रविवार, २४ सप्टेंबर, २०२३

पोकळी...!


पोकळीने घेतली जागा स्वतःची
उत्सवाची सर्व गर्दी पांगल्यावर…

सन्मित्र शामने ‘मुसाफिर’ सदानंद बेंद्रे यांची ही अत्यंत दार्शनिक अल्पाक्षरी धाडली आणि तिच्या संपूर्णतेचा शोध घेतांना सापडले नचिकेत जोशींचे जागेच असलेले चांदणे.

अस्तित्वाच्या पूर्णतेच्या शोधात आपल्यापुरते आकलन झालेल्या जीवन-जाणिवा हेच अध्यात्म. कोहम् पासून सोहम् अर्थात अहं ब्रह्मास्मि पर्यंतचा प्रवास आणि नेति नेति ते इदं न मम याची प्रचिती हेच सामान्य संवेदनशील माणसाचे आत्मज्ञान. हे ज्ञान जेव्हा सभोवतालाची जाण आणि जगण्याचे भान देते तेव्हा त्या अनुभूतीची प्रचिती तथा अभिव्यक्ती भिन्न असली तरी त्यातील अंतस्थ सूत्र एकच असते याची जाणीव करून देणाऱ्या या गझल स्वरूपातील दोन रचना.

एक नचिकेत जोशी यांच्या ‘चांदणे जागेच आहे’ या त्यांच्या अलीकडे प्रकाशित झालेल्या काव्यसंग्रहातील...

एकटा आहे बरा मी, कोणत्या चर्चेत नाही
रात्र माझी, स्वप्न माझे झोप उसनी घेत नाही. 

मी तुझ्यावर प्रेम केले व्हायचे होऊन गेले
मी अशा क्षुल्लक चुकांना फार किंमत देत नाही. 

आखल्या रेषेत हल्ली बरसते आभाळ माझे
एकही वादळ आता त्याच्या सोबतीला येत नाही. 

आपुल्या नात्यास कोणी पाहिजे ते नाव द्यावे
ते तसेही कोरलेले या हातच्या रेषेत नाही. 

धूळ आहे, मळभ आहे, ही हवाही उष्ण आहे
उंच आकाशात उडण्याचा मनाशी बेत नाही. 

ताटवे फुलतात बाकी आजही बागेत माझ्या
फुल तू चुरगाळलेले आजही बागेत नाही. 

एक आहे विश्व माझे माणसांनी घेरलेले
फक्त मी सोडून का कुणी तुझ्या दुनियेत नाही. 

पालखी उठताच माझी दोन डोळे चिंब झाले
आणि विझण्याची तयारी माझी या राखेत नाही. 

वाहत्या गर्दीत माझा शोध घेणे व्यर्थ आहे
मुखवटे आहेत तेथे त्यात हा नचिकेत नाही.

आजची दुसरी गझल, आमचे सर्जक सन्मित्र डॉ. सचिन चिंगरे यांच्या 'एक नाजायज प्रिस्क्रिप्शन...' या मुक्तछंदातील प्रकटनाचे एक्स्टेंशन वाटणारी आणि भावगर्भिततेत नचिकेत जोशींच्या गझलेशी जुळी भासणारी पण केवळ आत्ममग्नतेत न रमता, डॉक्टरांच्या नेहमीच्या सर्वव्यापी आणि सर्वसाक्षी विचक्षण परिप्रेक्ष्यानुसार एकूणच मानव्यावर भाष्य करणारी...

इतके मिळवल्यावर कळते जगण्याला इतके लागत नाही
भरुन पावते तन बिचारे बुभुक्षा द्वाड मनाची भागत नाही.

लख्ख उजेडाची रात ही डोळ्यांनी उघड्या लोक झोपती
दिवस काळेकुट्ट तरी कुणी मिटून डोळेही जागत नाही.

कुठून शिकला मानव नकळे सराईत रोबोटता चलाख ही
राहिला ना मित्र मित्रासम शत्रूही शत्रूसम वागत नाही.

बेल वाजते उघडतो दरवाजा तितकेच सवयीचे खुले अल्पस्मित
पांढरपेशा शहरी नशिबी कडकडून गळाभेटीचे स्वागत नाही.

मुकाट मरतो रोज जितेपणी लोकतांत्रिक मरण मतदाता राजा
धनुष्य मोडले तोफा विझल्या आग कुणीच डागत नाही.

हवे लबाडांना रुपये चैनीला हा याचनेचाही धंदा झाला
व्रतस्थ माधुकरी, पोटार्थी भिक्षा कुणी मागत नाही.

या दोन्ही रचना एकत्र सादर करण्यामागे तुलना अथवा स्पर्धेचा भाव नसून रविवारच्या काव्यमैफिलीचा नमुना पेश करण्याचा मानस आहे. शिवाय ‘मुसाफिर’सह तीनही कविवर्यांची आणि अर्थात शामचीही अनुमती गृहीत धरलेली आहे, कुणाचीही याविषयी हरकत नसेल ही अपेक्षा !

३ टिप्पण्या:

  1. व्वा, व्वा. रविवारची अनोखी सुरुवात. मस्तच

    उत्तर द्याहटवा
  2. माझी तेवढी योग्यता नसताना विचक्षण समीक्षक(माझ्याहून श्रेष्ठ) कवीही असलेल्या मित्राने केलेले कौतुक ! 🤗
    धन्यवाद 🙏

    उत्तर द्याहटवा
    प्रत्युत्तरे
    1. डॉक्टरसाहेब, याला मराठीत नम्र विनय आणि इंग्रजीत 'यू आर बीइंग मॉडेस्ट...!' म्हणतात. आमच्याबद्दल (अति)सामान्य समीक्षक एवढेच फारतर स्वीकार्य ठरावे !

      हटवा