रविवार, १५ जानेवारी, २०१७

उत्कट...!


परवा संध्याकाळी संदीप, वैभव आणि मिलिंदने चालू केलेली इर्शादची मैफिल, संक्रांतीची सकाळ उजाडली, मानवी आयुष्याच्या भाष्यकारांनी माझ्या आयुष्याचं सार्थक करण्याच्या व्रताला जागून जगभरातले बोधामृत माझ्यावर व्हॉटसपले आणि सूर्यदेवाच्या संक्रमणानी निसर्गात होणाऱ्या मनोहारी बदलांपेक्षा माझ्या बोलण्यात माधुर्याची अतार्किक तथा असंभव अपेक्षा केली; तेव्हा देखील बॅकग्राऊंडला सुरुच होती. संक्रात सरून मरगळलेला निवांत रविवार देखील आवरतं घेतोय आणि अंगावर येऊ घातलेला सोमवार दटावतोय तरी '...ये जो मनकी सीमा रेखा है...' चालूच! मग तोच धागा पकडून, कोळशाच्या खाणीत हिरा सापडतो म्हणतात तसे, रोज सकाळी (आणि प्रसंगी भक्क दुपारी, कातर संध्याकाळी आणि अवचित मध्यरात्री अवघड क्षणी देखील!) बरसणाऱ्या हितेच्छूकांच्या मेसेजेसच्या भाऊगर्दीत (इतके लोक माझे भले होण्यासाठी अहोरात्र धडपडत असतांना ते होत का नाही...? कलियुग दुसरे काय!) कधी कधी खणखणीत, बावनकशी, प्रच्छन्न, उत्कट, अनाघ्रात असा गद्य विचार किंवा पद्य विकार (पद्यात विचार नसतो असे जाणकार सांगतात!) सापडतो आणि त्याच्या धन्याचा थांग लागत नाही तेव्हा येणारी अस्वस्थता ही, कवितेची शेवटाची ओळ न सुचण्याच्या हुरहुरीपेक्षा कणभरही कमी नसते. 

गेल्या आठवड्यात, मला माणसात आणण्याचे असिधारा व्रत घेतलेल्या करुणाष्टकाने मला धाडलेल्या एका 'असे वाटते आजकाल...' शी भावबंध सांगणाऱ्या कवितेने झोप उडवली होती. संक्रमणाच्या निमीत्ताने त्या महाभागाला गाठायचा चंग बांधला आणि 'गुगल' दिमतीला असतांना किती वेळ गुलदस्त्यात रहाणार होते बच्चमजी! 'शतानंद' असे शिगोशीग पारमार्थिक नाव धारण करून ब्लॉगणारं हे बेणं वयाने आमच्यापेक्षा लहान भासूनही, प्रकाश संत ते आयन रँड व्हाया नेमाडे मास्तर असं सरळ वळणाने भेटल्यामुळे, 'बाकी शून्य'चा आणखी एक पंखा दृगोच्चर झाला आणि यात्रेत हरवलेला लंगोटी यार सापडावे तसे झाले.... गेल्या वर्षीची संक्रांत वैभवच्या '...तुम्ही व्हॉट्सऍपवर आहात ना... मग मी तुमचा आहे!' ने साजरी केली होती; यंदाची संक्रांत (जी 'तिळकुटी(?) चतुर्थी' पर्यंत लागू असते... इति करुणाष्टकं, आमची टाळकुटी अमावस्या आमरण लागू असते!), हे काला धन ऐवजी जे गुप्तधन सापडले आहे त्याच्या नावे... जाणकार आणि जिज्ञासूंनीं 'शतानंद'ला जरूर भेट द्यावी पण स्वतःच्या जबाबदारीवर! पुलंच्या भाषेत 'शरीराप्रमाणे मनावर देखील कोड असणारी...' आणि मंगूमामांच्या भाषेत 'स्पिरिच्युअली कॉन्स्टीपेटेड' अशा 'भाषा शुचिता'वाले विद्वान आणि फालतूगिरी करून हसणे अब्राह्मण्यम मानणाऱ्या जमातीने शक्यतो तिकडे फिरकू नये. मराठी भाषेचा गोडवा तिथे भलत्याच ठिकाणहून पाझरतांना पाहून नाक मुठीत धरायची वेळ यायची... तेव्हा सांभाळून!

तर कालच्या मकर संक्रांतीच्या शुभेच्छा 'शतानंद'च्या या ओळीतून...

एखाद्या रात्री कधीतरी जमा होतात सावल्या,
गरम होतात डोळे नि तडतडतात बाहुल्या..
मुक्यानेच सांगू लागतं दुखलेलं पाणी, 
इतकं हळवं चुकूनसुद्धा असू नये कोणी..

गाऊ नये कोणी कधी उदास उदास गाणी,
कळावीत सारी दुःखं इतकं होऊ नये ज्ञानी..
वाचूच नये मुळात कुठलं जाडजूड पुस्तक,
विचारांपासून शक्यतो दूर ठेवावं मस्तक..

जशी नजरेस दिसतात तशीच पहावीत चित्रं,
जसे आपल्याशी वागतात तसेच समजावेत मित्र..
उगाच फार खोल आत नेऊ नये दृष्टी,
खऱ्या समजाव्यात साऱ्या सुखांताच्या गोष्टी..

पेनाच्या जिभेवरच सुकू द्यावी शाई, 
फार त्रास होईल असं लिहू नये काही..
हळवं बिळवं करणारे मुळात जपूच नयेत छंद,
करून घ्यावीत काळोखाची सगळी दारं बंद..

सायंकाळी एकटं एकटं फिरू नये दूर,
समुद्रकिनारी लावू नये आर्त, उत्कट सूर..
चालू नये सहसा फार ओळखीची वाट,
भेटलंच अगदी कुणी तर मिळवावेत हात..

जमल्यास चारचौघात बघावं थोडं मिसळून,
लहान मुलासारखं कधीतरी भांडावं उसळून..
आवडणार नाही पंचमीच्या चंद्राची कोर,
एवढंसुद्धा कोणी कधी होऊ नये थोर..

घट्ट घट्ट बसलेल्याही सुटतातच गाठी,
कपाळावर म्हणून सारखी आणू नये आठी..
साकळू देऊ नये फार खोल खोल रक्त,
कुणापाशीतरी नियमित होत जावं व्यक्त..

माणसांचं मनास लावून घेऊ नये फार,
होऊ द्यावा थोडा हलका त्यांचासुद्धा भार..
तुटून जावीत माणसं एवढं पाळू नये मौन,
वरचेवर करत जावा प्रत्येकालाच फोन..

ठेऊ नये जपून वहीत पिंपळाचं पान,
साध्यासुध्या गोष्टीत असा गुंतवू नये प्राण..
जमा होत राहील सारखा पापणीआड थेंब, 
इतकंसुद्धा मन लावून करू नये प्रेम..

श्वास घेणंसुद्धा अगदीच वाटू लागतं व्यर्थ,
शोधत बसू नये म्हणून जगण्याचा अर्थ..
वाटलं जर केव्हा सगळं सगळं आहे शून्य,
आहे हे असं आहे हे करून घ्यावं मान्य..” 

इतकं समजावूनसुद्धा जमा होतात सावल्या,
गच्च गच्च होतात डोळे, थरथरतात बाहुल्या..
आतून आतून सगळ्याचीच मग येत राहते चीड,
दिवस जितका सुटसुटीत तितकीच रात्र गिचमीड...

जियो यार, शतानंद... शत प्रतिशत 'आनंद'... ऋषीदा आणि गुलज़ारांचा!
भेटू म्हणे कधी तरी... तोवर तिळगुळ घ्या आणि खरं खरं बोला!

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा