शनिवार, १६ मार्च, २०१९

विवेक...!

विचाराने विकारावर विजय मिळवला तेव्हा पशूचा माणूस झाला.
अस्तित्वाला विचाराचा स्पर्श झाला तेव्हा अभ्यासाचे बीजारोपण झाले.
अभ्यासातून नवकल्पनांना अवकाश मिळाले आणि नवसृष्टी निर्माण झाली.
हे सर्व होण्यासाठी ज्या तपस्व्यांनी आयुष्याचा यज्ञ केला ते शिक्षक!
समाजाला सुयोग्य दिशा देण्याबरोबरच नीती, मूल्ये, सचोटी, चिकाटी अशा संस्कारांचे स्वत:च्या जगण्यातून वाण देणारी ही प्रजाती अलीकडे लुप्त होत चाललीय हे केवळ ठळक बातम्यांकडे बघितले तरी लक्षात यावे. मग ते न्यूझीलंडमधील नृशंस हत्याकांड असो की मुंबईतीलपादचारी पूल दुर्घटना! बाह्यात्कारी या दुर्घटना भासल्या तरी यामागे जी वृत्ती आणि प्रवृत्ती आहे तिचे मूळ, संकारक्षम वयात मानवतेचा, सहवेदनेचा आणि सहजीवनाचा योग्य संस्कार न होणे हे आहे आणि मूल्यसंस्कार, मूल्यशिक्षण हे तासिका पद्धतीने किंवा 'आउटसोर्सिंग'ने होत नसते; त्यासाठी तसे आदर्श, रोल मॉडेल सतत समोर असावे लागतात. आम्ही न्यू सिटीचे विद्यार्थी याबाबतीत अतिशय भाग्यवान!
आज न्यू सिटीचे विद्यार्थी जगभरात विखुरले आहेत आणि विविध संस्था, बहुराष्ट्रीय कंपन्या यांच्या अत्यंत महत्वाच्या उच्च पदांवर आपापली भूमिका यथोचित पद्धतीने पार पाडीत आहेत, त्या सर्वांचा शाळेला अभिमानच आहे, पण हे सर्व त्यांचे प्रेयस आहे. सामान्यत: न्यू सिटी हायस्कूलच्या आणि विशेषत: दाबके सरांच्या हजारो विद्यार्थ्यांमध्ये, गिरीश म्हणाला तसे, 'आम्ही चालवू हा पुढे वारसा...' हे ज्या विद्यार्थ्याने तन-मन-धनाने स्वीकारले आणि त्यासाठी आपले संपूर्ण आयुष्य समर्पित केले तो, न्यू सिटी हायस्कूलचे श्रेयस म्हणून ज्याच्या नावावर शाळेच्या तमाम विद्यार्थीच नव्हे तर शिक्षकांचेही एकमत होईल असा विद्यार्थी म्हणजे श्री. विवेक पोंक्षे सर! पुण्यासारख्या शहरात ज्ञान प्रबोधिनीसारख्या संस्थेची धुरा इतकी वर्षे समर्थपणे सांभाळणे केवळ कौतुकास्पद, अभिमानस्पदच नाही तर वंदनीय आणि अनुकरणीय आहे. ज्ञानाच्या प्रबोधनास पोंक्षे सरांनी कायमच योग्य दिशा आणि प्रभावी परिमाण दिले असे म्हटल्यास अतिशयोक्ती ठरू नये!
माझा आणि पोंक्षे सरांचा प्रत्यक्ष संबंध [संभाषण या अर्थाने] तसा केवळ तीन-चार प्रसंगी आला आणि गिरीशने वर्णन केला तो 'मॅजीन इंडिया' निमित्त महिनाभरापूर्वी झालेल्या आमच्या भेटीचा शेवटचा प्रसंग. परंतु पंचतत्वांचे अस्तित्व जसे चराचरात आणि आपल्या कणाकणात असते, ते वेगळे दाखवता येत नाही आणि त्याची गरजही नसते, तसेच आपले शिक्षक (ज्या ज्या व्यक्ती, वृत्ती, निसर्ग आणि घटना यांच्याकडून आपण शिकतो ते सारे शिक्षकच, म्हणूनच दत्तगुरूंनी देखील २४ गुरु केल्याचे दाखले दिले जातात!) हे सहावे, नेहमीच भासमान न होणारे पण आपल्या अस्तित्वाचे धरोहर असलेले सहावे तत्व! आज अशा शिक्षकांची समाजाला जेवढी गरज आहे तेवढी कधीच नव्हती, नसेल! या पार्श्वभूमीवर पोंक्षे सरांचे अकाली जाणे हे केवळ पोकळी निर्माण करणारे नाही तर समाजाची अपरिमित हानी करणारे ठरते. ‘लाख मेले तर चालतील पण लाखांचा पोशिंदा जगला पाहिजे’ हे सरंजामशाहीचे प्रमेय इथे वेगळ्या अर्थाने मांडावेसे वाटते...
नेते, उद्योगपती, धनिक येतील आणि जातील, शिक्षक जगाला पाहिजे कारण मनांची मशागत करायलाच हवी. कसे जगायचे हे शिकण्याबरोबर का जगायचे हे शिकवणारा गुरु हवाच! म्हणूनच एकांगी ‘विकास’ नाही झाला तरी चालेल सद्सद‘विवेक’ जगायलाच हवा.
सरांचे संपूर्ण आयुष्य हाच संदेश आहे त्यामुळे त्यांच्या जाण्याचा विषाद वाढविण्यापेक्षा त्यांच्या विचाराचा वसा घेऊन विवेक वाढवू या म्हणजे, पंचतत्वातून मिळालेले शरीर पुन्हा पंचतत्वात मिसळले तरी सहावे तत्व चिरंतन आहे व राहील, फक्त समाजमन तेवढे प्रगल्भ व्हावे!

नैनं छिन्दन्ति शस्त्राणि
नैनं दहति पावकः।
न चैनं क्लेदयन्त्यापो
न शोषयति मारुतः।

1 टिप्पणी: