ए-ज़िंदगी
हसरतों के सिवा कुछ भी नहीं,
ये मिला नहीं, वो किया नहीं,
ये हुआ नहीं, वो रहा नहीं।
ते काही असले तरी या बहुश्रुत, व्यासंगी माणसाचे हे चाळीस मिनिटांचे अतिशय अभ्यासू, विचक्षण निरूपण आनंद मात्र परिपूर्ण देते याची पुरेपूर खात्री… बघा अनुभवून!
