बुधवार, १८ सप्टेंबर, २०२४

वि-सर्जन...!


‘निघालास…?’
'प्रत्येक गोष्टीची निर्धारित वेळ असते आणि तिच्या उत्पत्ती, स्थैर्य आणि लय यांचे नियोजन चुकले तर सृष्टीचा तोल बिघडतो. भूतलावर माझ्या नैमित्तिक आगमनाची आणि प्रस्थानाची वेळ ठरलेली आहे, ती चुकवून कसे चालेल…?’
‘इतक्या वर्षांच्या या परंपरेची ‘मना’ला सवयच होत नाही बघ, दर वेळी कंठ दाटून येतो! तुझ्या, आणि अशा सणावारांच्या निमित्ताने घरी येणाऱ्या जिवलगांच्याही, सहवासाचे क्षण कापरासारखे उडून गेल्यासारखे वाटतात…!’
‘कापरासारखे नको म्हणूस, उदबत्तीसारखे म्हण! ती पेट घेत नाही, मंद जळत राहते आणि तिने पसरविलेला सुगंध नंतरही बराच काळ आसमंतात दरवळत राहतो, ‘मना’ला प्रसन्न करतो!’
‘तू शेवटी तत्वमसि… बुद्धीची देवता! तत्वज्ञानाचे दाखले देऊन आम्हां पामरांची समजूत काढणे तुला काय कठीण?’
‘प्रश्न समजुत काढण्याचा नाही, प्रश्न समजून घेण्याचा, सर्जन आणि वि-सर्जन दोघांचे भान असण्याचा आहे!’
‘म्हणजे?’
‘सांगतो.’

‘सप्तचिरंजीवांपैकी एक, पराशरपुत्र वेदमुनी महर्षी व्यासांनी वेद, पुराणं, महाभारत अशा अनेक प्राज्ञ रचना केल्या. ब्रह्मदेवाच्या सल्ल्यानुसार लेखनिक म्हणून त्या कार्यात सहकार्य करण्याची त्यांनी मला विनंती केली. खरं सांगायचं तर हे काम करण्यास मी काही फारसा उत्सुक नव्हतो. ते शक्य तितके लवकर आटोपावे म्हणून मी अट घातली की त्यांनी अखंड, विनाविराम श्लोक रचित जावे जेणेकरून मला न थांबता माझे लेखनकार्य सत्वर सिद्धीस नेता येईल. माझी चलाखी महामुनींनी क्षणार्धात ओळखली आणि त्यांनीही एक अट घातली… 
‘मी अखंड रचित जाईन, पण आपण जे लिहितो आहोत त्याचा अर्थ तुला समजायला हवा. न समजता-उमजता तू एक अक्षरही लिहिता कामा नये!’ 

स्वतःच्या बुद्धी आणि प्रज्ञेवर माझा पूर्ण विश्वास असल्याने मी ती अट सहज कबूल केली आणि आमचे कार्य सुरु झाले. लिहिता लिहिता माझ्या लक्षात आले की व्यासमुनी अधूनमधून अवघड श्लोक सांगत आहेत. त्याचा अर्थ लावायला मला थोडा अधिक अवधी लागत असे. तेवढ्या वेळात मुनीवर पुढील श्लोक रचून तयार ठेवीत असत. त्यांच्या या विलक्षण प्रतिभेने मी मंत्रमुग्ध झालो आणि अधिकाधिक मन लावून समजून घेण्याचा प्रयत्न करू लागलो.’

‘हे सगळे चमत्कारिक आणि अलैकिक आह! अर्थात हे महामुनी आणि बुद्धीदेवातले आदान-प्रदान असल्याने ते तसे असणारच म्हणा, आम्हां सामान्यांच्या आवाक्याबाहेरचे…!’
‘मुळीच नाही! कुठलाही शास्त्रविचार हा विद्वत्ता मिरविण्यासाठी मांडला जात नसतो, तो अंतिमतः सर्वसामान्यांच्या हितासाठीच योजलेला असतो, फक्त जजमेंटल न होता आणि कुणालाही जज न करता तो समजून घेता यायला हवा.’
‘आता तूही आम्हांला ‘जज’ न करता यातले आमचे ‘हित’ समजून सांगितलेस तर बरे!’
‘असं बघ, खळखळत्या पाण्यासारखे प्रवाही जीवन हे सोप्या श्लोकांसारखे आहे, ते सहज, अखंड वाहत असते. पण प्रवाहाचा रेटा अनियंत्रित होऊन विनाशकारी ठरू नये म्हणून त्याचे नियोजन करणे, त्या प्रवाहाच्या वेगाला कुठेतरी बांध घालणे आवश्यक असते. ते नियमन, तो बांध म्हणजे अवघड श्लोक, जे वाटेत आले म्हणून गडबडून जायचं नसतं, त्या निमित्ताने आपली जाण, आपले भान अधिक सजग करायचे असते. मिळालेला वेळ, जे घडले त्याच्या विश्लेषणात, अन्वयार्थ लावण्यात, समजून घेण्यात सत्कारणी लावायचा असतो.’
‘म्हणजे आमच्या सिग्नल किंवा स्पीडब्रेकर्ससारखं म्हण की, देवा!’
‘मलाही ती प्रतिमा वापरण्याचा मोह झाला होता, पण त्या वाहतूक नियंत्रक दिव्यांच्या रंगात भेद न करणारे उदंड रंगनिरपेक्ष वाहनचालक आणि काही काही अशास्त्रीय तथा विध्वंसक गतिरोधक पाहून - ते वाहनांची गती रोखण्यासाठी आहेत, समस्त वाहनच निर्दाळण्यासाठी आहेत की चालकाच्या मेरुदंडाची परीक्षा घेण्यासाठी - हे न कळल्याने मी तो मोह टाळला. असो.’
‘देवा, तुझीही विनोदबुद्धी दूरदर्शनवरील हास्यास्पद कार्यक्रम बघून फारच तल्लख झालेली दिसते. तर तू सांगत होतास…’
‘हो, उगाच राजकारण्यांसारखं विषय भरकटवू नकोस! खरी गंमत तर पुढेच आहे.’
‘यात गंमतही आहे?’
‘ती असतेच, फक्त पाहण्याची निकोप, मिश्किल दृष्टी हवी!’

‘तर असे आमचे लेखनकार्य सुरु असतांना, सतत लिहिण्याच्या ताणाने म्हण किंवा जे लिहितो आहे त्याच्या आशयभाराने म्हण, माझी पिसाची लेखणी मोडली!’
‘काहीतरीच काय देवा, तुझी लेखणी मोडायला तो काय चायनीज स्वस्त आणि टाकाऊ बॉलपेन होता काय?’
‘अरे, गोष्टी पडायच्या, मोडायचा किंवा कोसळायच्या असतात तेव्हा कसलेही निमित्त पुरते, समुद्र किनाऱ्यावरच्या खोपटाचे झावळ्यांचे छप्परही न उडवू शकणाऱ्या वाऱ्याच्या वेगाचे देखील… काय समजलास?’
‘…आणि त्यायोगे आणखी काहीतरी भव्यदिव्य घडणार असते, ते मी विसरलोच! सॉरी, काहीही जज करायचं नाही असं ठरलंय नाही का आपलं, चुकलो!’
‘तर मुद्दा असा की माझी लेखणी मोडली पण दिलेल्या शब्दाला जागणे भाग होते. तेंव्हा स्वीकृत जबाबदारीत हेळसांड नको आणि तत्परतेने काही करायला हवे म्हणून मी माझा एक दात उपटून काढला आणि त्याची लेखणी केली. त्यामुळे तेव्हापासून मला ‘एकदन्त’ हे नवीनच नामाभिदान मिळाले ते वेगळेच.’
‘तू पण ग्रेटच आहेस हं देवा! साधी सही करायला सुद्धा दुसऱ्याचे पेन वापरणाऱ्या आणि जमले तर ते आपल्याच खिशाला लावून घेणाऱ्या आम्हां माणसांकडून तू काहीच कसे शिकत नाहीस? चक्क स्वतःचाच दात उपटलास? सतत दुसऱ्याचे दात उपटण्यात किंवा त्याच्याच घशात घालण्यास सिद्ध असलेल्या मानवांकडून एखादीतरी ‘सिद्धी’ मिळवायचीस!’
‘लेको, तुम्ही कितीही फाजील लाडाने ‘बाप्पा, बाप्पा’ करून मला माणसावळण्याचा प्रयत्न केलात तरी मला पार्थिवातही माझे देवत्व जपायला नको? आपला ‘धर्म’ पाळायला नको? ‘सारेच करतात!’ आणि ‘चलता है!’ म्हणत, निष्ठा-मूल्य-तत्व सोयीस्कररीत्या मागच्या खिशात टाकून कळपात सामील व्हायला आणि खुर्चीवर बसतांना ते पडलेच तर, ‘गडबडीत कुठे हरवले कुणास ठाऊक!’ म्हणायला मी ना हाडामांसाचा मानव आहे ना हाडाचा राजकारणी! आणि ‘सिद्धी’च कौतुक तू मला नको सांगूस…!’
‘सॉरी देवा, माणसांत राहून त्यांच्यासारखा क्षुद्र विचार करायची सवय झाल्याने माझ्याकडून आगळीक झाली. वन्स अगेन माय सिन्सिअर अपॉलॉजी. तू नसलास तरी मी मर्त्य मानवच असल्याने माफी मागून मोकळं होण्याची सिद्धी मी साधलीय… त्यांच्याकडून!’

‘असो! या विषयांना ना खोली आहे, ना अंत, ना अर्थ, निष्कारण माझा खोळंबा तेवढा व्हायचा, निघू दे आता मला…’
‘हो, तुला आत्ता निरोप दिल्याशिवाय, ‘पुढच्या वर्षी लवकर या' कसे म्हणणार…? पण ते गमतीचं काय?’
‘कुठल्या गमतीचं?’
‘तू देणार होतास ना जातांना, विसरलास?’
‘अरे, आपले आगत-स्वागत-कौतुक होत असतांना हुरळून जाऊन तोंडाला येईल ते बोलायला आणि वेळ आली की ‘तो मी नव्हेच’ म्हणायला मी अजून कुठलीच नाटक कंपनी जॉईन केली नाहीये आणि कुठलाच फॉर्म भरला नाहीये. शिवाय, ना मी व्यापारी आहे ना दलाल. मी माझ्या भक्ताला फसवेन कसा? तर ती गंमत म्हणजे… विवेक!’
‘विवेक…?’

‘हो, विवेक!
समजल्या-उमजल्याशिवाय, ‘मना’ला पटल्याशिवाय कशाचेही अनुसरण, अनुकरण, फॉरवर्ड न करण्याचा… विवेक!
आजच्या कृत्रिम बुद्धिमत्तेच्या बेगडी काळात, दिसते किंवा कानावर पडते त्यावर भक्तिभावाने अंधविश्वास न ठेवता ते अभ्यासाने पारखून पाहण्याचा… विवेक!
आयुष्यात अडचणीचे प्रसंग आले की विमनस्कता दाटून येणारच. अशा परीक्षा पाहणाऱ्या क्षणांना गुरु करण्याचा… विवेक!
आपल्या जीवनधारणांशी प्रामाणिक राहून आपली स्वीकृत जबाबदारी निष्ठेने, प्रेरणेने आणि चिकाटीने पार पाडण्याचा… विवेक!
‘परिवर्तन ही संसार का नियम है’ - सर्जनाबरोबर विसर्जनही येते याचे भान ठेवून संयम बाळगण्याचा, धीरोदात्तपणे प्राप्त परिस्थिती स्वीकारण्याचा… विवेक!
महाभारताच्या युद्धामध्ये, दानशूर, धुरंधर योद्धा आणि अर्जुनापेक्षा कणभर सरसच असलेल्या कर्णाचा पराजय काय सांगतो. सतत इतरांची असूया, इर्षेने वाढणारा द्वेष, जे आपले नाही ते बळकविण्यासाठी संघर्षाची खुमखमी बाळगली तर विवेकाचा नाश होतो आणि विनाशाला आमंत्रण होते. म्हणून धैर्य-शौर्याबरोबर जपायचा तो… विवेक!
‘विश्वाचे आर्त…’ जाणून ज्ञानदेवांनी केलेली विश्वप्रार्थना आणि ‘बुडतां हे जन न देखवे डोळां’ हे तुकोबारायांचे समाजभान जागृत ठेवून स्वयंप्रेरणेने जनजागृतीसाठी जो जागर करता येईल तो करत राहण्याचा… विवेक!
स्नेह, संवेदना, बंधुता, सौहार्द, जाणीवा यांचे नित्य सर्जन आणि...
षडरिपूंचे सतत विसर्जन करण्याचा... विवेक!      

एकदन्त होऊन मी माझ्या दाताची लेखणी केली, गर्दीतला एक सामान्य माणूस म्हणून तू दातांच्या कण्या करून जनहिताच्या चार गोष्टी तर सांगू शकतोस? शेवटी, ‘व्यासोच्छिष्टम जगत्सर्वंम…’ हेच सत्य, मी नवीन काय सांगणार?’
‘देवा, आपल्या ऋणानुबंधातले, ऋण सारे तुझे आणि बंध सारे माझे हे आज मला नव्याने जाणवले… मधले ‘अनु’सरणीय ते शोधण्याचा माझा प्रयत्न असाच निरंतर चालू राहील, लेखणीला तुझा आशिर्वाद तेवढा असू दे…’

'तथास्तु !’

शनिवार, ७ सप्टेंबर, २०२४

स्वागत...!


‘आलास, ये…!’
‘पोहचलो बाबा एकदाचा!
विमानं आणि ड्रोन यांना टाळत भूतलावर पुण्यनगरीत पाय ठेवला तर, काय ती ट्रॅफिक आणि काय ते रस्ते? नळस्टॉपला तर माझा मूषक मरता मरता वाचला!’
‘देवा, वर्षातून एकदाच येतोस आणि तुझी ही अवस्था, आम्हां भक्तांचा विचार कर, आम्ही हे रोज सकाळ-संध्याकाळ भोगत असतो… विनातक्रार!’
‘का? तक्रार का नाही करीत तुम्ही? याला कुणीतरी जबाबदार असेल ना?’ 
‘दहा दिवसांसाठी पाहुणा म्हणून आला आहेस, उगाच आमच्या भोगांच्या खोलात नको शिरूस.
मस्त रहा, मजा कर! ढोल-ताशे, गाणी ऐक, आवडतील त्या फ्लेवरचे मोदक मनसोक्त खा, भक्तांना आशीर्वाद दे आणि आपल्या घरी रवाना हो. आम्हाला आमचे जिणं भोगू… आपलं, जगू दे!’
‘असं का म्हणतोस? मला परका समजतोस का? मग कशाला प्रेमाने बाप्पा बाप्पा करत असतोस?’
‘तसं नाही रे देवा! तुझ्याशिवाय आम्हाला आहेच कोण तारणारा? पण आभाळंच फाटलं असेल तर ठिगळ कुठे आणि किती लावणार?’
‘म्हणजे, मला समजलं नाही…?’

‘असं बघ देवा, 
गाव-खेडे किंवा छोटे-मोठे शहर नाही, ‘स्मार्ट सिटी’ म्हटल्या जाणाऱ्या शहरांच्या रस्त्यांची आणि वाहतुकीची ही दयनीय, शोचनीय अवस्था… 
नाल्यांवर होणाऱ्या अतिक्रमणांनी पाण्याचे बदलते प्रवाह आणि ओढे-नाल्यांपेक्षा वाईट अवस्था नदीची, समुद्राची आणि एकूणच पर्यावरणाची…
सुशिक्षित, सुसंस्कृत आणि सुरक्षित मानल्या जाणाऱ्या शहरांमध्ये कचऱ्याच्या ढिगाऱ्यांसारखे रोज वाढणारे गंभीर, हिडीस गुन्हे…
महापुरुषांचा आपल्या राजकीय फायद्यासाठी वापर करण्यास जराही न कचरणारे आणि शक्तिप्रदर्शनासाठी वाट्टेल त्या थराला जाणारे वाचाळ, संवेदनाहीन, अविवेकी राजकारणी… 
मतपेटीच्या राजकारणासाठी करदात्यांच्या जीवावर राबविल्या जाणाऱ्या योजना आणि त्यांचाही मोह न सुटणारे अपात्र, नालायक, निर्ल्लज लाभार्थी...
शिक्षण आणि संस्कृती या क्षेत्रांमध्येही, मुलांच्या भविष्याशी तडजोड करीत सर्रास चालणारा बुभुक्षित, लाचार गैरव्यवहार…
कशा कशाला ठिगळं लावायचं आणि कुणी…?’
‘तू फारच त्रासलेला दिसतोस साऱ्या परिस्थितीने?
अशा उद्विग्न मनाने माझं स्वागत करणार आहेस…?’
‘माफ कर देवा, मला तुला तसा फील द्यायचा नव्हता पण तू विचारलंस म्हणून वर्षभराचा विषाद बाहेर पडला… मला माफ कर!’
‘वेडा आहेस का? माफी कसली मागतोस…?
मला काय तुझी मनस्थिती समजत नाही? आणि तू मला नाही तर कुणाला सांगणार आहेस…?’
‘थँक्स देवा, मला समजून घेतल्याबद्दल. चल तू फ्रेश हो, मी पूजेची तयारी करतो…’
‘हो, अवश्य! बरं, आता माझं एक ऐकायचं… 
पुढचे दहा दिवस या कशाचाही विचार न करता निखळ, निकोप मनाने माझा पाहुणचार करायचा. 
मग जातांना मी तुला एक गंमत देईन. कबूल…?’

‘कबूल…!’