मंगळवार, १० जुलै, २०१८

मूलमंत्र

लिंक्डइन, फेसबुक आणि ट्विटर यांची आकडेवारी गृहीत धरली तर मला ‘परिचित’ मानणारे आज जगात साधारण तीनेक हजार तरी लोक असावेत. जे मला प्रत्यक्षात ओळखतात त्यांची संख्या हजारभर मानली तर, समोर आलेच तर ओळखतील किंवा ओळख देतील (दुर्दम्य आशावाद!) असे पाचेकशे मानायला हरकत नाही. जे मला मित्र समजतात आणि कधीमधी दर्शनही देतात असे शंभरेक तरी भरावेत. तथापि ज्यांना मी मित्र समजतो आणि माझ्या असे समजण्याला ज्यांचे अनुमोदन तर आहेच पण ज्यांच्याशी वन्स-इन-अ-ब्ल्यू-मून, फेस-टू-फेस, विदाऊट-फेसबुक तोंडाला फेस येईतो चर्चाही घडते असे निदान २५ असायला हवेत. म्हणजे महिन्यातील ५ संध्याकाळी कुटुंबासाठी राखून ठेवल्या तरी, ‘रोज एक’ या हिशोबाने प्रत्येक मित्राला माझ्यासाठी महिन्यातून एकदाच, वर्षातून फक्त बारा संध्याकाळी वेळ काढावा लागेल! अर्थात यातील किती लोक मला मी आहे तसा माझ्या सर्व गुण(?)अवगुणांसह स्वीकारतात (आणि अर्थातच व्हाईसे व्हर्सा) व माझा किती लोकांशी संवाद आहे असा प्रश्न विचारला तर, मला तरी, निरुत्तर व्हायला होईल. ही सगळी सांख्यिकी आज कुठल्या निमित्ते मोजली आणि मांडली जातेय, तर प्रश्न संवादाचा (किंवा त्याच्या अभावाचा) आहे म्हणून!

संवाद दोन प्रकाराने होऊ शकतो – व्यक्त होऊन आणि अव्यक्त राहूनही. व्यक्त होण्याची माध्यमे म्हणजे बोलून आणि लिहून, तर अव्यक्त संवाद हा केवळ सहवास आणि सहभावनेने (सहानुभूतीने नव्हे!) शक्य होतो. बोलण्यामध्ये प्रत्यक्ष भेटून समोरासमोर फेस-टू-फेस बोलणे हाही एक पर्याय असतो! (पंधरा-वीस वर्षांपूर्वीपर्यंत हा एकमेव आणि, सोयीस्कर किंवा निरुपायाचा नव्हे तर, आवडीचा पर्याय होता!) दूरध्वनी होते पण त्यांचा वापर बऱ्याचदा फक्त भेटण्याचे ठिकाण आणि वेळ ठरविण्यासाठी असायचा. दुसरी व्यक्ती ‘पोहंचके बाहर’ असेल आणि अगदीच भेटणे शक्य नसेल तेव्हाच हे ‘यांत्रिक’ संभाषण थोडे लांबायचे. माध्यमक्रांतीनंतर संवादाची केवळ साधने आणि साधकच नव्हे तर साध्यही बदलले आणि भलत्याच गोष्टींचे विद्युतवेगाने प्रसारण होऊन पर्यावरणीय ग्लोबल वार्मिंगला एक निराळेच भावनिक परिमाण बहाल करत ते मनुष्य संबंधास बाधक ठरू लागले! शिवाय बदलत्या मूल्यव्यवस्थेत ऊर्ध्वगामी सामाजिक स्तराच्या अहमहिकेमध्ये मानव्याच्या मुलभूत मूल्यांची अधोगामी वाटचाल मनुष्यास दुष्टचक्रात अधिकच खोलवर रुतवत गेली. परिणामी बोलणे हे यांत्रिक (पक्षी: मधुसेवनासाठी या फुलावरून त्या फुलावर भ्रमण करित भ्रमणध्वनीला कर्णयंत्र लावून किंवा दूरस्थ राहून दूरध्वनीवरून) होत गेले आणि आधुनिक उपकरणांनी नॉइस कॅन्सलेशनच्या नावाखाली बाहेरच्या अनिष्ट आवाजांबरोबर आतलेही बरेचसे इष्ट आवाज कृत्रिम बुद्धिमत्तेच्या (आर्टीफिशियल इंटेलिजन्स, यू नो!) जोरावर स्वयंप्रज्ञेने कॅन्सल करून टाकले; उरले ते औपचारिक आणि व्यावहारिक ध्वनी आणि त्यांच्या गोंगाटात संवेदनांचे असहाय्य अस्फुट स्फुंदणे!

अमिताभने आपल्या विशिष्ट शैलीने हिंदी चित्रपट सृष्टीच्या इतिहासात एक माईलस्टोन करून ठेवलेल्या ‘अग्निपथ’ या सिनेमात त्याचे पात्र ‘विजय दिनानाथ चौहान’, दूरध्वनी अर्थात टेलिफोन या उपकरणाबद्दल आपले एक अनुभवसिद्ध निरीक्षण नोंदवते. ‘...गलत चीज बनाया ये टेलिफोन. उधरसे आदमी सोचता कुछ है, बोलता कुछ है, करता कुछ है!’ तद्दन फिल्मी आणि रंजनाचा भरपूर मसाला लावून खारवलेले असले तरी, मला हे ‘तत्वज्ञान’ समर्थांच्या मूर्खांच्या लक्षणाइतकेच मर्मग्राही वाटते. शिवाय पदोपदी येणाऱ्या अनुभवांनी त्याची सत्यता पटते आणि तीव्रता अधिकच खुपते. मुळात कारणाशिवाय आणि मनमोकळे असे संभाषण या उपकरणाद्वारे होऊ शकते ही शक्यताच मुळी मला फारशी मानवत नाही. माणूस जेव्हा समोर असतो (प्रत्यक्ष याची देही याची डोळा स्वरुपात, कुठल्याही गैजेटच्या स्क्रीनवर नव्हे) तेव्हा त्याच्या निकट असण्यातून, विविध विभ्रमातून, त्याच्या अस्तित्वाच्या पंचेद्रीयांना जाणवीणाऱ्या देहभानातून जो एक शब्दांपलीकडला संवाद घडत असतो, तो कुठलेही अत्याधुनिक उपकरण जसे कालत्रयी घडवू शकत नाही तसेच प्रकटनातील सच्चेपणा आणि इतर भाव ओळखण्याच्या संवादकौशल्यातील कसोट्याही तपासू शकत नाही! जिज्ञासूंनी सगुणातून निर्गुण साधना अभ्यासल्यास, निर्गुण, निराकार ईश्वराच्या प्राप्तीसाठी देखील सगुणाची आराधना का व कशी करावे लागते याचे संतांनी अतिशय सटीक व समर्पक पद्धतीने केलेले निरुपण पहावे.

तेव्हा ‘अंतर राखून बोलणे’ या तात्विक संकल्पनेचा आधुनिक व्यावहारिक अवतार असलेल्या ‘फोन’ या साधनाच्या मदतीने होणारा संवाद बऱ्याचदा ‘फोनी’ ठरतो आणि कित्येकदा तो तसा असतोही. त्यामुळे प्रत्यक्ष भेटून बोलणे याला हा फोनी पर्याय फारसा परिणामकारक नाही.

आता दुसरा पर्याय म्हणजे लिखित संवाद! ‘पत्र म्हणजे अर्धी भेट’ असे रुजविणाऱ्या काळाचे संस्कार लाभल्याने आम्हाला आजही पत्र हा प्रत्यक्ष भेटीला त्यातला त्यात चांगला पर्याय वाटतो आणि दुधाची तहान ताकावर भागविल्यासारखे वाटते, दोन्ही गोष्टी प्रकृतीला पोषकच. इतर कुठल्याही आधुनिक माध्यमातून संवाद हा शीतपेयांसारखा जितका शोषक (म्हणजे आधी पिणाऱ्याने ते बाटलीतले द्रव शोषायचे आणि उर्वरित आयुष्य ते द्रव त्याला शोषणार) तितकाच थंड आणि अपायकारक. परंतु आजच्या इमोटीकॉन्सच्या काळात कोण कागद पेन घेऊन लिहायला बसणार? त्यात किती वेळेचा अपव्यय! बरं, लिहिलं समजा पत्र मनाचा दृढनिश्चय करून तर ते पाठवायला कुरियर, पोस्ट करावे लागणार. त्यात वेळेबरोबर पैशांचा भुर्दंडही. आणि एवढे करून ते जिच्या नावे लिहिले त्या व्यक्तीच्याच हातात पडेल कि नाही, केंव्हा पडेल, काय समजेल काय नाही समजणार, पत्राच्या येथून तेथे 'पौष्टिक' प्रवासाच्या काळात, सदर व्यक्तीने आपला ब्ल्यू टूथ ऑन केल्यास सान्निध्यामुळे नवीनच मित्र-मैत्रिणी लाभल्या असल्यास या पत्राची त्याच्या लेखी किंमत किती आणि प्रतिसादाचा उल्हास किती...? किती विवंचना? मुळात स्वत:च्या आयुष्यात इतक्या कटकटी, त्यात हे विकतचे दुखणे कोण घेतो? त्यापेक्षा फेसबुक, व्हॉट्सएप कसे सहज, सोपे आणि सुटसुटीत. आपल्यासाठी कुणीतरी काहीतरी रोज खरडून धाडत असतेच, तीच सदिच्छा, प्रबोधनपर तत्वज्ञान किंवा जगाचे कल्याण आणि विद्वेषाचे राजकारण करणारे सारेच मजकूर फारशी शहानिशा न करता, आपल्याला हवी ती पिवळी तोंडे घालून पाठवून द्यावे... आहे काय नाही काय? एका उद्दात सामाजिक कार्यास हातभार लावल्याचे सात्विक समाधान आणि वर सगळ्याच कॉमन मित्रांशी रेग्युलर टचमध्ये राहिल्याचा बोनस; याला म्हणतात स्मार्ट फोनचा अतिस्मार्ट वापर!

पूर्वी विपुल, अर्थपूर्ण आणि ज्ञानाधारित अनुभवांचे लेखन व्हायचे तेव्हा देखील ‘इति लेखन सीमा’ असे म्हणून लेखनातून संवादाच्या मर्यादा स्पष्ट केल्या जायच्या आणि अधिक सखोल चर्चेसाठी आणि त्या योगे होणाऱ्या गाठभेटीसाठी सुचवले जायचे. त्या सूचक उद्गारांनाच भेटीचे निमंत्रण समजण्यास कुणाचीही कुठलीही सामाजिक प्रतिष्ठा आड येत नसे. आज अशा प्रकारचे लेखन इतिहास संशोधक मंडळात विपुल असले तरी कुठल्याही वर्तमान लेखनव्यवहारात सापडणे दुरापास्त. अत्यंत सुमार व अनर्थकारक अर्धवट आशय, रोमन लिपी, देवनागरी भाषा, व्याकरणाचा आनंद आणि जणू अंगण सजवायला रांगोळी घालावी अशी त्या पिवळ्तोंड्या इमोजींची पखरण हा आजच्या मराठी अति शीघ्र संवादाचा लसावी आहे! आणि याच पद्धतीने मराठी भाषा अभिजात व्हावी म्हणून प्रयत्न करणाऱ्या समाजमाध्यम धुरीणांचा बाणेदारपणा तर्खडकरांसह साक्षात रामशास्त्र्यांनाही धडकी भरवेल. अर्थात हा मुद्दा भाषा शुचितेचा झाला, आपण संवादाबद्दल बोलत(?) होतो!

एकूणच संवादाचा असा (पिवळा?) तोंडवळा होण्यास कारणीभूत असलेले मूळ माणसाच्या भौतिक जगण्याच्या आणि समृद्धीच्या हव्यासापायी नको इतके गुंतून पडण्यात शोधता येईल. इंग्रजीत ज्याला रैट रेस म्हणतात त्या जगरहाटीच्या धबडग्यात जगणे राहून जातेय आणि करायच्या राहून गेलेल्या गोष्टींची ‘बकेट लिस्ट’ वाढत जाऊन त्यांना निवांतपणी करण्याच्या यादीत पुढे पुढे ढकलले जातेय. पण हा ‘नंतर’ सगळ्यांना लाभणार आहे? किती वर्षाचं आयुष्य असणार आहे आपलं? ६०, ७०, ८०, ९०, १००... १०२ नॉट आउट? आणि जे काही असेल ते कशासाठी आणि कसे जगायचे आहे? मुळात कुणासाठी? कुटुंबाच्या स्थैर्यासाठी पैसा, पैशासाठी नोकरी-व्यवसाय, त्यासाठी काम, कामासाठी वेळ, एवढं करूनही पैसा आणि वेळ दोन्ही पुरत नाही म्हणून ताण, ताणातून वाद-विवाद-विसंवाद, त्यातून वैफल्य, ते घालविण्यासाठी नको नको ते उपाय... याला जीवन ऐसे नाव? ज्या गोष्टी कराव्याशा वाटतात त्या करता येत नाहीत आणि ज्या मुळीच कराव्याशा वाटत नाहीत त्या चुकत नाहीत. कराव्याशा वाटणाऱ्या गोष्टी दीर्घायुष्याच्या भरोशावर पुढे ढकलता येतात पण न कराव्याशा गोष्टी सतत करत राहिल्याने दीर्घायुष्याची शक्यता कमी कमी होत जाते, असे हे दुष्टचक्र! भेदावे कसे हा यक्षप्रश्न...

त्याचे मी माझ्यासाठी मराठीत शोधलेले उत्तर... 

एक पैशाची भाकरी,
एक पैशाचे फूल.
भाकरीसाठी चाकरी,
फूल जगण्याचे मूळ...!

आणि जपानी भाषेत याला म्हणतात आय्-का-गाय् म्हणजे इतिकर्तव्यता, आपल्याला जे आवडते ते करून शतायुषी होण्याचा कानमंत्र! बघा, ऐका, शिका, समजून घ्या, जमलाच तर आचरणात आणा म्हणजे आपण भेटत राहू! केवळ दीर्घायुषीच नाही तर सुखी समाधानी राहू...!

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा