रविवार, १९ एप्रिल, २०२०

द्वंद्व...!



आपल्या अंतर्मनात दोन लांडग्यांच द्वंद्व अहर्निश चालू असत, बर का मुला!
आजोबा आपल्या नातवाला आयुष्याचं तत्वज्ञान गोष्टीरूपाने सांगत होते.
यातला एक लांडगा असतो दुष्ट तो म्हणजे आपला क्रोध, असूया, दु:ख, पश्चाताप, लोभ, मद, विषाद, अपराध-भावना, न्यूनगंड, असत्य, स्वार्थ, खोटा बडेजाव, विधिनिषेधशून्य स्पर्धा, बेगडी प्रतिष्ठा, स्वकेंद्रित क्षुद्रपणा आणि अहंकार.
...आणि दुसरा? लक्षपूर्वक ऐकणाऱ्या मुलाने उत्सुकतेने विचारले.
दुसरा असतो सुष्ट तो म्हणजे आनंद, मन:शांती, प्रेम, आशा, निर्मळ, निरागस भाव, नम्रता, सहानुभूती, भूतदया, सहवेदना, औदार्य, सत्य, करुणा आणि विश्वास! ही लढाई जशी तुझ्या-माझ्या आत चालली आहे तशीच प्रत्येक दुसऱ्या माणसाच्या मनातही निरंतर चालली आहे.
मुलगा थोडा वेळ विचारात पडला आणि बालसुलभ जिज्ञासेने म्हणाला, आजोबा, शेवटी यातला कुठला लांडगा जिंकतो?
आयुष्य बघितलेल्या आजोबांनी सहज स्वरात उत्तर दिलं,
आपण ज्याचं भरण-पोषण करू तो...!
---------------------------------------------------------------------------------
सामान्य परस्थितीत गळेकापू स्पर्धेच्या ऐहिक जगात मानभावी सामाजिक प्रतिष्ठेचं सोंग वठविण्यासाठी पहिल्या लांडग्याचे यथास्थित भरण-पोषण करून आपण त्याला धष्टपुष्ट बनवीत असतोच. आणि पर्यायाने ही अंतर्मनातील लढाई त्यानेच जिंकण्याची सोयही अनायसे करून ठेवीत असतो.

पण आत्ता सारख्या असामान्य, स्पर्धाविहीन, समसमान परिस्थितीत आपण जेव्हा आपल्याच जगण्याकडे थोड्या निवांतपणे आणि ‘सुखदु:खे समे कृत्वा...’ अशा साक्षेपी भावाने पाहू शकतो तेव्हा, नाईलाज म्हणून का होईना, दुसऱ्या लांडग्याला थोडा खुराक लावायला काय हरकत आहे. न जाणो तेवढ्याच पोषणाने तरतरी येऊन एका नव्या आवेशाने तो पाहिल्यावर मात करायचा...?

ततो युद्धाय युज्यस्व नैवं पापमवाप्स्यसि II

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा