शनिवार, १६ फेब्रुवारी, २०१९

हौतात्म्य...?

 

युद्धभूमीवर शहीद होईन जेव्हा,
रक्षा माझी पोहचवाल घरी तेव्हा?

आजोबांना काय सांगाल, मी काय सांगू? 
म्हणाल, 'नाही आता तो, नका जीव टांगू?' 

आजीला म्हणावं, 'करत रहा लाडू रवाळ गोड,
मित्रांची त्याच्या खाण्याची जाणार नाही खोड!' 

ताईला सांगाल, 'नको काळजी निद्रानाशाची?'
सूर्यास्तानंतर आता चिरनिद्रा माझ्या ध्यासाची!

छोटूला म्हणांव अभ्यासात घाल चल लक्ष,
माझ्या वस्तू वापरण्यास नको राहूस दक्ष! 

अन बाबांना सांगा आता आणि वाकू नका,
त्रास देण्यास नसेन मी, नाही कुठला हेका! 

मांडाल पदके माझी ओळीने माझ्या छातीवर? 
सांगाल आईला लढलो प्राणपणाने या मातीवर? 

आणि हो, देश बांधवांना म्हणा नको आसवे माझ्यासाठी
सैनिक मी, जन्मच मुळी घेतला देशावर उधळण्यासाठी!

1 टिप्पणी: