शनिवार, १८ नोव्हेंबर, २०१७

चित्रपती...!

महाराष्ट्राच्या औंध संस्थानामध्ये साताऱ्याजवळ, खुनाच्या गुन्ह्यात फाशीची शिक्षा झालेल्या सहा कैद्यांचे पुनर्वसन करून त्यांना आणखी एक संधी देण्याच्या, ‘स्वतंत्रपूर’ अशा अत्यंत समर्पक नाव धारण केलेल्या ‘मुक्त कारागृह’ अर्थात ‘Open Prison’ या मानसशास्त्रीय प्रयोगाबद्दल संवेदनशील साहित्यिक गदिमा (ग. दि. माडगुळकर) यांनी प्रतिभावान आणि सामाजिक जाणिवांचे भाष्यकार निर्माते-दिग्दर्शक शांताराम बापू अर्थात व्ही. शांताराम यांना सांगितले आणि जन्म झाला एका अजरामर चित्रकृतीचा – ‘दो आंखे बारह हाथ!’ १९५७ साली प्रदर्शित झालेल्या या भारतीय चित्रपटसृष्टीतील अभिजात कलाकृतीला बर्लिनच्या ८ व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात ‘सिल्व्हर बीअर’ पुरस्कार मिळाला आणि ‘गोल्डन ग्लोब अवार्ड’ मधील ‘सैम्युअल गोल्डविन अवार्ड’ या श्रेणीत नामांकन देखील मिळाले. १९७५ साली या चित्रपटाचा तामिळ रिमेक ‘पलांदू वाझगा’ (एम. जी. रामचंद्रन व लता) आणि १९७६ साली तेलगु रिमेक ‘मा दैवम्’ (एन. टी. रामाराव व जयचित्रा) प्रदर्शित झाला.

या चित्रपटातील एका दृष्यात व्ही. शांताराम एका बैलाशी झुंज देतांना दिसतात. हा प्रसंग चित्रीत करतांना शांताराम बापूंच्या डोळ्याला इजा झाली पण सुदैवाने त्यांची ‘नजर’ अखेरपर्यंत शाबूत राहिली! ‘ऐ मलिक तेरे बंदे हम’ ही भरत व्यासांची जेवढी निर्मळ तेवढीच व्याकूळ रचना वसंत देसाईंच्या आर्त सुरांनी, लतादिदींच्या स्वर्गीय स्वराने आणि संध्याच्या अप्रतिम मुद्राभिनयाने अजरामर केली ती याच चित्रपटात. ‘इंडिया टाईम्स मुव्हीस्’ने २००५ साली प्रकाशित केलेल्या ‘भारतीय चित्रपट सृष्टीतील चुकवू नये असे २५ चित्रपट’ या यादीत ‘दो आंखे बारह हाथ’ला मानाचे स्थान देण्यात आले असले तरी माझ्यासाठी या चित्रपटाचे स्थान कायम अविस्मरणीय, अतुलनीय आणि अलौकिक असे आहे व राहील. त्याची कथा पुन्हा कधीतरी...

आज हे सगळे आठवण्याचे कारण म्हणजे आज चित्रपती व्ही. शांताराम अर्थात शांताराम बापूंचा ११६ वा जन्मदिन! कृष्ण-धवल चित्रीकरणाच्या (आणि आणखी विविध) मर्यादांमध्ये, मानवी आयुष्याचे इतके कंगोरे, कुठल्याही मोठ्या ‘स्टार’शिवाय, इतके लख्ख उजळवून दर्शकांचे डोळेच नव्हे तर भानही दिपवून टाकणाऱ्या आणि ‘चित्रपती’ अशी सार्थ उपाधी धारण करणाऱ्या शांताराम बापूंना... सलाम! असे चित्रकर्ते आणि त्यांच्या संवेदनशील मुक्त अभिव्यक्तीला ‘श्वास’ घेण्याचे स्वातंत्र्य, स्वतंत्र भारताला निरंतर लाभो हीच प्रार्थना...


जब जुल्मोंका हो सामना
तब तूही हमे थामना...
वो बुराई करे हम भलाई भरे 
नही बदले कि हो कामना...
बढ उठे प्यारका हर कदम 
और मिटे बैरका ये भरम...

ऐ मलिक तेरे बंदे हम 
ऐसे हो हमारे करम
नेकीपर चले और बदिसे टले 
ताकी हसते हुयें निकले दम...!