शनिवार, ७ सप्टेंबर, २०२४

स्वागत...!


‘आलास, ये…!’
‘पोहचलो बाबा एकदाचा!
विमानं आणि ड्रोन यांना टाळत भूतलावर पुण्यनगरीत पाय ठेवला तर, काय ती ट्रॅफिक आणि काय ते रस्ते? नळस्टॉपला तर माझा मूषक मरता मरता वाचला!’
‘देवा, वर्षातून एकदाच येतोस आणि तुझी ही अवस्था, आम्हां भक्तांचा विचार कर, आम्ही हे रोज सकाळ-संध्याकाळ भोगत असतो… विनातक्रार!’
‘का? तक्रार का नाही करीत तुम्ही? याला कुणीतरी जबाबदार असेल ना?’ 
‘दहा दिवसांसाठी पाहुणा म्हणून आला आहेस, उगाच आमच्या भोगांच्या खोलात नको शिरूस.
मस्त रहा, मजा कर! ढोल-ताशे, गाणी ऐक, आवडतील त्या फ्लेवरचे मोदक मनसोक्त खा, भक्तांना आशीर्वाद दे आणि आपल्या घरी रवाना हो. आम्हाला आमचे जिणं भोगू… आपलं, जगू दे!’
‘असं का म्हणतोस? मला परका समजतोस का? मग कशाला प्रेमाने बाप्पा बाप्पा करत असतोस?’
‘तसं नाही रे देवा! तुझ्याशिवाय आम्हाला आहेच कोण तारणारा? पण आभाळंच फाटलं असेल तर ठिगळ कुठे आणि किती लावणार?’
‘म्हणजे, मला समजलं नाही…?’

‘असं बघ देवा, 
गाव-खेडे किंवा छोटे-मोठे शहर नाही, ‘स्मार्ट सिटी’ म्हटल्या जाणाऱ्या शहरांच्या रस्त्यांची आणि वाहतुकीची ही दयनीय, शोचनीय अवस्था… 
नाल्यांवर होणाऱ्या अतिक्रमणांनी पाण्याचे बदलते प्रवाह आणि ओढे-नाल्यांपेक्षा वाईट अवस्था नदीची, समुद्राची आणि एकूणच पर्यावरणाची…
सुशिक्षित, सुसंस्कृत आणि सुरक्षित मानल्या जाणाऱ्या शहरांमध्ये कचऱ्याच्या ढिगाऱ्यांसारखे रोज वाढणारे गंभीर, हिडीस गुन्हे…
महापुरुषांचा आपल्या राजकीय फायद्यासाठी वापर करण्यास जराही न कचरणारे आणि शक्तिप्रदर्शनासाठी वाट्टेल त्या थराला जाणारे वाचाळ, संवेदनाहीन, अविवेकी राजकारणी… 
मतपेटीच्या राजकारणासाठी करदात्यांच्या जीवावर राबविल्या जाणाऱ्या योजना आणि त्यांचाही मोह न सुटणारे अपात्र, नालायक, निर्ल्लज लाभार्थी...
शिक्षण आणि संस्कृती या क्षेत्रांमध्येही, मुलांच्या भविष्याशी तडजोड करीत सर्रास चालणारा बुभुक्षित, लाचार गैरव्यवहार…
कशा कशाला ठिगळं लावायचं आणि कुणी…?’
‘तू फारच त्रासलेला दिसतोस साऱ्या परिस्थितीने?
अशा उद्विग्न मनाने माझं स्वागत करणार आहेस…?’
‘माफ कर देवा, मला तुला तसा फील द्यायचा नव्हता पण तू विचारलंस म्हणून वर्षभराचा विषाद बाहेर पडला… मला माफ कर!’
‘वेडा आहेस का? माफी कसली मागतोस…?
मला काय तुझी मनस्थिती समजत नाही? आणि तू मला नाही तर कुणाला सांगणार आहेस…?’
‘थँक्स देवा, मला समजून घेतल्याबद्दल. चल तू फ्रेश हो, मी पूजेची तयारी करतो…’
‘हो, अवश्य! बरं, आता माझं एक ऐकायचं… 
पुढचे दहा दिवस या कशाचाही विचार न करता निखळ, निकोप मनाने माझा पाहुणचार करायचा. 
मग जातांना मी तुला एक गंमत देईन. कबूल…?’

‘कबूल…!’

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा