रविवार, १० जून, २०१८

पैका...!



डॉ. वंदना बोकील-कुलकर्णी यांच्या सुबुद्ध संपादनातला ‘संवादसेतू’ हा गेल्या वर्षीचा दिवाळी अंक विचक्षण अभिरुचीचा नमुना मानावयास हरकत नाही. मुळात, ‘विविधभाषक प्रतिभावंतांची लेखनयात्रा’द्वारे लेखन, कविता, गायन आणि नृत्य अशा बहुमुखी प्रतिभांचा घेतलेला ‘विदग्ध’ अदमास, ‘बापलेकी’ या हृदयस्पर्शी आयामातून लेकींनी रंगवलेले आपल्या कर्तुत्ववान पित्यांचे भावचित्र आणि ‘हिरवे हात’ विभागात पर्यावरणाबद्दल जनजागृतीसाठी मांडलेल्या तीन अनोख्या कहाण्या यांनी समृद्ध केलेल्या या प्रकाशनाने, एरवी कवितांच्या कलाबतू आणि जरीबुट्टीने सजविण्याच्या सार्वत्रिक आणि सर्वमान्य प्रघातास मुरड घालून; एक अनुवादित कथा, एक मूळ कथा, एक व्यक्तिचित्रण आणि, सद्य समाजव्यवस्था, प्राप्त परिस्थिती आणि प्रवाहपतित व्यक्तीच्या मनोभूमिकेचे विश्लेषण करणारे एक अत्यंत विवेकी मानसशास्त्रीय प्रकटन, अशा समसमासंयोगाने एक निराळीच उंची गाठली आहे. यातील मानसशास्त्रीय प्रकटन हे या विषयातील सन्मानीय तज्ञ आणि चिरपरिचित ‘वेध’कार डॉ. आनंद नाडकर्णी यांचे असावे हा योगायोग नव्हे आणि त्यांनी प्रकटनासाठी ‘पैसा आणि माणसाची मानसिकता’ हा विषय निवडणे हा अपघात नव्हे! हा संपूर्ण लेख केवळ वाचनीयच नाही तर चिंतनीय, मननीय आणि त्याहीपेक्षा, साक्षात अनुकरणीय असला तरी तो संपूर्ण आहे तसा येथे उद्धृत करणे शक्य नाही, क्षमस्व!

ही प्रस्तावना ज्यासाठी केली तो म्हणजे डॉक्टरांनी या लेखात संदर्भासाठी दिलेला विंदांचा ‘रोकडे’ सत्य सांगणारा अभंग! विंदांच्या जन्मशताब्दीनिमित्त रोज एक कविता या उपक्रमासाठी मी विंदांच्या स्वेदगंगा (१९४९), मृदगंध (१९५४), धृपद (१९५९), जातक (१९६८), विरूपिका (१९८१) आणि अष्टदर्शने (२००३) या प्रकाशित काव्यसंग्रहांचा आणि काही बालकवितांचा अभ्यास केला त्यात मला कुठेही हा अभंग आढळला नाही. सदर अभंगाची मांडणी, पोत, आशय आणि बाज पहाता तो ‘जातक’ किंवा ‘विरूपिका’चा भाग असावा असे वाटते जो नजरचुकीने किंवा गहाळ झाल्यामुळे माझ्या निदर्शनास आला नसावा. कुणा अभ्यासक अथवा जाणकारांस या विषयी अधिक माहिती असल्यास कृपया सर्वांच्या माहितीसाठी ती येथे विदित करावी. धन्यवाद!

तर एवढे नमनाला घडाभर तेल ज्या ‘अभंगा’साठी घातले तो, विंदांच्या सभोवतालच्या परिस्थितीचे सखोल निरीक्षण आणि अत्यंत समर्पक (शेलक्या?) शब्दात त्यावर तात्विक भाष्य करण्याची प्रतिभा याचा आणखी एक नमुना! १९७६ सालच्या त्रिगुणी महेमूदने खुलविलेल्या ‘सबसे बडा रुपैय्या’ या हिंदी चित्रपटात मजरूहच्या ‘ना बिवी ना बच्चा...’ या शीर्षकगीताशी सहोदराचे नाते सांगणारा हा अभंग, आज डॉक्टर-द्वयी आनंद नाडकर्णी आणि वंदना बोकील-कुलकर्णी यांच्या सौजन्याने...

वैकुंठीची पेठ I हवा पैका रोख; 
किरकोळ ठोक I मिळे मोक्ष! 

लज्जा सांडोनिया I मांडीत दुकान
येई नारायण I उधारीला!

अवघाची संसार I सुखाचा करावा;
आनंदे भराव्या I सर्व बॅंका!

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा