शुक्रवार, ९ नोव्हेंबर, २०१८

आनंदयात्री...!


‘पु. ल. देशपांडे हे मराठी सारस्वताला पडलेलं स्वप्न होतं आणि शारदेच्या मंदिरातील तो रत्नजडीत हस्तिदंती स्तंभ आहे...’ अशा सखाराम गटणेच्या भाषेत पुलंच्या जन्मशताब्दी वर्षाचा शुभारंभ करावा असा अस्फुट विचार मनात आला होता पण खुद्द पुलंनीच या वाक्याची किती आणि कशी टिंगल केली असती या कल्पनेनं हसू फुटलं! शिवाय काल पहाटे ६ वाजल्यापासून रात्री १० वाजेपर्यंत यशवंतराव चव्हाण ते बालगंधर्व व्हाया ‘आशय’चा ग्लोबल असा ‘पुलोत्सव’ साजरा होत असतांना पुलंबद्दल जे जे बोललं गेलं (आणि ऐकाव लागलं), दाखवलं गेलं (आणि पहावं लागलं) तथा साकारलं गेलं (आणि भोगावं लागलं) त्या अत्यंत समृद्ध, सुभग सांस्कृतिक अनुभवाला छेद नको म्हणून ‘त्या’ वि. स. प्रेरित गोळीबंद वाक्याचा मोह टाळला आणि मराठी रत्नमाला एका मौक्तिकाला मुकली!

‘कालच्या ‘पुल’कित दिवसात पुलंच्या वि’पुल’ व्यक्तिमत्वाने साजरा झालेला ‘पुलो’त्सव एका पुरुषोत्तमाचा मना-मनांमध्ये ‘पूल’ बांधण्याच्या अट्टाहासाचा प्रवास होता...’ हे नानू सरंजामे छाप वाक्यही पुलंना फारसं मानवलं नसतंच पण तसा स्टार्ट घेतल्याशिवाय लाईन आणि लेंग्थ हवी तशी सांभाळता येणार नाही म्हणून हा रन-अप. पुल हे व्यक्ती आणखीन वल्ली म्हणून इतके अफाट आणि अथांग होते, आहेत की एक संपूर्ण दिवस आणि चार कार्यक्रम हे फारतर या अवलियाचा अल्प परिचय करून देऊ शकतात, त्यांच्या समग्र कार्याचा समर्पक आढावा नाही घेऊ शकत!


कथा लेखन-सादरीकरण, व्यक्तिचित्रण, प्रवासवर्णन, ललित, स्फुटं, वैचारिक तथा सामाजिक लेखन, चित्रपट कथा-पटकथा-लेखन-दिग्दर्शन-संगीत आणि आविष्काराची एवढी साधने पुरेशी नाहीत म्हणून की काय सभा आणि मंच गाजविणारे वक्तृत्व अशा शब्दश: हरहुन्नरी आणि बहुमुखी, बहुश्रुत प्रतिभेने आयुष्यात जे जे म्हणून साकारले ते ‘अभिजात’ या प्रकारात मोडणारे होते याची साक्ष पुलंच्या लोकप्रिय पुस्तकांच्या अर्धशतकी आवृत्या, मराठीतील ‘बेस्ट-सेलर’ हा बहुमान आणि दिवसेंदिवस वाढतच जाणार ‘पुलं’ नावाचं गारुड, हे सगळे एका प्रकटनात बसविणे फक्त कठीण नाही तर अशक्य आहे!

‘ते ‘सदू आणि दादू’ बरोबर थोडं ‘नारू आणि पारु’ही लिव्हलं तर कवितेच यमकही जुळतंय की हो म्हणतो मी...’ असा प्रतिभावान सल्ला देणाऱ्या रावसाहेबांमुळे, चाळीतल्या परोपकारी गंपूमुळे, चितळे मास्तरांच्या झिजलेल्या चपलांमुळे आणि घरोघरी लग्नकार्यात भटजीपासून शेटजीपर्यंत सगळ्याची व्यवस्था पाहणाऱ्या नारायणामुळे पुलंचे बहुतेक पैलू हे चिरपरिचित असले आणि पुस्तके, मासिके तसेच दृकश्राव्य माध्यमातून (अगदी यूट्युबवरही) उपलब्ध असले तरी पुलंचा फारसा प्रकाशात आणि (प्रकाशनात) न आलेला चेहरा हा एका मार्मिक कवी आणि विचक्षण दार्शनिकाचा देखील आहे असे आमचे प्रांजळ आणि परखड(?) मत आहे! हो, अप्पा प्रधानाप्रमाणे आमचे कायस्थ रक्त आणि आईकडूनच काय कुणाकडूनही खंडो बल्लाळाशी नातं नसलं म्हणून काय, '...कवणे बाणेदार असूच नये की काय...?'


तेंव्हा पुलंमधला फारसा परिचित नसलेला कवि-भाष्यकार या निमित्ताने सादर करावा म्हणून दोन व्हिडीओज् – एक अफलातून कविता आणि एक जीवनदर्शन! पुलंबद्दल आमची लेखनसीमा म्हणजे ‘...परी या सम हा!’ आणि ‘तुझिया जातीचा मिळो आम्हां कोणी’ – हो, पुलंबद्दल काव्यात्म लिहिणे येरागबाळ्याचे काम नोहे, ‘तेथे पाहिजे जातीचे...’ म्हणजे कसे तर पुलंबद्दल त्यांचे स्नेही, सन्मित्र मंगेश पाडगांवकर म्हणाले...

पुलस्पर्श होताच दु:खे पळाली
नवा सूर, आनंदयात्रा मिळाली
निराशेतुनी माणसे मुक्त झाली
जगू लागली, हास्य गंगेत न्हाली!

आणि ‘बाकीबाब’ बा. भ. बोरकर म्हणाले... 

जराशप्त या येथल्या जीवनाला I कलायौवने तूच उ:शापिले I
यथातप्त जीवी स्मिते पेरुनी तू I निराशेत आशेस शृंगारिले I
मिलाफुन कल्याणकारुण्य हास्यी I तुवां स्थापिला स्वर्ग या भूतली I
तुझ्यासारखा तूच आनंदयात्री I तुवां फेडिली गाठ प्राणातली I

आणि खुद्द कविवर्य पु. ल. देशपांडेंच्या काही धाडसी कविता...

१. 
एकदा तुम्ही मला
छान दिसतेस म्हणालांत
पण 'समोरच्या सरोजबाईसारखी'
हे शब्द जोडून...

२. 
बहात्तर कादंबऱ्या लिहिणारी
माझी थोर साहित्यिक आत्या
दम्याने पंचाहत्तराव्या वर्षी वारली
तेव्हा 'सुटली' म्हणायच्या ऐवजी
तुम्ही 'सुटलो' म्हणालात...

३.
माझ्या खोलीतल्या फोटोतली तरुणी
परवा मला म्हणाली,
'मला चांगलेसे स्थळ शोधून द्या ना-
इथे माझा जीव टांगल्यासारखं वाटतंय' 

४. 
अहो ज्ञानियांच्या राजा । कशाला फुकाच्या गमजा?
एकेकाळी रचिली ओवी । व्हाल का हो नवकवी?
मारे बोलविला रेडा । रेघ बी. ए. ची ओलांडा!
तुम्ही लिहावी विराणी । लिहा पाहू फिल्मी गाणी
म्हणे आळंदी गावात । तुम्ही चालवली भिंत
चालवून दाखवा झणी । एक नाटक कंपनी
बाप रखुमादेवीवरा । आमुचा च्यालेंज स्वीकारा

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा