बुधवार, २२ मार्च, २०२३

'गुढी उभारनी'


दोन वर्षांपूर्वीच्या
'कानूस...?' या बहिणाबाईंच्या बोलगीतांवरील पोस्ट मध्ये म्हटल्याप्रमाणे, कुठल्याही प्रकारचे प्रमाणीत डॉक्युमेंटेशन उपलब्ध नसल्याने, तुक्याची गाथा जशी लोकगंगेने तारली तशा बहिणाबाईंच्या रचना खान्देशाने आपल्या श्रुती-स्मृतींमध्ये जिवंत ठेवल्याने त्यांच्याबद्दल खात्रीने काही दावा करता येणे अवघड असले तरी त्यातील अस्सल माणूसपण आणि समृद्ध जाणिवां या निश्चित वैश्विक असल्याने त्यांच्या अभिजाततेबद्दल दुमत नसावे.

आज गुढीपाडव्याच्या निमित्ताने बहिणाबाईंची, शुभेच्छांसोबत दरडावणारी आणि डोळ्यात झणझणीत अंजन घालणारी ही रचना, आजच्या - जाणिवा बोथट आणि भलत्याच संवेदना नको तेवढ्या टोकदार झालेल्या - काळात करण्याचे धारिष्ट्य कुणी करेलसे वाटत नाही. शिवाय, आपल्याच पोटच्या अपत्यांना, पाल्यांना देखील ओरडायची चोरी असणाऱ्या अधुनिक जीवनशैलीत, थेट समाजालाच चार गोष्टी ऐकवण्यासाठी (नीतिमत्ता, नैतिक अधिकार असली थेरं कालबाह्य झाल्याने) जी 'पुण्याई' लागते ती कमावलेला 'ऐसा कौन माईका लाल होगा...?'

तेव्हा आपल्याच भावना बहिणाबाईंनी १०० वर्षांपूर्वी व्यक्त केल्यात असे मानून म्हणू या...

आरंभ होई चैत्रमासीचा
गुढ्या-तोरणे सण उत्साहाचा

गुढीपाडव्याचा सन
आतां उभारा रे गुढी
नव्या वरसाचं देनं
सोडा मनांतली आढी

गेलसालीं गेली आढी
आतां पाडवा पाडवा
तुम्ही येरांयेरांवरी
लोभ वाढवा वाढवा

अरे, उठा झाडा आंग
गुढीपाडव्याचा सन
आतां आंगन झाडूनी
गेली राधी महारीन

कसे पडले घोरत
असे निस्सयेलावानी
हां हां म्हनतां गेला रे
रामपहार निंघूनी

आतां पोथारा हे घर
सुधारा रे पडझडी
करीसन सारवन
दारीं उभारा रे गुढी

चैत्राच्या या उन्हामधीं
जीव व्हये कासाईस
रामनाम घ्या रे आतां
रामनवमीचा दीस

पडी जातो तो 'पाडवा'
करा माझी सुधारनी
आतां गुढीपाडव्याले
म्हना 'गुढी उभारनी'

काय लोकाचीबी तर्‍हा
कसे भांग घोटा पेल्हे
उभा जमीनीच्या मधीं
आड म्हनती उभ्याले

आस म्हनूं नही कधीं
जसं उभ्याले आडवा
गुढी उभारतो त्याले
कसं म्हनती पाडवा ?

~ बहिणाबाई चौधरी

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा