रविवार, १२ नोव्हेंबर, २०२३

विवेकदीप...!

Life is a balance between holding on and letting go...! 
                                                                                                    – Rumi


जलपर्णीने आच्छादलेले पाणी अतिशय नेत्रसुखद वाटते. 

पाण्यावर हिरवागार गालिचा घालावा असे दृष्य मनाला गारवा देते. 
'किती ही निसर्गाची अद्भुत किमया...' असे ही मनास वाटू शकते. 
तथापि जलपर्णी कधीही शुद्ध, नितळ, वाहत्या पाण्यावर पोसली जात नाही. 
ती पोसली जाते पाण्यातील प्रदूषित घटकांवर.
त्यामुळे जलपर्णीचे अस्तित्व हे प्रदूषित पाण्याचे निदर्शक ठरते.
अर्थात जलपर्णी निळकंठासारखे पाण्यातील हलाहल पचवून घेते हेही खरे.
जलपर्णी दूषित पाण्याचे नैसर्गिक पद्धतीने शुद्धीकरण करते यातही तथ्यांश आहेच. 
परंतु जलपर्णीच्या अस्तित्वाने पाण्याचे मूळ प्रवाही, निवळशंख स्वरूप नष्ट होते. 
सूर्यकिरणे पाण्याच्या तळापर्यंत पोहचू शकत नाहीत. 
तेव्हा, 'जलपर्णी मारक की तारक' हा वाद आपण जलतज्ञ आणि पर्यावरणवाद्यांवर सोडून देऊ. 

पण अनिर्बंध 'विकासा'ने येणारी 'समृद्धी' ही या जलपर्णीसारखीच असल्याने तिचा विचार करायलाच हवा. पाणी प्रवाही, निर्मळ, नितळ आणि प्रदूषणमुक्त ठेवल्यास जलपर्णीला खाद्यच मिळणार नाही. कुठलाही सजीव खाद्याशिवाय जगणे, वाढणे शक्यच नसल्याने, शुद्ध पाण्यात जलपर्णी फोफावण्याची शक्यताच नाही... न रहेगा बांस, न बजेगी बांसुरी !

विवेकशून्य विकास आणि अनैतिक समृद्धी यांचा लोभ आणि बडेजाव टाळता आला तर अशी दिखाऊ जलपर्णी उगवणारच नाही आणि मानवी संस्कृतीचा नितळ प्रवाह अखंड वाहता राहील.

म्हणूनच 'भावार्थदीपिके'च्या पंधराव्या अध्यायात माऊली म्हणतात...

सुर्ये आधिष्ठीली प्राची 
जगा जाणिव दे प्रकाशाची 
तैसी श्रोतया ज्ञानाची 
दिवाळी करी

मी अविवेकाची काजळी ।
फेडूनि विवेकदीप उजळी
ते योगिया पाहे दिवाळी
निरंतर

संपन्नता, समृद्धी, विकास आणि भरभराटीच्या दिवाळीत सद्विवेकाचा दीप उजळू दे 
हीच या तेजोत्सवी प्रार्थना आणि हाच या प्रकाशपर्वचा संदेश...! 

असतो मा सद्गमय ।
तमसो मा ज्योतिर्गमय ।
मृत्योर्मा अमृतं गमय ।

शुभम भवतु !

1 टिप्पणी:

  1. जलपर्णीच्या उदाहरणातून दिखाऊ समृद्धीची समर्पक मांडणी केली आहे.

    उत्तर द्याहटवा