शुक्रवार, २८ सप्टेंबर, २०१८

कविता...!

'महाजनां'बद्दल 'ब्र' काढणारी 'कविता'
मृतवत असंवेदनांपेक्षा कितीतरी 'भिन्न'... 
'अखेर ए का की...' अशी अभिव्यक्ती
प्रच्छन्न प्रतिभा आज शांत आणि खिन्न...!

कुणाचंही अकाली जाणं हृदयाला घरं पाडतं. स्वच्छ मनाच्या, मुक्त अभिव्यक्तीच्या, संवेदनशील जाणिवांच्या आणि स्पष्ट, परखड विचारांच्या व्यक्तीचा मृत्यूने एका वृत्तीचा ऱ्हास होतो आणि समृद्ध समाजजीवनाची अपरिमित हानी होते. गेल्या आठवड्यात कल्पना लाजमी आणि काल कविता महाजन यांच्या अकाली जाण्याने, आधीच झपाट्याने संवेदनाहीन होत चाललेल्या पुरुषकेंद्रीत समाजाची किती आणि कशी हानी झालीय, होतेय हे कळायला काही काळ जावा लागेल... कुणी नंदिता दास 'मंटो'च संशोधन करून पुनरुत्थान करेपर्यंत किंवा अधिकच...!

काल कविताबद्दलची ही, तिच्या एकूणच अस्तित्व आणि प्रकटनाइतकीच हेलावून टाकणारी, बातमी समजल्यापासून लागलेली 'उचकी' काही केल्या थांबत नाहीये... थांबणारही नाहीये... दुसरी कविता सापडेपर्यंत...

कविताला तिच्याच या 'उचकी'ने शब्द-सुमनांजली...


कोण माझी आठवण काढतंय इतक्या तीव्रतेने
मित्र की शत्रू?
मित्र ढगात पोहोचला आहे
स्वर्गात वा नरकात
त्याच्या पापपुण्याईने.

शत्रू आहे अजून मातीवरचं एक ढेकूळ
कोण माझी आठवण काढतंय
इथून वा तिथून
तिथून वा इथून?
ब्लॉक केलेले कोळसे पेटलेत
की धुमसताहेत अनफ्रेंड केलेले लोक
की रुसलेत फ्रेंड्स
पुरेसं लक्ष न दिल्याने?
कुणाच्या आहेत या उचक्या
ज्या सतत लागताहेत
गिळू देत नाहीत अन्नाचा घास
कष्टाने मिळवलेला
उतरू देत नाहीत घोट घशाखाली
साध्या निर्मळ पाण्याचा
बघ म्हणतात छताकडे
छतापलीकडच्या आभाळाकडे
तरी थांबत नाही उचकी.

उचकी लागणे म्हणजे छाती व पोट यामधील पडदा
आणि बरगड्यांमधील स्नायू यांचे आकुंचन होणे
व त्याचवेळेस स्वर यंत्रातील स्वरतंतू
व्होकल कॉर्ड एकमेकांजवळ येणे
मी वाचते माहिती उचक्या देत देत
उचकी म्हणजे असतो
स्वरतंतू जवळ-जवळ आल्यामुळे आवाज
हे वाचून देखील थांबत नाही माझी अंधश्रद्ध उचकी.

माझ्या देहातून मी खेचून काढते प्रेतं
एक प्रेत धास्तीचं ज्यानं धमकी ऐकली होती
एक प्रेत भीतीचं ज्यानं दहशत सोसली होती
एक प्रेत अश्रूचं ज्यानं दु:खाचा चेहरा देखला प्रत्यक्ष
एक प्रेत प्रेमाचं ज्याला मृत्यूने कुजवलं
एक प्रेत आकर्षणाचं, ज्याची
आकर्षणवस्तू होती कमजोर आत्यंतिक
मी प्रेतमुक्त होते जगण्याला मोकळी
व्याकरणाच्या नियमात न बसणारा
नवा शब्द.

मी स्वागत करते उचकीचं
की बाई, स्वार्थहीन स्वरतंतु जवळ-जवळ आल्यामुळे
जन्मली आहेस तू.

- कविता महाजन

कविताच्या साहित्य संपदेसाठी कविताच्या ब्लॉगला इथे भेट द्या -
https://kavitamahajan.wordpress.com/

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा