रविवार, ३० ऑक्टोबर, २०१६

आयुष्य...!

बरोब्बर एक वर्षापूर्वी, ३० ऑक्टोबर २०१५ ला मी फेसबुकवर हे पोस्ट केले होते. प्रदीप रस्से सरांच्या सौजन्याने ते आज पुन्हा जिवंत झाले. आज पुन्हा वाचतांना त्याचे प्रयोजन व कालसापेक्षता कमी होण्याएवजी वाढलेली जाणवली आणि प्राणसखा, मित्रबंधू कुमार याने पाठवलेल्या शांताताई शेळकेंच्या एका विचक्षण निरीक्षणासह त्याची इत्यादीवर स्थापना करण्याची इच्छा झाली... 

अंगावरचा पालवीचा निरर्थक पसारा सावरीत,
झाडाची मुळे वर्षानुवर्ष जातच असतात खोल... 
स्वीकारतात अटळपणे भुई खालचे जगणे अदृश्य,
चाचपतात अंधार, मिळेल ती शोषून घेत ओल... 

झाड मोहरते, थरथरते, डवरते, झडतेही... 
शहाणे यालाच आयुष्य म्हणतात कि काय...?

 
दि. ३० ऑक्टोबर २०१५ - फेसबुक पोस्ट

गिरीशच्या विनंतीवरून काही लिहितोय म्हटले तर अर्धसत्य ठरेल… गिरीशची विनंती निमित्त (की impetus) झाले एवढे निश्चित! मी डेली मेल नावाचा एक उपक्रम काही काळ चालवला हे आपणांस विदित आहेच. अशाच काही कारणांनी मी तो थांबवला तेव्हां काही 'निवडक' लोकांनी माझी विचारपूस केली आणि माझा हेतू साध्य झाला! त्यानंतर मी ब्लॉग, सोशल मिडिया, ई-पेपर अशा माध्यमातून प्रकटत राहिलोच, कुणी बघो न बघो, कुणी वाचो न वाचो, कुणी लाईको न लाईको, कशाचीच पर्वा न करता. हे उद्योग मी का चालवले आहेत त्याची मला उमगलेली ३ कारणे फक्त शेयर करतो (हल्ली काहीही करण्यापेक्षा 'शेयर' करणे जास्त महत्वाचे आहे आणि आपल्या कुठल्याही कृतीच्या सर्वव्यापी आणि दूरगामी परिणामांपेक्षा त्यावरील 'लाईक्स'च्या संख्येचे वजन जास्त भरते, ते असो) त्याचे आपण अनुसरणच काय लाईक नाही केले तरी चालेल…!

'मि. शिरीष, तुम्ही लिहिता एव्हढ पण वाचत का कुणी?' असा प्रश्न विचारणारे डॉ. कणेकर जरी मला लाभले नाही तरी प्रश्नाची भेदकता कमी होत नाही. पण ती दुर्लक्षून मी लिहिता राहण्याची गुपिते अशी -
१. लिहिल्याशिवाय मला स्वस्थ झोप लागत नाही. शेरपा तैन्सिंगला कुणा विक्रमचक्रमाने विचारले 'तुम्ही एव्हरेस्ट वर पुन्हा का जाता?', शेरपा उत्तरला 'तो तिथे आहे म्हणून!' चार्लीने त्याच्या शेवटच्या काळात खूप वाईट परिस्थितीत सिनेमे काढले. त्याची मैत्रीण त्याला म्हणाली 'तू हे कशासाठी करतोयस?' चार्ली म्हणाला 'माझ्या रक्तातून सिनेमा वाहतो!' पेलेला त्याच्या आयुष्यातला पहिला मानधनाचा चेक मिळाला तेव्हा त्याचा विश्वास बसेना. तो उद्गारला 'म्हणजे मला फुटबॉल खेळण्याचे पैसे पण मिळतील? मला तर खेळण्यातच पुरेसा आनंद मिळतो!' तात्पर्य, तुलसीदासाने सुद्धा रामायण 'स्वान्त सुखाय' लिहिले असे तो पहिल्याच पानावर जाहीर करतो…!
२. जगणे ही क्षणांची कणाकणाने घडत जाणारी अखंड माळ आहे. प्रत्येक क्षण दुसऱ्यापेक्षा वेगळा आहे पण सुटा नाही. वयोमानानुसार स्मरणशक्ती क्षीण होत जाईल तेव्हा चांगल्या प्रकारे जगलेले पण आठवू न शकणारे क्षण सगळ्यात जास्त त्रास देणार, वाईट आठवणी जाता जात नाहीत… अगदी स्मृतिभ्रंश झाला तरी! माणूस मूलत: आशावादी असतो आणि लिहितांना तो विचक्षण दार्शनिक (निदान स्वत:पुरता) होतो. तेव्हा प्रचारकी साहित्य प्रसाविणार्यांव्यतिरिक्त इतर माणसे चांगल्या विचारांच्या, चांगल्या आठवणींच्याच नोंदी ठेवतात असे निदर्शनास येते. तेव्हा अशा लिखाणायोगे अगदी विश्रब्ध शारदेची उपासना जरी होऊ शकली नाही तरी साहित्यभांडारात सर्वतोपरी भर पडतच असते. शिवाय लेखनमूल्य, साहित्यिक दर्जा, भाषेची समृद्धी वगैरे गोष्टींचा उहापोह करण्यासाठी समीक्षक मंडळी आहेतच की. त्याचीही चिंता आपणच केली तर त्यांना काय काम?
३. लेखनाचे पहिले काम अविष्कार (व्यक्त होणे), दुसरे संवाद (इतरांबरोबरच स्वत:शीही) आणि तिसरे पाळत (जागल्या बनून पहारा ठेवणे). Writers are the conscious-keepers of the society. रोजच्या धकाधकीच्या जीवनात समाजाला बऱ्याचदा (प्र)गतीची झापड आल्याने चांगले-वाईट, नीती-अनीती, वैध-अवैध, इष्ट-अनिष्ट याची चाड रहात नाही किंवा जाण होत नाही. अशा प्रसंगी केवळ लेखकच पंचाच्या तटस्थ भूमिकेतून प्राप्त परिस्थितीचे निर्हेतुक, निष्पक्ष परिशीलन करून मार्ग दाखवू शकतो. तो मार्ग चोखाळायचा किंवा नाही हा सर्वस्वी समाजाच्या परिपक्वतेवर अवलंबून असलेला समाजाचा निर्णय असला तरी म्हणून लेखन होतच रहायला हवे. अगदी काहीच नाही तर पुढल्या काळातील इतिहास संशोधकांना या काळातील समाजाच्या अभ्यासाची काही साधने मिळतील.

असो. ललित लिखाण खूप झाले. पण मला पर्याय नाही, माझ्याकडे परत करायला म्हणून देखील एकही पुरस्कार नाही (येत्या काळात 'औषधालाही' चे समृध्द रूप म्हणून 'परत करायलाही' रुजणार आहे म्हणतात) तेव्हा मला व्यक्त होण्यासाठी लिहिण्याशिवाय तरणोपाय नाही. आपल्याकडे असल्यास (पर्याय, पुरस्कार नाही) त्याचाही प्रयोग करून पहावा आणि फसल्यावर सत्वर पुन:र्लीखाण सुरु करावे ही सदिच्छा!

टिकटिकच्या प्रतीक्षेत आणखी एक अमूक...!