रविवार, १३ सप्टेंबर, २०२०

मर्मबंधातली ठेव ही...!

३० ऑक्टोबर २०१८ च्या ‘कवित्व’ या पोस्टमध्ये आमचे आजोबा अण्णा अर्थात ‘केशवतनय’ यांचा अत्यल्प परिचय झाला होता आणि अण्णांपासून सुरु झालेली साहित्यिक प्रतिभेची परंपरा आज पाचव्या पिढीत समृद्ध होतांना पाहून समाधान वाटते. आमच्या वडिलांची दुसरी पिढी आणि या पिढीतील ज्येष्ठ, आमचे थोरले काका, यांच्याबद्दल १ ऑक्टोबर २०१८ च्या ‘गदिमा’ या पोस्टमध्ये आपण वाचले. आज या दुसऱ्या पिढीतील सर्वात धाकटे काका गोपाळ पुराणिक अर्थात आम्हां तिसऱ्या पिढीतील सर्वांचे अत्यंत लाडके बंडूकाका यांच्या प्रतिभेची एक झलक पाहू या.

वर्तमानपत्रामध्ये बंडूकाकांनी पुष्कळ लिखाण केले आणि त्यांचे तत्कालीन राजकारणावर आणि इतरही सामजिक, सांस्कृतिक विषयांवर केलेले मार्मिक भाष्य हे त्या वर्तमानपत्राच्या स्थानिक आवृत्तीचा मानबिंदू (आजच्या बाजारू पत्रकारितेच्या भाषेत टीआरपी!) होते. काकांनी अनेक क्षेत्रात उमेदवारीही केली आणि मुशाफिरीही केली पण जीवनाचा चिंतनशील भाष्यकार तथा रसाळ कथाकथनकार ही त्यांची सगळ्यात आवडती भूमिका! कुठल्याही घटनेचे, प्रसंगाचे अथवा कथेचे अत्यंत तपशीलवार तरीही रंजक वर्णन करावे ते काकांनीच. या ग्रहणशक्ती आणि सादरीकरणाच्या कौशल्याचा त्यांना फारसा व्यावहारिक उपयोग झाला नाही (किंवा करता आला नाही) पण यामुळे लोकसंग्रह उदंड झाला!

आम्ही लहान असतांना तर बासरी, हार्मोनियम वाजवणारे, एकामागून एक धमाल गोष्टी सांगणारे, हिंदी चित्रपट आणि त्यातील गाण्यांचे इत्यंभूत ज्ञान असणारे आणि त्या काळातील प्रथेनुसार राजेश खन्नाचे फॅन असल्याने त्याची स्टाईल कॉपी करणारे 'काका' आम्हां मुलांचे हिरो नसते तरच नवल! काव्य-शास्त्र-विनोदाची गोडी आम्हांला लागली ती काकांमुळेच. वाचनाच्या व्यसनामुळे दिवाळी अंकांचे फिरते वाचनालय चालवायची आयडिया आम्हाला सुचली तिचे श्रेयही काकांचे. ते वाचनालय जरी फारसे चालले नसले तरी त्या निमित्ताने त्या वर्षीचे बहुतेक सारे दिवाळी अंक आम्हांला वाचायला मिळाले आणि शिवाय काही संग्रही ठेवता आले याचाच आनंद जास्त! कलाभान जपतांना व्यवहारज्ञानाचा सपशेल अभाव हा संस्कारही बहुदा काकांमुळेच नकळत घडला असावा... असो!

अशा आमच्या हरहुन्नरी, कलाकार आणि कबिरी वृत्तीच्या काकांनी काही पद्य रचना केल्या नाहीत असे कसे होईल? काकांच्या कविता हा एक स्वंतत्र विषय असला तरी त्यांच्या एका अतिविशिष्ट रचनेसाठी आजची पोस्ट. सर्वकालीन समाजव्यवस्थेचे व्यवच्छेदक लक्षण दाखवून देतांना स्वत:च्या व्यक्तिमत्वाचे परखड परीक्षण आणि तेही ऐन तिशीमध्ये करणे हे सोपे काम नाही. या अभिव्यक्तीसाठी कर्णाहून सुयोग्य आणि चपखल रूपक कालत्रयी सापडणे शक्य नाही म्हणूनच काकांनाही तो मोह टाळता आलेला नाही. भल्या भल्या प्रतिभावंतांना भुरळ पाडणारी कर्णाची व्यामिश्र व्यक्तिरेखा काकांनी आत्मानुभवाच्या पातळीवर अशी काही प्रतिबिंबित केलीय की याला कर्णाचे लघुत्तम चरित्र म्हणण्यास खुद्द कर्णाचाही आक्षेप नसावा!

