बुधवार, ५ सप्टेंबर, २०१८

शिक्षक...!


काल शिक्षकदिनाच्या पूर्वसंध्येला एका अभूतपूर्व शिक्षकाला ऐकण्याची संधी मिळाली. डॉ. माधव गाडगीळ यांनी केरळ मधील पुराच्या थैमानाचा 'कार्य-कारण-भाव' अगदी सोप्या भाषेत उलगडून सांगितला. मुळात या कार्यक्रमाला झालेली अक्षरश: अलोट गर्दी ही केवळ आशादायकच नव्हे तर अत्यंत आश्वासक होती. कुठल्याही वैचारिक कार्यक्रमात जेव्हा तरुणांची संख्या ज्येष्ठांपेक्षा कित्येक पट असते तेव्हा तो विषय, तो वक्ता आणि ते वैचारिक अभिसरण हे जागरूक वर्तमानाने घेतलेले विवेकी भविष्यवेधाचे मनोज्ञ दर्शन असते! पत्रकार भवनाचे सभागृह या विषयासाठी खूपच छोटे ठरले आणि कार्यक्रमाचा निर्धारित वेळही! परंतु यामुळे स्टेजवर वक्त्याच्या अक्षरश: पाठीमागे बसून ऐकण्याची दुर्मिळ संधीही मिळाली आणि विषयाची तंतोतंत 'पार्श्वभूमी' अशीही समजून घेता आली, ते असो!  

तथापि, सर्वप्रथम अशा प्रकारचा संवाद आयोजित करून, निर्ढावलेली नोकरशाही आणि उन्मादी दडपशाही यामध्ये कुचंबलेल्या आवाजांना व्यासपीठ उपलब्ध करून दिल्याबद्दल 'वनराई'चे मन:पूर्वक अभिनंदन आणि आभार! लोकशाही प्रक्रियेचा एक अदृश्य पण सर्वात निरपेक्ष आणि कणखर स्तंभ असलेला 'जनसंवाद' व त्यायोगे होणारे जन-प्रबोधन आणि स्वतंत्र, विवेकी विचारासाठी पोषक वातावरण या वैशिष्ट्यांमुळे असे उपक्रम आणि त्यातून विधायक कार्यक्रम हे, सद्य परिस्थितीत तरी, लोकशाहीचे एकमेव आशास्थान दिसते.

गाडगीळ सरांनी केरळमधील 'निसर्गा'च्या प्रकोपातील 'मानवी' हस्तक्षेपांचा शास्त्रीय आढावा तर घेतलाच पण हे करतांना त्यांनी 'विकास' या संकल्पनेचे जैन तत्वज्ञातील चौरस स्वरूप आणि नॉर्वे या अत्यंत समृद्ध आणि प्रगत देशाच्या समुद्रातून तेल काढण्याच्या नीती-नियमांबरोबरच महाराष्ट्रातील मेंढा-लेखाच्या उदाहरणातून, संघटित व विधायक विचाराने प्रेरित स्वावलंबी मनुष्यसमूह कुठल्याही राजकारणाशिवाय आपापल्या परिसराच्या सर्वसमावेशक, संयत तथा धारणाक्षम ('शाश्वत' नव्हे!) विकासाची तळी स्वतःच कशी उचलू शकतो हे मार्मिक पद्धतीने सांगितले. माझ्या इगो-वाईज या दुसऱ्या इंग्रजी ब्लॉगवर १७ जुलै २०१८ रोजी 'डेमोक्रसी' या पोस्टमध्ये मेंढा-लेखावरील डॉक्युमेंट्री शेअर केली आहे.

हा कार्यक्रम आणखी तीन कारणांनी वैशिष्ट्यपूर्ण ठरला - एक म्हणजे, सरांच्या व्याख्यानातून, ज्या अनेक लादल्या गेलेल्या आणि पर्यावरणनाशक असमर्थनीय 'विकास'कामांचा आणि त्यामागील 'अर्थ'शास्त्र आणि कुप्रवृतींचा उलगडा झाला त्यामुळे श्रोत्यांचे प्रबोधन झाले, उपस्थितांची जाणीव-जागृती झाली आणि जिज्ञासूंना काही विधायक उपक्रमाची प्रेरणा मिळाली. यातून काही समाजोपयोगी कार्यक्रम आकारास येईल ही आशा फारच आदर्शवादी आणि भाबडी वाटली तरी फोल ठरू नये. अन्यथा, वादळी पावसात मिट्ट काळोख व्हावा आणि डोळ्यात बोट घातले तरी दिसू नये अशा अवस्थेत मेणबत्ती आणि काडेपेटी तर सापडावी पण सर्दाळलेल्या काडीपेटीतील सर्व काड्या कुचकामी ठराव्या आणि शेवटची काडी महत्प्रयासाने पेटावी तर मेणबत्तीच्या वातीला लावण्यापूर्वीच विझावी, अशी काहीशी असहाय्य अस्वस्था लोकशाहीच्या नशिबी येईल... ही भीती!

दुसरे वैशिष्ट्य - सरांनी त्यांच्या जर्मन मित्रांशी संवादाच्या माध्यमातून भारतीय मानसिकतेचे केलेले परखड विश्लेषण! त्यांचा एक जर्मन मित्र लहानपणी ऱ्हाइन नदीमध्ये मनसोक्त डुंबायचा, तरुणपणी ते जलप्रदूषणामुळे अशक्य झाले पण पर्यावरणप्रेमी जागरूक नागरिक आणि संवेदनशील प्रशासन यांच्या  सामुदायिक प्रयत्नाने ऱ्हाइन नदी पुन्हा स्वच्छ झाल्यामुळे तो मित्र आता म्हातारपणी पुन्हा नदीत डुंबू शकतो... अशी आठवण सांगून, 'मी देखील लहानपणी मुळामुठेमध्ये पोहायला जात असे आणि मला देखील माझ्या जर्मन मित्रासारखी ती संधी पुन्हा मिळाली तर हर्षवायूच होईल...!' अशी मार्मिक टिपण्णीही केली. सरांना अशी संधी मिळवून देण्याची जबाबदारी पर्यावरणप्रेमी जागरूक पुणेकरांची आहे... ही आशा!

तिसरे वैशिष्ट्य - प्रश्नोत्तरादरम्यान, नेहमीच अनुभवाला येणारी, विवादास्पद काही मिळवून त्याचे भांडवल करण्याच्या दृष्टीने, विषयाशी विसंगत आणि सहेतुक प्रश्नांची बोचणी. अशाच एका अतार्किक प्रश्नाला प्रतिसाद देतांना सर म्हणाले, 'सगळ्याच विषयातील सगळेच ज्ञान असायला मी धर्मगुरूही नाही आणि राजकारणीही...!' प्रश्नकर्त्याला उत्तर मिळाले की नाही ठाऊक नाही पण सुज्ञांना संदेश आणखीन भावना दोन्ही पोहचल्या... असाव्यात!

एक सभ्य, सुसंस्कृत आणि विवेकी समाज घडायला शिक्षकांची, गुरूंची नितांत गरज असते पण ते नेते धर्मगुरू किंवा राजकारणी असू नयेत याची समज असलेला समाजच प्रगल्भ आणि खऱ्या अर्थाने समृद्ध होतो... मग तो मध्यरात्रीचा सूर्य पहाणारा नॉर्वे असो किंवा लोकशाही व्यवस्थेतील आपल्या वनाधिकारांबद्दल अहोरात्र सजग असलेला आदिवासी मेंढा-लेखा!

आयुष्याला आकार, अर्थ आणि प्रयोजन देणाऱ्या माझ्या आजवरच्या शिक्षकांच्या भल्या मोठ्या यादीत काल आणखीन एक सन्माननीय भर पडली आणि मी आणखीनच समृद्ध, सुसंस्कारित, शिक्षित आणि कृतज्ञ झालो!

जे जे आपणासी ठावे |
ते ते इतरांसी शिकवावे |
शहाणे करुन सोडावे सकल जन ||

या धारणेने कार्यरत असलेल्या सर्व व्रतस्थ शिक्षकांना 
शिक्षकदिनाच्या कृतज्ञतापूर्वक शुभेच्छा | 

जय जय रघुवीर समर्थ I

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा