मंगळवार, ३० ऑक्टोबर, २०१८

कवित्व...!

बऱ्याच सुस्त, मरगळलेल्या आणि गढूळ काळानंतर काहीतरी उत्साहवर्धक घडण्याच्या अथांग प्रतीक्षेत एखाद्या रोमांचकारक सहलीची तयारी करावी, मोठ्या उमेदीने विविध पर्यायांचा विचार करून एक निसर्गरम्य ठिकाण [वळणवाटांचे घनगर्द डोंगररस्ते, उंच तुळतुळीत कडे-कपारी किंवा आनंदाची परमावधी म्हणजे समुद्र किनारा, अजून काय?] निश्चित करावे, आपल्या मुशाफिरीला मुक्त कंठाने गायन आणि प्रसंगोत्पात शेरो-शायरीने बहार आणू शकणाऱ्या समान-शिलेषु-व्यसनेषु कंपनीची अत्यंत चोखंदळपणे निवड करावी, कधी नव्हे तो खर्चाचा विचार न करता जे जे करावेसे वाटत होते ते करण्याचा दृढ निश्चय करावा आणि या, जणू काही ‘वन्स-इन-अ-ब्ल्यू-मून’ मिळालेल्या, संधीचा पुरेपूर उपभोग घ्यावा म्हणून तन-मन-धनाने सज्ज व्हावे आणि...

सहलीची सुरवात तर संभाव्य सुखाच्या कल्पनांनी अतिउत्साहात व्हावी पण सुरवातीचा ‘सहलीची मौज’चा भर ओसरल्यावर, टप्प्याटप्प्याने सगळ्यांना आपापल्या ‘स्पेस’ची आठवण व्हावी आणि आजूबाजूला जे घडतय त्याहून व्हॉट्स, फेसबुक, इन्स्टाग्रामवर काहीतरी अधिक मनोरंजक, अधिक अर्थपूर्ण आणि अधिक गुंतवून ठेवणारं सापडेल या आशेने, आपापल्या चौकोनाने प्रकाशलेला चेहरा खालमानेने आणि ‘डंब’ डोक्याने ‘स्मार्ट’फोनमध्ये खुपसून शांतता व्हावी आणि पहिला भ्रमनिरास व्हावा...

ट्रेकिंगमध्ये एक महत्वाचे वळण चुकल्याचे ‘म्होरक्या’ने निर्विकार चेहऱ्याने जाहीर करावे आणि त्यामुळे साधारण एक तास आणि ५ किलोमीटरचा डीटूर दत्तक घ्यायला लागावा आणि या दत्तकविधानामध्ये रखरखीत, तप्त जमीन आणि धूळमाखले रस्ते याशिवाय काहीही हाती लागू नये, उन्हाने जीव पाणी-पाणी झाल्याने पाण्याचा साठ्याने तळ गाठला तर भलताच पाणी प्रश्न निर्माण होण्याच्या कुशंकेने अधिकच कासावीस व्हायला व्हावे आणि त्यामुळे पोटात उसळलेल्या भुकेचा आगडोंब आणखीनच भडकावा...

लांबलेल्या प्रवासाने, त्रासलेल्या शरीराने आणि कोमेजल्या मनाने ‘डेस्टिनेशन’ला पोहचावे तर आपण जी बघितली ती फोटोशॉपच्या सहाय्याने केलेली प्रेझेन्टेशनशी कमाल होती आणि ‘प्रत्यक्षाहून प्रतिमा सुंदर...’ याची प्रचीती होती, प्रत्यक्षात जिवाला मोहून टाकेल असे कुठलेही ‘ठळक वैशिष्ट्य’ नसतांना कल्पनेने मयसभा सजविण्याला मार्केटिंग म्हणतात हे जुनेच ज्ञान ’निर्व्याज’ अक्कलखाती नव्याने जमा करावे आणि, बेड्या घातलेल्या तरी धीरोद्दातपणे वधस्तंभाकडे चालणाऱ्या, चारुदत्ताप्रमाणे मनात यावे... ये वो मंज़िल तो नहीं...’

...अलीकडे ही अशी चित्रमालिका वारंवार डोळ्यासमोरून सरकू लागली होती आणि मन कडू होऊन वैफल्यग्रस्त होण्याच्या मार्गावर होते आणि अचानक, कधीपासून साचून राहिलेले मळभ क्षणार्धात दूर सारत, उन्हाचा एक कवडसा मेघ भेदून धरणीचा ठाव घ्यायला धावावा तसे, एकामागून एक तीन मनोबल उंचावणारे अनुभव पदरात पडले आणि ‘मन पाखरू पाखरू...’ म्हणतात तसे पुन्हा नव्या जोमाने नव्या आभाळात नव्या भराऱ्या मारू लागले...


पहिला अनुभव अत्यंत वैयक्तिक आणि एका अर्थाने कौटुंबिक पण निराळ्या परिप्रेक्ष्यातून खरतर अत्यंत प्रातिनिधिक आणि वैश्विक!

८० च्या दशकात, आमचे आजोबा अण्णा अर्थात बापू केशव पुराणिक उर्फ कवि केशवतनय यांच्या समर्थ लेखणीतून साकारलेल्या ‘गीत ज्ञानेश्वर’ या चरित्र काव्याचे, स्वत: अण्णांच्या रसाळ निवेदनात व बाळासाहेब नाईक यांच्या अभिजात स्वरात, शंभराहून अधिक कार्यक्रम महाराष्ट्रभर सादर झाले. या कार्यक्रमाशी संबधित सर्वच दिग्गज एक एक करून काळाच्या पडद्याआड गेल्याने व बदलत्या काळात बहुतांची बदलती अभिरुची, समाजाची बदललेली मानसिकता, नवमूल्यव्यवस्था यामध्ये हा कार्यक्रम विस्मृतीत जाणे नवलाचे नसले तरी खेदाचे, आणि आमच्यासाठी विषादाचे, नक्कीच होते. म्हणूनच, संहितेच्या आणि संकल्पनेच्या मूळ गाभ्याला कुठेही धक्का न लावता, या कार्यक्रमाचे पुनरु:जीवन करावे आणि नव्या संचात, नव्या चालींसह आणि नव्या स्वरुपात हा कार्यक्रम पुन्हा एकदा रसिकांसमोर आणावा हा आमचा अनेक वर्षांचा मानस!

आमचे वडील पुण्यास कायमस्वरूपी स्थायिक झाल्यापासून गेल्या १० वर्षात त्यांनी अनेक लहानमोठ्या गायक-वादक-संगीतकारांशी या संदर्भात चर्चा केली तथापि अनेक कारणांनी या विषयात म्हणावी तशी प्रगती होऊ शकली नाही. आमच्या आईच्या पुढाकाराने, मुळच्या धुळ्याच्याच असलेल्या आणि बाळासाहेब नाईकांच्याच शिष्या असलेल्या मीनाताई ओक यांची योगायोगाने भेट होऊन त्यांच्याच हातून या कार्यक्रमाला परिणाम मिळाल्याने त्याला काव्यगत न्याय मिळाल्याची भावना आहे. या नवीन संचातील ‘गीत ज्ञानेश्वर’चा शुभारंभाचा प्रयोग एका छोटेखानी, घरगुती सोहळ्यात शनिवार, २७ ऑक्टोबर २०१८ रोजी तेजस सभागृह, कोथरूड, पुणे येथे संपन्न झाला. या निमित्ताने काही जीवलगांची ओझरती का होईना भेट झाली हा स्वार्थ, आपल्या आजोबांची थोरवी नव्याने समजली हा भावार्थ आणि ज्ञानेश्वर माऊली अभिजाततेचा मानदंड असल्याने, रेड्याच्या तोंडून वेद वदवून घेणाऱ्या या संतशिरोमणीच्या केवळ नामस्मरणाने आणि पसायदानाच्या सामुहिक पठणाने एकात्मतेची अनुभूती हा परमार्थ आणि सच्चिदानंद! या संपूर्ण कार्यक्रमाच्या डॉक्युमेंटेशनच्या पोस्ट-प्रॉडक्शनचे काम सुरु असल्याने याविषयी आणखी एक सविस्तर पोस्ट इथे यथावकाश प्रकटू शकते!


दुसरी अत्यंत आनंदाची आणि ‘माझं सुख माझं सुख हंड्या झुंबर टांगलं...’ अशा बहिणाबाईच्या अभिनिवेशात सांगायची आणि मिरवायची गोष्ट म्हणजे 'अरुणा ढेरे' यांची, अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या इतिहासात प्रथमच निवडणुकीशिवाय व एकमताने, ९२ व्या संमेलनाच्या अध्यक्षपदी, झालेली निवड! यावर बऱ्याच ठिकाणी, बऱ्याच लोकांनी अतिशय अभ्यासपूर्ण विवेचन केलेलं असल्याने आणि खुद्द अरुणा ताईंनी त्यांची भूमिका दूरदर्शनवरील काही वाहिन्यांच्या मुलाखतीत स्पष्ट केलेली असल्याने त्याचे विश्लेषण करण्याचे ना माझा हेतू आहे न अधिकार. एका सार्वजनिक लोकशाहीवादी आणि संवेदनशील प्रक्रियेस या निमित्ताने दिशा आणि बळ मिळेल आणि अनेकांना फेसबुकपलीकडे काही अस्सल, अभिजात तथा अस्खलित लिहिण्याची प्रेरणा मिळेल आणि वाचन संस्कृती देखील समृद्ध होईल... ही अपेक्षा!

मला या निमित्ताने झालेला मनस्वी आनंद तेवढा व्यक्त करायचा आहे. अरुणा ढेरे या संशोधक, साहित्यिक म्हणून किती मोठ्या आहेत, त्यांची ग्रंथ संपदा केवढी आहे आणि त्यांना कुठले कुठले पुरस्कार मिळाले आहे याची खानेसुमारी करून नैबंधिक [आणि नैमित्तिक] लिहिणे सहज शक्य आहे पण त्यातून भाव व्यक्त होईलच असे नाही; त्यासाठी कविताच हवी आणि अरुणाताई तिथेही आपला ठसा उमटवतात म्हणून आम्हांला फारच प्रिय! हा नमुना पहा...

‘गळून जाण्याच्या भीतीनं व्याकुळ पाकळ्यांनी
स्वत:मधल्या पोकळीलाच थरथरून पांघरून घ्यावं,
तसे शब्द पांघरून लपू बघतो.
आपण म्हणे कवी असतो...’

आणि हो, छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक व्हायंचं असेल तर ते सर्वसामान्यांच्या मनात व्हावं...’ या त्यांच्या जाहीर मतामुळे त्या आम्हाला अधिकच जवळच्या वाटतात हे सांगणे न लगे...!

आमचे तिसरे आनंद निधान म्हणजे...

दिवाळीच्या आगमनाची चाहूल लागते दसऱ्याच्या रेंगाळलेल्या कवित्वातून आणि मोती साबणाच्या जाहिरातीतून, घराचा कानाकोपरा लख्ख करण्यासाठी झटणाऱ्या आणि फराळाच्या तयारीसाठी होणाऱ्या गृहलक्ष्मीच्या लगबगीतून, आकाशदिव्यांनी फुललेल्या बाजारातून आणि फटाक्यांच्या दुकानासाठी उभारण्यात येणाऱ्या गाळ्यांतून, बोनसचा वेध आणि खरेदीची ओढ लावणाऱ्या हुरहुरीतून आणि नव्या कोऱ्या वासासह चुरचुरणाऱ्या पानांच्या दिवाळी अंकांच्या वाचन मेजावानीतून!



यंदाच्या दिवाळीत पहिलाच अंक हाती आला तो अरुण शेवत्यांचा विशेषांक ‘ऋतुरंग’, त्याच्या ‘विशेष’ सूत्रासह – ‘बीज अंकुरे अंकुरे’! हे म्हणजे अगदीच ‘आंधळा मागतो एक डोळा...’ झाले! बरं, पान उलटावावे तर पहिलाच बीज संदेश मेघना गुलजार! म्हणजे अक्षरश: ‘मार डाला...’च की नाही? पण नाही, थोडे पुढे जावे तर खुद्द गुलजार त्यांच्या ‘सगेसारे’च्या किशोर मेढेंनी केलेल्या मराठी अनुवादाबद्दल त्यांच्या खास शैलीत टिप्पणी करताय... त्यातील गुलजार आणि ग्रेस यांच्या संबंधांवरच्या, कलबुर्गी आणि बापूंच्या कविता जरूर वाचा... बधीर!

आणि नागराज बाबुराव मंजुळे सुद्धा ‘पिस्तुल्या’च्या निमित्ताने आपली अंतस्थ भावना कवितेतून व्यक्त करतायत...
‘माझ्या हाती
नसती लेखणी
तर
असती छिन्नी
सतार बासरी
अथवा कुंचला
मी कशानेही
उपसतच राहिलो
असतो
हा अतोनात
कोलाहल मनातला’

गेले तीन दिवस हे असे आनंदाचे डोही आनंद तरंग असे चाललेय आणि ‘मला सांगा सुख म्हणजे नक्की काय असत...?’ याचं उत्तर तूर्त तरी सापडल्यासारख वाटतय...

असो, अगदी रहावलं नाही म्हणून एवढं भरभरून लिहिलं, आता थांबायलाच हवं... गुलजार, नागराज, गिरीश कुबेर वाचून झाले असले तरी डॉक्टर आनंद नाडकर्णींची 'रेषामैत्री', दिनेश गुणेंचे 'इदं न मम...' आणि अजून खूप बीजांचे अंकुरणे वाचायचे आहे, अनुभवायचे आहे, जगायचे आहे! तेव्हा तूर्त इतकेच...

आणि हो, सर्व सग्या-सोयऱ्यांचे, साहित्यिक-रसिकांचे आणि अरुण शेवत्यांचे मन:पूर्वक आभार...!

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा