सोमवार, १ ऑक्टोबर, २०१८

‘गदिमा’...!



आम्ही शाळेत असतांना, स्थितप्रज्ञ या शब्दाचा अर्थ आणि संत माणूस या संबोधनाचे आकलन ज्यांच्या व्यक्तीत्वाकडे पाहुन कुणासही सहजच व्हावे अशा, आमच्या सगळ्यात थोरल्या काकांकडे एक फ्रेम केलेला फोटो असे. त्या फोटोतील भारदार व्यक्तीची स्निग्ध नजर आणि विचारी मुद्रा ही आम्हां मुलांना देवघरातल्या समई सारखी शांत पण अंधाराचा ठाव घेणारी वाटत असे. सदर गृहस्थ हे आपलेच कुणी पूर्वज अथवा कुणी संत महंत ज्ञानी वा समाजकारणी असावे अशी शंका आमच्या बालबुद्धीस येत असे. अन्यथा आमचे अत्यंत मितभाषी, विचारी आणि धीर-गंभीर काका त्यांचा फोटो ठेवते ना, असा आमचा दृढ विश्वास असे. आमच्या काकांच्या घराचे अगदी पहिल्यापासून जे एक सात्विक, शालीन आणि संयत रूप असे ते अनेक वादळ-वारे-उन्हं-पाऊस यांस अक्षरश: पुरून उरले आणि काळाच्या बदलत्या प्रवाहातही आपल्या मूळ स्वरुपात आणि संस्कारात तसूभरही दोलायमान झाले नाही याचे जेवढे श्रेय त्या घराच्या घडणीला, त्याच्या संस्कारी पाईकांना, तेवढेच त्या घराच्या आदर्शांना आणि मानदंडांनाही. हे फोटोतील गृहस्थ त्यापैकी एक.

त्या फोटोवर अत्यंत सुरेख वळणदार अक्षरात काव्यपंक्ती होत्या... ‘पराधीन आहे जगती...’ त्या शब्दांचा अर्थ अथवा त्याच्या रचनाकाराची महती समजण्याचे तेव्हां न आमचे वय होते ना प्रज्ञा. तरीही हे काहितरी वेगळे, अर्थपूर्ण आणि आपले आजोबा बोलतात, लिहितात तसे काहीतरी खूप भारी आहे एवढे समजण्याइतकी कुवत आमच्या संस्कारांनी दिली होती. शिवाय मुळात बोलायला अनुत्सुक असलेल्या काकांपाशी फाजील चौकशा करण्याइतके कुतुहूल असले तरी तो आगाऊपणा होईल एवढी समजही होती. तेव्हां ‘जनी वंद्य ते सर्व भावे करावे...’ या प्रात:स्मरणास स्मरून आम्ही त्या गृहस्थांचा आदर करू लागलो.

माध्यमिक शाळेच्या पुढल्या काळात घरात जेव्हा ‘टेपरेकॉर्डर’ नावाची चीजवस्तू आली तेव्हा तिच्यामध्ये वाजविण्यासाठी ‘कॅसेटी’ही आल्या. संस्कारी घरांमध्ये प्रत्येक नवीन वस्तूचे स्वागत जसे पूजा अर्चना औक्षण याने होत असे तसेच घरात आलेला प्रत्येक रुपया-पैसा हा प्रथम देवाला दाखविणे, नव्या वहीवर पहिले अक्षर ‘श्री’ काढणे, नवे कपडे घालून देवाला आणि घरातील वडिलधाऱ्यांना नमस्कार करणे, नव्या वाहनाला (बहुदा सायकल) मंदिरात देवदर्शनासाठी पहिली फेरी मारणे अशा बाळबोध आणि सरळ वळणाच्या साध्या माणसांचा सगळीकडे भरणा होता. याच न्यायाने नवीन ‘टेपरेकॉर्डर’वर प्रथम देवाचे काही वाजवले पाहिजे हा विचार अगदीच नेमस्त होता. देवांच्या आरत्यांची डिस्को भजने, गणपती उत्सवाचा इव्हेंट आणि गणपतीच्या गाण्यांचा डीजे होण्यापूर्वीचा काळ असल्याने तसल्या भाविक गाण्यांचा एवढा सुळसुळाट झालेला नव्हता आणि छोट्या गावातही रसिक शिल्लक असल्याने चांगल्या कसदार गीत-संगीताची केवळ जाणच नाही तर गोडीही होती आणि ओढही.

या पार्श्वभूमीवर एका भल्या पहाटे आमच्या कानावर सूर पडले... ‘स्वये श्री रामप्रभू ऐकती, कुशलव रामायण गाती...!’ त्या शब्दातील मोहक भाव आणि सुरातील प्रामाणिक साद आम्हाला वेडावून गेली आणि तो संबध संच ऐकण्याची उर्मी आम्हांला स्वस्थ बसू देईना. वडिलांना ऑफिसला जाण्याची गडबड असल्याने त्यांच्या मार्गदर्शनाखाली ते उपकरण न बिघडवता चालविण्याचा एक अतिशीघ्र कोर्स करून आम्ही तो सबंध संच ऐकण्याची परवानगी मिळवली. मग काय, ‘राम जन्मला ग सखे...’ पासून जी काही आमची समाधी लागली ती ‘सेतू बांधा रे सागरी...’ या आदेशाने आणि ‘जय गंगे जय भागीरथी...’ या  उद्घोषानेच भंगली. संध्याकाळी वडील ऑफिसमधून आल्यानंतर त्यांच्या त्या संगीत-संस्काराचे आमचे व्हर्जन आम्ही त्यांना साभिनय सादर केले आणि वडील ‘धन्य’ झाले. आम्हाला त्या विषयाच्या रसास्वादनाबरोबर त्याचा आशयही माहीत असावा म्हणून वडिलांनी आमच्या सामान्यज्ञानात भर घातली तेव्हा आम्हाला जे समजले ते म्हणजे, आपण जे ऐकले ते 'गीत रामायण' आणि ज्यांच्या स्वराने आपण वेडावलो ते 'बाबूजी' अर्थात 'सुधीर फडके'!

अमिताभ सिनेमात हिरो असतो म्हणजे तो सिनेमा अमिताभचा ही आमची काव्य-शास्त्र-विनोद-साहित्य-कला विषयातली पोच असल्या कारणाने सिनेमा नाटक हे दिग्दर्शकाचे माध्यम असते हेच समजण्याची पात्रता नव्हती तिथे लेखक या प्राण्याशी आणि त्याच्या एकूणच कलानिर्मितीतील अनन्यसाधारण महत्वाशी आमचा सुतराम म्हणतात तसा संबंध नव्हता. त्यामुळे पुढे अनेक वर्षं ‘गीत रामायण कुणाचे?’ तर ‘बाबूजींचे!’ अशीच आमची समजूत होती. स्वत: स्टेजवर नाटक करण्याचा आणि त्यासाठी लेखकाची परवानगी घेण्याचा प्रसंग आला तेव्हा आम्हाला लेखक महाशयांची, लंपनच्या भाषेत, ‘नीटच’ ओळख झाली. फूल समजल्यावर फळही समजते तसे लेखक समजल्यावर कवि, गीतकार देखील समजू लागले आणि पहिल्यांदाच साक्षात्कार झाला की बाबूजींनी गाण्यापूर्वी गीत रामायण कुणीतरी लिहिले असले पाहिजे, आणि असे काहीतरी लिहिणारा माणूस किती ग्रेट असला पाहिजे... तंतोतंत!

थोड्याशा संशोधनानंतर आम्हाला जो शोध लागला तो आमचा स्वत:चा खासगी आणि वैयक्तिक युरेका मोमेंट! सदर गृहस्थांचे नाव गजानन दिगंबर माडगुळकर असे असून हे हरहुन्नरी, अष्टपैलू, बहुश्रुत तथा बहुमुखी प्रतिभेचे धनी ‘आधुनिक वाल्मिकी’ म्हणून ओळखले जातात व महाराष्ट्रास, ‘तुझिया जातीचा मिळो आम्हां कुणी...’ अशी आस लावून गेलेल्या एका अत्यंत सर्जक व मार्मिक ‘कोट्या’धीशाने त्यांच्या नावाचे लघुरूप ‘गदिमा’ म्हणजे केवळ महाराष्ट्राला लाभलेली – अणिमा, महिमा, गरिमा, लघिमा, रिद्धिमा सिद्धिमा, पराक्रमा, ईशमा या अष्टसिद्धींच्या यादीतील नववी सिद्धी आहे या पुलकित शब्दात गौरवलेली अलौकिक प्रतिभा आहे हे ज्ञात झाले तेव्हा आम्हांस जो हर्षवायू व्हायचा राहिला होता तो आमच्या काकांच्या हृदयमंदिरी मखरात विराजमान असलेले ते हेच महानुभाव हे समजताच झालाच! त्याच बरोबरीने ‘मरण कल्पनेशी थांबे तर्क जाणत्याचा; पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा...!’ या संपूर्ण काव्याची अनेक पारायणे, आवर्तने आणि प्रवर्तने झाली आणि तत्वज्ञानाची गोडी केव्हा आणि कशी लागली ते समजले देखील नाही. ‘ज्ञानदेवे रचिला पाया, तुका झालासे कळस!’ या भावाने गादिमांचा आणि आमचा स्नेहबंध ‘गीत रामायणाने’ जुळला आणि ‘दो आंखे बारह हाथ’ ने फळला, फुलला. हिंदी चित्रपट इतिहासातील अनेक अर्थाने मैलाचा दगड असलेला हा सर्वांगसुंदर चित्रपट सर्वात शक्तिशाली आहे तो त्याच्या अकल्पित, अनवट, भावनोत्कट कथेत आणि घडीव, सुस्पष्ट, गोळीबंद संवादात अर्थात पटकथेत – दोघांचे श्रेय गदिमांचे!

नाव-गाव-कार्य-कर्तुत्व समजण्याअगोदर, केवळ प्रतिमेतून गदिमांची आमच्याशी अबोल भेट घडविणारे आणि समग्र मानवी आयुष्याचे सार तीन शब्दात सांगता येऊ शकते हे ज्ञान असल्याने धीर गंभीर रहाणारे आमचे थोरले काका, गदिमांची विस्तृत ओळख झाल्यावर, आमच्यासाठी खूपच मोठे झाले...!     

आज हे सर्व आठवण्याचे कारण म्हणजे आजपासून गदिमांच्या जन्मशताब्दीवर्षास सुरवात होत आहे आणि त्या निमित्त अत्यंत सुरेख कार्यक्रमांची भोवताली रेलचेल आहे. या सोहळ्यास यशवंतराव चव्हाण नाट्यगृहातील आजच्या ‘गदिमायन’ने जे नमन साधले आहे त्याचा रंग उत्तरोत्तर गहिरा होत जाईल ही अपेक्षा.

गदिमांचे बंधू व्यंकटेश माडगूळकर लेखनाबरोबर रेखाचित्रेही काढीत. त्यांनी गदिमांचे एक पाठमोरे रेखाचित्र काढले आणि त्याला शब्द दिले. 'या माणसाने कधीही घरादाराला पाठ दाखवली नाही...!' अशी एक आठवण आमचे मायाळू शुभचिंतक सन्मित्र प्रदीप रस्से सरांनी सांगितली. ती इथे सांगणे केवळ प्रस्तुतच नाही तर आवश्यक वाटले म्हणून, रस्से सरांची अनुमती गृहीत धरून, हा अगोचरपणा...!  

आणि हो, गदिमांचे नातू ‘सुमित्र सुधीर माडगुळकर’ यांनी गदिमांच्या आठवणी जपण्यासाठी एका संपन्न वेबसाईटची निर्मिती केली आहे व आपल्या फेसबुकपेजवर आजोबांची हृद्य आठवण सांगितली आहे, या दोन्ही लिंक्स आपल्या सोयीसाठी येथे देत आहे, अवश्य भेट द्या.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा