शनिवार, २७ जानेवारी, २०२४

परिच्छेद...!


"...शाळेच्या त्या छोट्या जगातून बाहेरच्या मोठ्या जगात पाऊल टाकल्याला आता अकरा वर्षे झाली. पण अजूनही सर्वत्र मला विषमतेची तीच ओंगळ आणि भयंकर दृश्ये दिसत आहेत. बाजारात, देवळात, विद्यालयात, नाटकगृहात, प्रवासात, सभासंमेलनात, लग्नमंडपात, स्मशानभूमीत - कुठेही पाहा. जीवनाच्या या महारोगाने आपल्याला पुरे ग्रासून टाकले आहे, समाजपुरुषाचे शरीर त्याने विलक्षण विद्रूप आणि बधिर करून सोडले आहे, या शारीरिक विकृतीचा परिणाम त्याच्या आत्म्यावरही झाला आहे असेच दिसून येईल. डोळे मिटून भारतीय संस्कृतीचा जप करीत आणि आपल्या आध्यात्मिक वारशाची स्थानी-अस्थानी प्रौढी मिरवीत आपण गेली शेकडो वर्षे एका स्वप्नसृष्टीत वावरत आलो आहो. धर्म व व्यवहार, विचार व आचार, इच्छा व कृती यात उभारलेली राक्षसी भिंत धुळीला मिळविण्याकरिता करावी लागणारी प्रचंड धडपड आमच्यापैकी एखादाच थोर आत्मा क्वचित करतो. जमल्यास त्याचा आणि आणि ते साधले नाही तर त्याच्या शिकवणुकीचा मुडदा पडून आम्ही पुन्हा स्वप्नसृष्टीतल्या आपल्या मोठेपणात मश्गूल होऊन जातो. आम्हाला सर्वोदय हवा, आम्हाला रामराज्य हवे! 'सर्वे तु सुखिनः सन्तु' या मंत्राचा उद्घोष कानांवर पडला की, आमच्या अंगावर आनंदाचे रोमांच उभे राहतात! पण हे सारे शेख महंमदाचे मनोराज्य सत्यसृष्टीत उतरविण्याकरिता आर्थिक आणि सामाजिक समतेची जी बैठक तातडीने निर्माण व्हायला हवी, ती उभारण्याचे अवघड आणि कष्टप्रद काम करायला आम्ही तयार नाही. परंपरागत स्वार्थावर निखारे ठेवल्यावाचून समता या शब्दाला काही अर्थ नाही, जीवनविषयक दृष्टिकोनातली क्षुद्रता नाहीशी झाल्याशिवाय खरीखुरी सामाजिक क्रांती अवतार घेऊ शकणार नाही हे सनातन कटू सत्य आहे. पण आजच्या झटपट सुधारणेच्या काळात याचा विचार करायला मंत्र्यांपासून विचारवंतापर्यंत कुणालाच वेळ नाही. आजकालची आपली सारी धडपड सत्प्रवृत्त आहे असे मानले, तरी पायावाचून उभारलेल्या चित्रपटातल्या क्षणभंगुर लाकडी मंदिरावर सोन्याचा कळस चढविण्यापेक्षा तिची किंमत अधिक नाही. कळत-नकळत सामाजिक विषमतेचे खरेखुरे राक्षसी स्वरूप लपविण्याचीच अद्यापि आपण कोशीस करीत आहोत! कुणी तिला तत्वज्ञानाच्या सात पडद्यांआड  ठेवतो, कुणी तिला धार्मिक बुरखा पांघरायला  देतो, कुणी तिला पांडित्याच्या अलंकारांनी झाकून टाकतो. पण कुठलीही व्याधी - मग ती वैयक्तिक असो वा सामाजिक असो - लपवून कधीच बरी होत नाही! या दृष्टीने मी 'पूजास्थान' ही गोष्ट चाळू लागलो म्हणजे तिच्यात एकप्रकारचा दुबळेपणा मला आता जाणवतो! तिच्यातले सत्य अधिक तीव्रतेने, अधिक उग्रतेने आणि अधिक विशाल अशा पार्श्वभूमीवर चित्रित करण्याचा मी पुन्हा एकदा प्रयत्न करणार आहे..."       
वि. स. खांडेकर
११.५.४९

'गुणा: पूजास्थानं गुणिषु नच लिंग नच वय: I
इयत्ता पाचवीला संस्कृत शिकवितांना धडयात आलेल्या या वचनाने जन्म दिला 'पूजास्थान' या लघुकथेला आणि तिला 'अश्रू आणि हास्य' या संग्रहात सामील करतांना तिच्या जन्मकथेनिमित्त जे चिंतन झाले त्या प्रदीर्घ प्रस्तावनेतील; साऱ्या धोरणी धारणा, अद्भुतरम्य कल्पना आणि स्वप्नरंजित आभास - यांना छेद देणारा हा परिच्छेद! पंचाहत्तर वर्षात देश खूप पुढारला, प्रगती झाली, विकास झाला, ओबडधोबड जगण्याला मऊमुलायम आधुनिकतेचा स्पर्श झाला... सारे खरेच. पण बरोब्बर ७५ वर्षांपूर्वीच व्यक्त झालेल्या या चिंतनीय वास्तवाचे काय? वि. स. खांडेकर या लेखकाच्या माध्यमातून व्यक्त झालेला पण कुणाही विचारी, संवेदनशील आणि विवेकी माणसाचा असू शकणारा हा विषाद पंचाहत्तर वर्षात किती कमी झाला... की वाढला? आणि तसे असेल तर एक प्रगत समाज म्हणून आपणही ७५ वर्षांची ही गाथा अधिक विशाल पार्श्वभूमीवर नव्याने चितारायला नको...?

निदान प्रयत्न करून बघायला काय हरकत आहे? 

ये जो शहतीर है पलकों पे उठा लो यारो
अब कोई ऐसा तरीका भी निकालो यारो

दर्दे—दिल वक़्त पे पैग़ाम भी पहुँचाएगा
इस क़बूतर को ज़रा प्यार से पालो यारो

लोग हाथों में लिए बैठे हैं अपने पिंजरे
आज सैयाद को महफ़िल में बुला लो यारो

आज सीवन को उधेड़ो तो ज़रा देखेंगे
आज संदूक से वो ख़त तो निकालो यारो

रहनुमाओं की अदाओं पे फ़िदा है दुनिया
इस बहकती हुई दुनिया को सँभालो यारो

कैसे आकाश में सूराख़ हो नहीं सकता
एक पत्थर तो तबीयत से उछालो यारो

लोग कहते थे कि ये बात नहीं कहने की
तुमने कह दी है तो कहने की सज़ा लो यारो

- दुष्यंत कुमार

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा