बुधवार, २५ ऑगस्ट, २०२१

बोध...!


पन्नास म्हणजे अर्धशतक... एवढा काळ टिकलो याचे आंतरिक समाधान आणि, ‘ठरवलं तर शतकही गाठता येईल’ अशी ओढ लावणारी वेडी आशा. पन्नाशीला अनेक संदर्भ नव्याने उमगू लागतात. पंचविशीतला बाणेदार ध्येयवाद किंवा ‘कर लो दुनिया मुठ्ठीमें’ ही राजसी महत्वाकांक्षा व्यवहाराचे टक्के-टोणपे खाऊन वरमलेली असते आणि, ‘अरेच्चा, हे असे आहे होय, हरकत नाही वेगळ्या दृष्टीनेही पाहू या...’ एवढा उदारमतवादी दृष्टिकोन विकसित झालेला असतो... नव्हे, व्हावाच लागतो, कारण त्याशिवाय तरणोपाय नाही ही शहाणीव रोज वाढते वय नित्यनेमाने देत असते. शारीरिक क्षमता अतिसूक्ष्मपणे का होईना पण दिवसेंदिवस कमी होतेय ही जाणीव फारशी सुखावाह नसली तरी, रोज नव्याने उगवणारा पांढरा केस हे म्हातारपणाचे लक्षण मानण्यास साफ नकार देण्याइतक्या, तरुण मनाच्या संवेदना तीव्र असल्याने तो तातडीने कलप तरी केला जातो किंवा कलम तरी.

‘तरुण आहे रात्र अजूनी...’ ही आता थोडी कल्पनारम्य स्थिती वाटू लागली असली तरी ‘वय निघून गेले...’ म्हणायलाही मन धजावत नाही अशी ही त्रिशंकू परिस्थिती. पंचविशीतला चेहरा मनातून पूर्णपणे पुसला गेला नसला तरी आठवावा लागण्याइतपत धूसर नक्कीच झालेला असतो. ‘कितने दूर कितने पास...’ ही भावना फक्त तरुणपणीचे मोरपंखी दिवस, पाऊल न वाजवता आयुष्यात आलेले आणि कायमची हुरहूर लावून गेलेले चेहरे, मैफिलींसह इतरही कारणांसाठी जागविलेल्या रात्री, भावनांच्या आवर्तनात तरलतेच्या पलीकडे जाऊन ‘दुनियादारी’ शिकवून गेलेले प्रसंग, सोयीसाठी बांधलेले आणि गैरसोय होताच मोडलेले (भाव?)बंध एवढ्यापुरतीच मर्यादित न राहता विरक्ती, मुक्ती, मोक्ष किंवा किमानपक्षी वैकुंठाच्या बाबतीत तरी प्रबळ होत जाते.

खऱ्या अर्थाने मिड-वे किंवा हाफ-वे म्हणावे अशी ही वाटचाल. शिल्लक अंतर हे पार केलेल्या अंतराइतके नक्कीच नसले तरी उरलेला प्रवास घडलेल्या प्रवासाइतकाच, किंबहुना मोठाच, भासणार याची जाणीव पदोपदी करून देणारा हा टप्पा. कमावले त्याचे समाधान आणि गमावले त्याची हुरहूर अशा संमिश्र भावनांच्या हिंदोळ्यावर आयुष्याशी तडजोड करून ‘समन्वय’ साधतांना ‘अनुराग’ आणखीन ‘अस्मिता’ दोन्ही जपण्याची प्रामाणिक धडपड. भोगाच्या मायाजालातून स्वेच्छा-मुक्ती नाही आणि अभोगी विरक्तीचा विनाअट स्वीकार नाही. आहे त्यात संपूर्ण समाधान नाही पण स्पर्धा करण्याइतकी इर्षाही नाही. ठसठसणारे दु:ख नाही, आतडे पिळवटणारी वेदना नाही पण निवृत्त व्हावे इतकी इतिकर्तव्यता नाही आणि समाधानी असावे इतके सुखही नाही, अशी ही अस्थिर संभ्रमित अवस्था... तरुणांच्या दृष्टीने अधेड आणि ज्येष्ठ नागरिकत्वाचा दाखला मिळण्यास अजून बराच अवकाश असल्याने त्यांच्या दृष्टीने ‘...तसे तरुण आहात!’

तस बघितलं तर ही अवस्था आजच्या लाईफ-स्टाईलचे तंतोतंत रुपक असायला हरकत नसावी. माणसाने स्वत:ची प्रगती आणि विकास करण्याच्या नादात तो अशा टप्प्यावर उभा आहे की नेमके काय कमावले आणि काय गमावले याचा सारासार विचार केल्यास आत्मसन्मान, समाधान, मन:शांती, नीतीमत्ता आणि सदसद्विवेक यांच्या बदल्यात मिळवली ती लाभार्थी तडजोड, नश्वर समृद्धी, निरंतर अस्थैर्य, बेगडी प्रतिष्ठा आणि विपरीत विचार आणि त्यातून उत्पन्न होणारे विकार आणि विखार.

अर्थात एकेरी वाटेवर ‘परती’चा मार्ग नसतो म्हणूनच हवी ‘उपरती’... ती कुण्या एका अमुकच्या पन्नाशीला झाली काय किंवा साऱ्यांच्या असोशीला झाली काय, भरकटलेल्याला योग्य मार्ग दाखवल्याशी मतलब. प्रवास अटळ आहे म्हणून जसे गतानुगतिक होण्याची गरज नाही तसेच अगतिक होण्याचीही गरज नाही... दिशा योग्य, वेग वाजवी आणि मन शुद्ध राखल्यास ठिकाण सापडतेच.

आज आयुष्याच्या मध्यावर आणि एका अपरिहार्य टप्प्यावरची ही आत्मिक अनुभूती... उद्या असेल?

कालाय तस्मै नम:

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा