रविवार, ६ जून, २०२१

म्होरक्या...!

शरद ऋतूचा काळ होता. आदिवासी आपल्या म्होरक्याकडे गेले. या वेळी हेमंत आणि शिशिरात थंडी कशी  पडेल कडक, सौम्य की नेहमीसारखीच, विचारायला. म्होरक्या मूळचा आदिवासीच असला तरी आधुनिकतेची झळ बसल्याने, निसर्गाशी नाळ अगदीच तुटली नसली तरी पूर्वीसारखी घट्टही राहिली नव्हती. त्यामुळे आकाशाकडे बघून, मातीला नाक, कान लावून आणि वाऱ्याच्या स्पर्शातून पूर्वी जसे वातावरणाचा अंदाज बांधता येई तसा अलीकडे येईनासा झाला असल्याने म्होरक्याला स्वत:चीच खात्री वाटेनाशी झाली होती !

परंतु तो म्होरक्या असल्याने लोक त्याच्याकडे आशेने बघताय म्हणतांना त्याला भाकीत वर्तवणे क्रमप्राप्तच होते. तेव्हा त्याने, हुशारी आणि सतर्कता या आपल्या नेतृत्वगुणांच्या आधारे, लोकांना सांगितले, ‘या वर्षी थंडीचा कडाका चांगलाच असणार आहे तेव्हा तुम्ही सारे आतापासून लाकडे गोळा करून ठेवाल तर बरे !’

आपल्या लोकांना असे सांगितले तर खरे पण आपणही खात्री करून घ्यावी म्हणून म्होरक्याने जवळच्या गावातल्या पोस्टात जाऊन वेधशाळेला दूरध्वनी केला आणि ‘या वर्षी हिवाळा कसा असणार आहे ?’, विचारले. वेधशाळेने सांगितले, ‘या वर्षी हिवाळा कडक असणार असे दिसतंय !’

म्होरक्या आपल्या लोकात परतला आणि त्यांना आणखीन लाकडं गोळा करण्याच्या सूचना दिल्या.

एका आठवड्याने म्होरक्या पुन्हा पोस्टात गेला आणि वेधशाळेशी संपर्क करून म्हणाला, ‘यावेळी कडाक्याची थंडी पडणार आहे असेच आपली यंत्रणा सांगतेय ना ?’ वेधशाळा म्हणाली, ‘अलबत ! या वर्षीचा हिवाळा मोठा कठीण असणार आहे !’

म्होरक्या पाड्यावर परतला आणि आपल्या माणसांना म्हणाला, ‘मित्रांनो, अगदी बारकाईने शोध घ्या आणि लाकडाचा एक एक तुकडा, झाडाचे खोड, ढलपी, फांदी, काडी-कचरा, जे मिळेल ते जमवून ठेवा !'

सुमारे दोन आठवड्यांनी म्होरक्या पुन्हा पोस्टात गेला आणि वेधशाळेशी संपर्क करून म्हणाला, ‘तुम्हाला नक्की खात्री आहे ना की यावर्षी फारच कडाक्याची थंडी पडणार आहे ?’ वेधशाळा म्हणाली, ‘आता तर प्रश्नच उरला नाही, या वर्षी कदाचित शतकातली सर्वाधिक गोठवणारी थंडी पडणार असे दिसतेय !’

‘तुम्हाला एवढी खात्री कशामुळे वाटतेय...?’ म्होरक्याने विचारले.

वेधशाळा म्हणाली, ‘आदिवासी वेड्यासारखे लाकडं गोळा करताहेत...!’

 ---------------------------------------------------------------------------------

पोस्ट पूर्णपणे अराजकीय असून केवळ कार्यकारणभाव समजून घेण्याचा वस्तुपाठ म्हणून सांगितली आहे. फारतर कालच्या विश्व पर्यावरण दिवसाचा ‘उपसंहार’ (आजच्या प्रच्छन्न चंगळवादी काळात किती समर्पक !) समजायला हरकत नाही.

तथापि या निमित्ताने तीन गोष्टींचा उहापोह करायला हरकत नसावी - 

- माणसाची भविष्याचा ‘वेध’ घेण्याची कमकुवत होत चाललेली कुवत.
- समूहांच्या नियोजनातील माणसाची अक्षम्य धोरणशून्यता आणि कमालीचे परस्परावलंबित्व.
- नैसर्गिक परिसंस्थेचा अतिसामान्य (खरतर नगण्य!) घटक असूनही तीवर स्वामित्व गाजविण्याची माणसाची राक्षसी लालसा.

वाचा आणि विचार करा... आधी विचार, मग आचार आणि यथावकाश व्यवहार !

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा