शनिवार, १२ मे, २०१८

दिनविशेष...!


आज मातृदिन आणि पपांचा वाढदिवस!

'चला पालकत्व साजरे करू या...' या माझ्या महत्वाकांक्षी उपक्रमाला याहून अधिक चांगला मुहूर्त मिळणे शक्य नाही. आज या कार्यक्रमाची संहिता पक्की करण्याचे काम सुरु करतांना, 'आई-बाप' या विषयी वपुंचे विचार केवळ संस्मरणीयच नाही तर अत्यंत सूचक व म्हणूनच वंदनीय ठरतात.

वपु म्हणतात...

"नजर शाबूत असलेला बाप मुलाला एकदाच जन्म देऊन थांबत नाही, आयुष्यभर तो जन्मच देत असतो. मुलाला मोकळेपणी फिरून देणे, तो एक स्वयंभू जीव आहे हे जाणणं, त्याला त्याची स्वतःची सुखदु:ख आहेत याचं स्मरण ठेवणं, लोभ-मोह-माया या मर्यादांनी तो स्वतंत्रपणे बांधला गेला आहे याची ओळख होणं आणि आयुष्याला सामोरं जाण्यासाठी त्याला सगळे मार्ग मोकळे ठेवणं... हे जो बाप करतो तो प्रतिक्षणी मुलाला जन्म देतो!"

"मुलाच्या हातून एखादी चूक झाली तर आईला तो स्वतःचा अपमान वाटतो, पण बापाला, त्या चुकीचे परिणाम मुलालाच जास्त भोगावे लागतील, याची चिंता वाटते. वार झाला तर आई जखमेवर फुंकर घालते, बाप वरच्यावरच वार पेलून धरतो..."

आयुष्यात ज्यांना असे आई-बाप लाभतात त्यांना निराळे मातृदिन - पितृदिन साजरे करावे लागत नाहीत. आई-बापाची नित्य दखल घेणं, काळजी घेणं हा कर्तव्यभावनेने व्यावहारिक पातळीवर करायचा उपचार न राहता मनोमन जागवायचा संस्कार आणि नित्य सहर्ष साजरा करायचा आचार होतो.

तेंव्हा आजच दिवस अनेकार्थाने खासच... आपण धन्य आहोत या भावनेने आणि ऋणाईत आहोत या जाणिवेने साजरा करण्याचा... मर्मबंधात पिंपळपानासारखा जपून ठेवण्याचा...

...म्हणून आजचा दिनविशेष!

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा