बुधवार, २७ जून, २०१८

व्रत...?झपाट्याने बदलत्या काळात अन उर्ध्वगामी 'मूल्य'व्यवस्थेत अनेक गोष्टी कालबाह्य झाल्या तरी केवळ रीत, प्रथा, परंपरा आणि कुळाचार म्हणून कितीतरी गोष्टी 'यज्ञातले मांजर' न्यायाने निगुतीने राबविल्या जातात. [बाय द वे 'यज्ञातले मांजर' गोष्ट तुम्हाला माहितीये ना? नसेल तर सांगेन पुन्हा कधीतरी... इथेच!] मुळात स्त्रियांनी हाच पती मिळावा म्हणून व्रत करायचे आणि स्वत: उपाशी राहून पुरुषांच्या सर्व गरजांची सोय बघायची हाच मुळी अन्याय आहे. त्यातून आजच्या काळात शिकून स्वावलंबी झालेल्या महिलाच कित्येक ठिकाणी संसाराचा गाडा स्वत:च्या खांद्यावर वाहतांना दिसतात. बायकोच्या जीवावर रिकामटेकडे हिंडणाऱ्या नवऱ्यांची संख्या समाजाच्या सर्वच थरात बघायला मिळते. हा झाला सामाजिक न्यायाचा भाग!

दुसरीकडे पर्यावरणाचा विचार करू जाता, वटसावित्रीसाठी 'वड'च निवडण्याला शास्त्रीय आधार आहे. काही शे वर्षे जगणारा (आजच्या संदर्भात, तगणारा) हा वृक्षराज आपल्या पिकल्या पारंब्यांच्या समृद्ध शाखाभाराने फुललेल्या, परिपक्व आणि भरल्या संसाराचा निदर्शक तर आहेच शिवाय याच्या सहवासात अधिक ऑक्सिजन मिळत असल्याने याला प्रदक्षिणा घालण्याने 'पुण्य' मिळते किंवा कसे हे निश्चित सांगता येणे अवघड असले तरी ऑक्सिजन नक्की मिळतो यात शास्त्रीय तथ्य आहे आणि शुद्ध ऑक्सिजन आज 'पुण्या'पेक्षा अधिक गरजेचा आणि दुर्मिळ होत चाललाय! वाढत्या शहरीकरणात वटवृक्षांच्या तुटवड्यामुळे वडाच्या फांद्यांची पूजा करण्याचा 'उपाय' मध्यममार्गीय काढतात आणि त्या निमित्ताने संधिसाधू वृक्षतोड करून आपली तुंबडी भरून घेतात. पर्यावरण संरक्षणाच्या आत्यंतिक निकडीच्या काळात वडासारख्या वृक्षराजाची कत्तल करून कालबाह्य परंपरा जपणे आवश्यक आहे का याचा सूज्ञांनी अवश्य विचार करावा.

आपण पुलंच्या स्मृतीदिनी त्यांच्या काही 'काहीच्या काही कवितां'चा आनंद घेतला. त्यातील 'वटसावित्री'बद्दलच्या पुलंच्या या दोन 'वात्रटिका' पुलंच्या मार्मिक प्रतिभेबरोबरच त्यांच्या असामान्य विवेकबुद्धीची साक्षही देतात...

वटसावित्री : १

‘वटेश्वरा, पुढल्या जन्मोजन्मी मला
‘ह्यां’च्या समोरच्या बिऱ्हाडातल्या
बाईच्या जन्माला घाल...’

वटसावित्री : २

‘वटेश्वरा, हे
आज तुझ्या बुंध्याला गुंडाळलेलं
सूत उद्या पहाटे मी
उलंटं फिरवून घरी परत नेणार आहे.
तेव्हा आजचं सूत हे एक नुसतचं
बंडल आहे हे ध्यानात ठेव.’

वाचा आणि विचार करा...

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा