शनिवार, ११ जून, २०११

पाऊस...!?!


या पावसाळ्यात,

आरशावर ठिबकणाऱ्या

वळीवाच्या थेंबांनी मला कधीच सांगितलंय

या पावसाळ्यात घर बांधायचं नाही...

तेव्हा आता थुई थुई पावसात भिजवीण्यापेक्षा,

तुझ्या पावलांवर अळीव्याची नक्षी काढ...

...नाही, पाऊस तोच आहे, मातीही तीच आहे, 

आणि तुझ पाऊलही...

फक्त आताशा,

माझ्या हातात माती ओल धरत नाही...!

शुक्रवार, १० जून, २०११

रूपक...?!?


प्रतिभेची किंमत

इथे शून्य आहे

प्रतिमेच्याच शोधात

प्रत्येक अन्य आहे...!

गुरुवार, ९ जून, २०११

परिवर्तन...!?!


इथल्या वाटचालीला

चाकोरीचा शाप आहे...

परिवर्तनाबद्दल बोलण

हे देखील पाप आहे...!

बुधवार, ८ जून, २०११

अद्वैत...!?!


अद्वैताचा अर्थ मला

त्या क्षणी कळला

तू अडखळलीस अन

माझा तोल ढळला...!

मंगळवार, ७ जून, २०११

गणित...!?!

माणसं आयुष्य कसं

गणितात जगतात...

अनुभवाच्या पुंजीला

वयाने भागतात...!

सोमवार, ६ जून, २०११

पक्ष...?!?


प्रत्येकाचा इथे कुठला

ना कुठला पक्ष आहे

तरी पक्षबदलास उशीर नको 

म्हणून प्रत्येक जण दक्ष आहे...!

रविवार, ५ जून, २०११

वृक्षवल्ली...!?!


वृक्षवल्ली आम्हां सोयरीं वनचरे...

पक्षीही  सुस्वरे आळविती

तुका म्हणे होय मनासी संवाद

आपुलाची वाद आपणांसी...!

शनिवार, ४ जून, २०११

उपरा...!?!

असीम या दुनियेत

प्रत्येक जण उपरा आहे...

तरी जो तो म्हणतो

हा माझा कोपरा आहे...!

गुरुवार, २ जून, २०११

नियती...!?!


एक डाव माझा

एक नियतीचा...

जीत ठरलेली तिचीच,

मला विरंगुळा हयातीचा...!

बुधवार, १ जून, २०११

अनामिक...!?!


चालता चालता अचानक जाणवलं

वेगळी म्हणून निवडलेली पायवाट

इतिहासाच्या पाउलखुणांनी

मलीन झालीय कधीचीच...



दु:ख नव्हतं,

चालण्याचे श्रम वाया गेल्याचं...

विषादही दाटला नव्हता,

वेळ खर्ची पडण्याचा...



वाईत वाटल ते याच  

रूढ वाटेचा किनाराही नव्हता नशिबात

अन प्रवासाचा उद्देशच धूरकटला होता

गावाचं नाव न सांगणा-या पाटीसारखा..!