रविवार, ३० मे, २०२१

गॉसिप...!


एके दिवशी सॉक्रेटीसचा एक अनुयायी तावातावाने सॉक्रेटीसपाशी आला. त्याला मुळीच धीर धरवत नव्हता. त्याच्या चेहऱ्यावरून तो खूपच अस्वस्थ आणि उत्तेजित असल्याचे अगदी स्पष्ट दिसत होते. तो सॉक्रेटीसला म्हणाला, ‘महाराज, मी आत्ता आपल्याबद्दल असे काही ऐकले आहे की ते मला आपल्याला ताबडतोब सांगायलाच हवे...'

‘अरे वा, असे आहे का? बघू या तरी...’ नेहमीच्या शांतपणे सॉक्रेटीस उत्तरला.
याला सॉक्रेटीसची अनुमती समजून उतावळा अनुयायी बोलायला लागला,
‘मी आत्ता अमुकला बोलतांना ऐकलं...’
‘हं, हं, थांब जरा. हे बघ कुणीही मला काही सांगू म्हटले तर त्याला माझ्या तीन चाचण्यांवर खरे उतरावे लागते. ही माझी तीन-पदरी चाळणी आहेस म्हणालास तरी चालेल.’
‘महाराज, मी इथे तुम्हाला काही महत्वाचं सांगू पहातोय अन तुम्ही हे चाळण्याचं काय काढलंत?’

‘कसं आहे ना मित्रा, दुसऱ्याबद्दल तिसऱ्याने सांगितलेली गोष्ट चौथ्याला रंगवून सांगणे हा मनुष्य स्वभाव आहे, त्यात आश्चर्य वाटण्यासारखे काही नाही. पण आपण काय ऐकावे आणि कशाकडे दुर्लक्ष करावे हा अधिकार ज्याचा त्याच्याकडे सुरक्षित आहेच की... मी त्याचा तंतोतंत वापर करतो एवढचं !’

‘बरं, बरं... सांगा तरी काय चाळण्या आहेत तुमच्या?’ अनुयायी नाराजीने म्हणाला. त्याच्या उत्साहावर पाणी तर पडलेच होते पण जे ऐकले ते सांगण्याची उर्मी कमी झाली नव्हती.      

‘पहिली चाळणी, जी गोष्ट तू मला सागणार आहेस ती पूर्णत: सत्य असल्याची तुला खात्री आहे...?’
‘तसं मला खात्रीपूर्वक कसं सांगता येईल, ती गोष्ट मला दुसऱ्या कुणी सांगितली आहे...’
‘हरकत नाही, बरं ती गोष्ट माझ्याबद्दलची एखादी चांगली गोष्ट आहे की वाईट आहे...?’
‘खरं तर वाईटच आहे, म्हणून तर मला राग आला आणि ताबडतोब तुम्हाला सांगावीशी वाटली...’
‘असं होय, किती माया करतोस माझ्यावर ! पण तरी एक शेवटची चाचणी तरी पास होते का बघू या...’
‘तेवढी पास झाली तर सांगू द्याल ना मला...?’
‘अवश्य ! आता मला सांग, तू मला जे सांगू म्हणतोयस त्याने माझा किंवा किमान तुझा तरी काही फायदा होणार आहे ? त्या गोष्टीचा मला, तुला किंवा खरं तर कुणालाही काही उपयोग आहे...?
खजील झालेला, हिरमुलेला अनुयायी मान खाली घालून म्हणाला,
‘नाही, महाराज मला नाही वाटत त्या गोष्टीचा कुणालाही, विशेषत: तुम्हाला, काहीही उपयोग होईल...!’
 
‘मित्रा, जी गोष्ट मुळात सत्य आहे की नाही माहित नाही, जी चांगली देखील नाही आणि जिचा कुणालाच काही उपयोग होण्याची सुतराम शक्यता नाही अशी गोष्ट तुला सांगावीशीच का वाटते...? आणि त्यासाठी एवढं अधीर होण्याचं, उत्तेजित होण्याचं काय कारण...? हीच उर्जा अधिक चांगल्या विधायक कामी नाही वापरता येणार...?’

-------------------------------------- 

मुळात ‘गॉसिप’ हे माणसाचं अत्यंत आदिम, सर्वव्यापी आणि मोफत मनोरंजनाचं साधन आहे. अनुपस्थित असलेल्या आपल्या ‘स्नेही’जनांबद्दल अनुचित बोलणे, त्यांच्या सवयी, धारणा, श्रद्धा यांची टिंगल उडविणे हा एक हलक्या प्रतीच्या करमणुकीचा सुलभ (विशेषणाचे निवड जाणीवपूर्वक केलेली आहे !) मार्ग आहे.

त्यातून आजच्या सोशल मिडीयाच्या काळात या गॉसिप प्रकारांना विविधरंगी आणि बहुढंगी व्यासपीठं उपलब्ध झाल्याने सगळीकडे नुसता गदारोळ माजला आहे आणि एकमेकाची उणीदुणी काढण्याची, एकमेकाबद्दल गरळ ओकण्याची जणू काही स्पर्धाच लागली आहे. या पार्श्वभूमीवर सॉक्रेटीसची ही शहाणीव केवळ मार्गदर्शक नाही तर अनुकरणीय ठरावी म्हणून ही उठाठेव !

‘आला मेसेज की ढकल पुढे...’ या सवयीला जरा मुरड घालून, सॉक्रेटीसच्या वरील तीन चाळण्या लावून जे काही गाळीव उरेल(?) तेवढ्याचीच ढकलाढकल करण्याचे आणि सर्वांना सोसल तेवढच सोशल करण्याचे पथ्य पाळले तरी, समाजमाध्यमांच्या नियमन करणाऱ्या व्यवस्थेवरील ताण बऱ्यापैकी कमी होईल...
 
...आणि हो, ‘मना’चा ब्रेक उत्तम ब्रेक’ या तत्वावर आधारित 'सेल्फ-सेन्सॉरशीप इज द बेस्ट सेन्सॉरशीप' हेही लक्षात असू द्यावे म्हणजे अभ्यासोन विवेकाने प्रकटल्यास कुठल्याच कारवाईची, कुठल्याही समाजमाध्यमावर बंदी केली जाण्याची वेळ येणार नाही !

शुभम भवतु !

1 टिप्पणी: