मंगळवार, २४ एप्रिल, २०१८

'एपिक'...!


कविता ही गोष्टच मुळी अद्भुत अन गूढरम्य.
वर्डस्वर्थच्या व्याख्येनुसार स्वमग्नतेच्या एकांतात उफाळून येणाऱ्या उत्कट भावनांचा उत्स्फूर्त अविष्कार!
खर तर भावनांच्या सच्चेपणा व्यतिरिक्त कवितेला अधिक निकष असण्याचे कारण नाही.
विंदांच्या भाषेत सांगायचे तर कवितेला काय लागते – कागद आणि 'पेन'  'शील'!
पन्नास वर्षे वय वाढल्याने विंदांच्या कवितेच्या निकषात ताल, लय, गेयता आणि आधुनिक ‘मूल्य’ यांची वाढीव भर स्वाभाविकच म्हणायची.
आध्यात्मिक ‘स्वान्त सुखाय’ कर्म जेव्हा लौकिक मोहांकडे झुकते तेव्हा अभिजाततेचा क्षय होण्याची शक्यता अधिक.
कागदाची जागा ‘स्क्रीन’ने, ‘पेन’ची साजरेपणाने आणि ‘शीला’ची व्यवहाराने घेतल्यावर कविता थोडी घुसमटली तर नवल काय?
पण अशा घडीव, बांधील, बेगडी आणि ‘प्रेरित’ काव्यरतिबाच्या काळात काही रानफुले जेव्हा निरपेक्षतेने उमलून वाऱ्यासोबत नि:संदर्भ डोलतात तेव्हा ते पाहण्याचा आनंद जेवढा निखळ असतो तेवढाच तो अनुभव अभिजात... आजच्या पिढीच्या भाषेत ‘एपिक’!

आज हे सगळे आठवण्याचे कारण म्हणजे मधुराणी प्रभुलकर यांनी कवितेची निर्मिती प्रक्रिया कवींकडून जाणून घेण्यासाठी सुरु केलेला उपक्रम ‘कवितेचे पान’ आणि या यू ट्यूब व्यासपीठावर आश्लेषा महाजन यांच्याशी त्यांच्या शंभर प्रेमकवितांचा काव्यसंग्रह ‘मनभावन’ निमितत्ताने केलेले हितगूज. खुद्द कवयित्रीकडून प्राप्त झालेल्या या लिंकबद्दल मन:पूर्वक आभार मानून यावर माझी प्रतिक्रिया जाणून घेण्याची उत्सुकता मी सन्मान म्हणून स्वीकारतो! ‘जन्मजान्हवी’ निमित्ताने झालेला आमचा परिचय ‘वहाण’च्या चर्चेने खुलला तेव्हाचं हे पाणी निराळे असल्याची चाहूल लागली होती. स्त्री-मनाचे पापुद्रे उलगडून दाखविण्याची कवयित्रीची हातोटी विलक्षण आहे हे जाणवले होतेच. तथापि स्त्री-वादी लेखिका, कवयित्री किंवा कुणीही सहसा पुरुषद्वेष्ट्या आणि पर्यायाने विद्रोही आणि म्हणून रुक्ष, परखड तथा अनरोमैंटिकच लिहितात असा एक समज सर्वत्र पहावयास मिळतो, तो या निमित्ताने गैर ठरला!

उभे-आडवे यमक हा ना. धो. महानोरांच्या रचनांमधला मोहक ठसका जेवढा गोड तेवढाच झणझणीत! कवयित्रीच्या या छंदाचे प्रभावी उपयोजन, नावातच ‘तटतटून’ येणारे मेघ आणि...
“घननिळ नभाचा तोल
सुटे, कल्लोळ उफाडा वेडा
कैफात सुखाच्या चूर
नदीला पूर पहा उरमोडा...”
हा अस्सल गावरान विभ्रम प्रेमी मनाला भावला नाही तरच नवल.

तर, सुमंदारमाला या आडव्या वृत्तातला विरूपेच्या रूपकाने येणारा तत्वचिंतक प्रेमभाव वेगळा असला तरी तो देखील विदग्धच आहे. शंभरापैकी केवळ दोनच कविता ऐकून, त्यांच्या उमलण्याच्या प्रक्रियेची उकल कवियत्रीकडूनच ऐकल्याने, उरलेल्या वाचण्याची / ऐकण्याची ओढ लावणारा हा ‘मनभावन’ अनुभवायलाच हवा!

‘कवितेचे पान’ या सृजनात्मक प्रवासाचा अदमास घेण्याचा प्रयत्न करणाऱ्या उपक्रमाबद्दल मधुराणी प्रभुलकर यांचे आभार, प्रेमशतकी काव्यसंग्रह ‘मनभावन’ सादर करणाऱ्या कवयित्री आश्लेषा महाजन यांचे अभिनंदन आणि अधिक सर्जक प्रवासासाठी मन:पूर्वक शुभेच्छा!