रविवार, २५ ऑगस्ट, २०१९

शहाणीव...!


जगणे जसे मुरत जाते
तशी बहरते शहाणीव
वर्तमानाची क्षणोक्षणी
वाढत जाते जाणीव...

मन सांगते ‘जगून घे,
प्रत्येक क्षण असा काही;
आला क्षण, गेला क्षण
हा क्षण फिरुनी नाही...’

जाणवते सत्य नवे
जाणाऱ्या हरेक क्षणासवे
नात्यात नांदते श्रीमंती
मायाजाल कशास हवे?

सापडलाच कधी त्यांना
चिरतारुण्याचा झरा,
पिणार थेंबही नाही, मी
नित्य मुरणाराच बरा...

मोठे मौजेचे असते
पक्व फळापरी मीपण गळणे
मोजकेच उरतात मित्र
आणि त्यांचा स्नेह रुळणे...

शिवाय केस पिकू लागतात तसा
तोलतो मी व्यवहार काट्यावर,
उमजते टाकावा जीव कशासाठी
अन काय मारावे फाट्यावर!

खुपत नाहीत कुठल्या पाऊलखुणा
न रडवणाऱ्या, न खुलवणाऱ्या,
माझ्या जगल्या क्षणांची स्मारके
आणि वाटा काही भुलवणाऱ्या...

वय जसजसे वाढते तसे
कुटुंब माझे वाढत जाई
सहचरणीसह सामावते
त्यात अजूनही बरेच काही...!

मागणे संपले कधीच
आता याचना नाही,
कृतज्ञता त्या संवेदनेची
जी मुरून रंध्रात वाही…!

चाळीशी कधीच मागे सोडून पन्नाशीच्या उंबरठयावर उभ्या असणाऱ्या आणि आता 'वाढ'दिवस साजरा करावा की 'काढ'दिवसांचा हिशोब मांडावा अशा द्विधा मनस्थितीमधील सर्वच 'मनां'साठी ही 'शहाणीव'... माझे आयुष्य ३६५ दिवसांनी समृद्ध करणाऱ्या, लन जॅक्सनसह, साऱ्या स्नेह्यांना समर्पित...!

४ टिप्पण्या: