शनिवार, १२ फेब्रुवारी, २०२२

पंचविशी...!


त्याला उपयोगितेचे महत्वच उमजले नाही कधी
वस्तू-व्यक्ती, भावना-कल्पना यांना 'वापरता' येते
इतके साधे-सोपे सोईस्कर 'सत्य' गमलेच नाही त्याला
'अर्थ' आणि 'कारण' दोघांना पारखाच होता तो नेहमी
करायचा निरुपयोगी उद्योग, निर्हेतुक निर्ममपणाने...
म्हणायचा वेळ फार जातो 'उत्पादक' काम करण्यात
होणार नव्हतेच त्याचे काही, नाहीच झाले या मर्त्य जगात !

पण चित्रगुप्ताच्या गफलतीने पोहचला कर्मचाऱ्यांच्या स्वर्गात,
जिथे ज्याला बघावे तो व्यस्त, 'उपयोगी' कामात सतत व्यग्र.
हा हिंडायचा, कायम गडबडीत असणाऱ्या गर्दीचे धक्के खात
किंवा पहुडायचा हिरव्यागर्द माळरानावर निळ्याशार आकाशाखाली
प्राणी-पक्ष्यांच्या जोडीने निसर्गाच्या नाद-रस-रंग-गंधाची किमया अनुभवत 
उमटायच्या त्या जाणीवा चित्र-शिल्प-शब्द-सुरांतून... अभिनिवेशाशिवाय !

ओढ्यावरून पाणी भरायच्या कामात गर्क तिने पाहिले एकदा याला
कर्मचाऱ्यांच्या स्वर्गात एवढा रिकामटेकडा बघून अचंबा वाटला तिला
म्हणाली काम देऊ तुला, माझा एक हंडा देऊ पाणी भरून आणायला?
हा म्हणाला, हंडा दे पण असे उत्पादक उद्योग करायला वेळ नाही मला...
हंडा घेतला आणि उभा-आडवा रंगवून दिला निरर्थक रंग-रेषांनी...
तिला कळेचना याचे काय करावे... पण काहीतरी नवीन जाणीव जागी झाली

यथावकाश त्याने तिचे इतस्ततः उडणारे केस बांधायला रंगीबेरंगी रिबीनी बनवल्या
त्या रिबिनींनी केस बांधून स्वतःला निरखण्यात तिचा कामाचा वेळ वाया जाऊ लागला
केवळ तीच नाही तर आणखीनही काही लोक याच्या नादी लागून कलाकृती करू लागले
आता मात्र धुरिणांना आपल्या स्वर्गात हे निरर्थक लोण पसरणे धोक्याचे वाटू लागले आणि...
त्यांनी याला कर्मचाऱ्यांच्या स्वर्गातून हाकलून लावण्याचे ठरवले, एवढ्यात चित्रगुप्त प्रकटला!

म्हणाला याला चुकूनच इकडे आणले होते, योग्य ठिकाणी नेऊन सोडतो, काळजी नसावी.
त्याला खूपच बरे वाटले, सुटका झाल्यासारखे... इथे कुणाला कशासाठी वेळच नाही म्हणे !
तो निघाला तर... आजवर कधीही ऐकले, बघितले तर काय कल्पिले देखील नाही
असे अघटित त्या दिवशी त्या कर्मचाऱ्यांच्या स्वर्गाने बघितले.
ती चक्क त्याच्या सोबत निघाली, तो जाईल तिथे जायला... 
आणि आणखीनही काही निघाले.
कर्मचाऱ्यांच्या स्वर्गातल्या समस्त ज्येष्ठ-श्रेष्ठ अनुभवी विद्वानांना
त्यांच्या त्या निरुपयोगी निर्णयाचा न हेतू समजला न अर्थ... कधीही !

-----------------------------------------------------------------------------------------

असो, आज ही कथा आठवण्याचे कारण म्हणजे तिने तो निरर्थक, निरुपयोगी, निर्हेतुक निर्णय घेतला त्याला आज २५ वर्षे झाली... बाकी काही नाही ! 

...आणि, पन्नाशीनिमित्त माझ्या अकर्माचे डॉक्टरांनी केलेले मार्मिक निरूपण हे या रूपकाची प्रेरणा असल्याने, त्यांचे मन:पूर्वक आभार !

२ टिप्पण्या:

  1. ना पीछे मुडकर देखिए ना आगे झुककर
    सफर ही सुहानी मंजिल है यह जानकर

    उम्र के हिसाब से बदलती है जान लो जरुरत
    जो मिला है कितना खूबसरत है मान लो फितरत

    उनको मुबारक हो उनकी सूरज सी जन्नत
    दीवाने थे चांद के मिली चांदनी हमारी मन्नत

    खुश रहे वे जिंदगी के तराजू में दौलत तोलकर
    हमतुम पाते है सुकून जमीं आसमां शायरी पाकर

    शायर -डा सचिन

    उत्तर द्याहटवा
  2. सफरही जब सुहाना लगे मंजिलों की किसे जुस्तजू
    हमसफरही मन्नत थी हमारी, वो ही हमारी आरजू   

    उत्तर द्याहटवा