आयुष्याच्या भाष्यकाराची चिंतनशीलता, सिद्धहस्त गझलकाराची गेयता आणि प्रकटनातल्या प्रामाणिकपणाची मोहकता अशा त्रिगुणांनी सजलेल्या या रचनेला इत्यादीवर मानाचे पान देण्याची अनेक वर्षांची दुर्दम्य इच्छा आज पूर्ण होण्यास पुन्हा एकदा मदत झाली ती बंधुसखा योगगुरू कलाकार रंगवैभव अर्थात कुमारची! छापील स्वरुपात काकांकडे आणि हस्तलिखित स्वरुपात आम्हां दोघांकडे असलेल्या या रचनेच्या प्रती कुठल्या ना कुठल्या कारणाने गहाळ झाल्या आणि काही केल्या कुणालाही सापडेना. खुद्द काकांनाही संपूर्ण रचना मूळ स्वरुपात स्मरत असेल का अशा संभ्रमात खूपच कालापव्यय झाला.

शेवटी, कुठल्यातरी निमित्ताने काकांशी भ्रमणध्वनीवर संभाषण चालू असतांना योगगुरूंनी अत्यंत खुबीने या विषयी संवाद साधत काकांची कळी खुलवली आणि गतस्मृतींना उजाळा देत, ‘जलते है जिसके लिये...’ स्टाईलमध्ये काकांच्या डिक्टेशनने संपूर्ण गझल उतरवून घेतली! आपल्या छापील अक्षरात ‘होतो महारथी मी...’ कागदावर उतरवून त्याचा फोटो काढून तत्परतेने मला पाठवला तेव्हा तेवढ्याच तत्परतेने ती टंकलिखित करून ठेऊन लवकरात लवकर इत्यादीवर प्रकाशित करणे मला आगत्याचे वाटले! हे ‘नमनाला घडाभर तेल’ नसून, हिऱ्याला शोभिवंत करणारे कोंदण मिळावे म्हणून केलेला अट्टाहास आहे याची प्रचीती येईल ही अपेक्षा! तेव्हा, आजच्या मुहूर्तावरगोपाळ बापू पुराणिक अर्थात आमचे लाडकेबंडूकाका यांची ही एक अभिजात रचना...

कर्ण

होतो महारथी मी पण कर्ण नाव होते…
त्यांच्याच सोंगट्या अन् त्यांचेच डाव होते !

स्पर्धेत कोणत्याही माझा नसा प्रवेश... 
त्यांचेच पंच आणि त्यांचेच गाव होते !

सांभाळली सुबुद्धी अन रंक जाहलो मी... 
गेले लुबाडूनी जे सगळेच राव होते !

त्यांनीच मांडले हो घनघोर युद्ध जेव्हा... 
माझ्या शरांत तेव्हा गतिमान ठाव होते !

मी एकटाच होतो समरांगणी लढाया... 
त्यांच्याकडून लढण्या साक्षात देव होते !

भगवंत कृष्ण म्हणूनी जग वंदते जयाला... 
माझ्या समोर त्याचे फसवे ठराव होते !

होतो महारथी मी पण कर्ण नाव होते… 
त्यांच्याच सोंगट्या अन् त्यांचेच डाव होते !

- गोपाळ बापू पुराणिक (१९८५)

२ टिप्पण्या:

  1. कवितांइतकेच नमनाला घातलेले घडाभर तेल सुगंधी आहे.

    उत्तर द्याहटवा
  2. धन्यवाद! आपला परिचय दिलात तर या प्रतिसादावरही काही लिहीन म्हणतो...! :)

    उत्तर द्याहटवा