गुरुवार, १४ मार्च, २०१९

'आशा चिरंतनाची...'


आज १४ मार्च २०१९. विंदांचा नववा स्मृतिदिन. अर्थात स्मृतिदिवस त्यांचा साजरा करावा लागतो जे विस्मृतीत जातात. जे आपल्या आठवणीच काय आपल्या जाणिवेचा कण अन कण व्यापून दशांगुळे उरतात त्यांच्या केवळ स्मृती नसतात तर ते श्रुती-स्मृती होऊन आपल्या कर्म-संस्काराचा भाग बनतात, आपल्या अस्तित्वाला, व्यक्तित्वाला आगळे परिमाण देतात!

विंदांच्या जन्मशताब्दी निमित्त मी 'रोज एक कविता...' असा अतिशय महत्वाकांक्षी उपक्रम चालविण्याचा प्रयत्न केला आणि विंदांच्या अगदी ३६५ जरी नाही तरी १०० एक कविता इत्यादीवर आणून शतक गाठू शकलो. या उपक्रमाच्या समारोपात मी माझी भूमिका प्रामाणिकपणे मांडण्याचा प्रयत्न केला, तो आपण इथे वाचू शकता.

'हम आपके है कौन' या अनेक अर्थाने विक्रमी ठरलेल्या चित्रपटात डॉक्टर दाम्पत्य हिमानी शिवपुरी व सतीश शहा यांच्यातील नोक-झोक लोभस आहे. एका प्रसंगात, शायर असलेल्या डॉक्टर सतीश शहाला काही सादर करून दाखविण्याची 'शिक्षा' मिळते तेव्हा त्याची पत्नी त्याला म्हणते, 'किसी और शायर का कलाम सुनाईये, एक शायर के लिये इससे बढकर 'सजा' और क्या हो सकती है...?'   

त्या क्षणी झालेल्या सतीश शहाच्या मनोवस्थेशी तादात्म्य पावत मी पुढील 'विंदांचा अल्प परिचय' सादर करतोय कारण तो मी लिहिलेला नाही! पुन्हा एकदा आमचे जळगावचे स्नेही, हितचिंतक आणि माझ्यावर निरपेक्ष प्रेम करणारे प्रदीप रस्से सर यांच्यामुळे हा अलभ्य लाभ झालाय. त्यांना रुचणार नसले तरी त्यांचे आणि मुख्य म्हणजे ज्यांनी विंदांचा इतका सूक्ष्म तरी विस्तृत, सघन तरी तरल आणि 'वर्णनात्मक' किंवा 'विश्लेषणात्मक' असे आरोप होऊ शकणार नाही असा सटीक, समर्पक आणि समावेशक परिचय करून देत प्रसंगाचे औचित्य आणि प्रकटनाचा उद्देश यांचे गांभीर्य टिकवत जी उंची गाठलीय तिला सलाम आणि या परात्पर मित्र, शब्दगीर श्री. योगेश शुक्ल यांचे मन:पूर्वक अभिनंदन, आभार आणि स्वागत! प्रमुख पाहुण्यांचे मनोगत ऐकायला श्रोतृवृंद अधीर झालेला असतांना, मिळालेल्या संधीचे सोने करण्याच्या प्रयत्नात परिचयकर्त्याने विनाकारण पाहुण्यांच्या बालपणापासून सुरवात करून फुटेज खात रसभंग करू नये हा अत्यंत मुलभूत शिष्टाचार पळत मी आवरते घेतो आणि मूळ मसुदा 

उद्धृत

करतो... 
 
'गौतमबुद्धाची ध्यानमग्न मूर्ती आणि जातिवंत विदूषकांची मिस्किल नजर यांची एकदम किंवा एकामागून एक आठवण व्हावी अशा संमिश्र भावनांच्या कल्लोळ करणार्‍या कविता लिहिणारे विंदा करंदीकर. १४ मार्च त्यांचा स्मृतिदिवस. मुक्त सुनीतांचा केलेला प्रयोग हे या प्रयोगशीलतेचे एक उदाहरण होय. मराठीतील महत्वाचे समीक्षक म्हणूनही त्यांना मान्यता मिळाली. लघुनिबंधकार म्हणूनही ते प्रसिद्ध होते.

विंदा ‘ज्ञानपीठ’ चा बहुमान मिळवणारे तिसरे मराठी साहित्यिक, दुसरे कवी! यांचा मूळ पिंड कवीचा. त्यांचा जन्म सिंधुदूर्ग जिल्ह्यामधील घालवळ गावचा. घरची परिस्थिती तेव्हा अत्यंत हलाखीची, वडील गरीब शेतकरी. पण एका स्नेह्यांमुळे विंदांचे शालेय व महाविद्यालयीन शिक्षण कोल्हापूर येथे झाले. इंग्रजी घेऊन एम.ए. झाल्यावर त्यांनी मुंबईला शिक्षकी पेशा स्वीकारला.

इंग्रजी काव्याचा अभ्यास करताना ब्राऊनिंग, हॉपकिन्स, एलिएटस् यांच्या कवितांनी ते खूप प्रभावित झाले. तसेच मराठीतील माधव ज्युलियन, बा. सी. मर्ढेकर यांच्या काव्याचाही त्यांच्यावर पडलेला प्रभाव त्यांच्या प्रारंभीच्या काव्यातून जाणवतो.

चिंतनशीलता हा मूळ पिंड असल्याने विश्र्वरहस्याचा शोध, पार्थिवतेचे आकर्षण, विज्ञाननिष्ठा, आध्यात्मिक कुतूहल असे वैचारिक विषय त्यांच्या काव्याचा आत्मा बनले. प्रयोगशीलता हे त्यांच्या काव्याचे ठळक वैशिष्ट्य आहे. गझल, गीत, मुक्त सुनीत, तालचित्रे, विरूपिका असे काव्याचे जुने-नवे रचनाबंध त्यांनी स्वीकारले. स्वच्छंद हा नवा छंद निर्माण केला. त्यांचे स्वेदगंगा (१९४९), मृद्गंध (१९५४), ध्रुपद (१९५९), जातक (१९६८) आदी काव्यसंग्रह प्रसिद्ध आहेत. विंदा करंदीकरांचे स्पर्शाची पालव (१९५८), आकाशाचा अर्थ (१९६५) हे लघुनिबंधांचे संग्रग्रहसुद्धा त्यांचे वैचारिक वेगळेपण आणि बुद्धीची चमक अधोरेखित करतात. त्यांनी लिहिलेल्या ‘परंपरा आणि नवता’ (१९६७) या समीक्षणात्मक लेख संहाचे मराठी समीक्षा ग्रंथांमधे महत्त्वाचे स्थान आहे.

विंदांच्या बालकविताही पारंपरिक बालगीतांपेक्षा वेगळ्या आहेत. त्यांच्या अद्भूतरम्य, गमतीदार व वैचित्र्यपूर्ण कल्पनांमुळे या बालकविता रसिकांवर छाप सोडून जातात. बालविश्र्वाशी समरसून नावीन्यपूर्ण कल्पनाशक्ती वापरून अनेक भन्नाट बालकविता त्यांनी लिहिल्या आहेत. एटू लोकांचा देश, पिशी मावशी आणि तिची भुतावळ या दीर्घ कवितांचा त्यात समावेश आहे. राणीचा बाग, एकदा काय झाले, अजबखाना, सर्कसवाला, परी गं परी, टॉप ह्यांसारख्या त्यांच्या बालकविता संग्रहांनी मुलांचे भावजीवन समृद्ध केले आहे.

त्यांच्या सर्वच लिखाणामधून संत तुकाराम महाराजांच्या काव्यातला परखडपणा व आशयघनता दिसून येते. त्यांच्या वेगळ्या जाणिवा, वेगळ्या प्रतिमा रसिकांना खिळवून ठेवतात.

‘मी च्या वेलांटीचा सुटो सुटो फास’ किंवा ‘अगा क्रियापदा, तुझ्या हाती अर्थ। बाकी सारे व्यर्थ, भाषेलागी।’
यातून त्यांचे वेगळेपण स्पष्ट होते.
‘देणार्‍याने देत जावे - घेणार्‍याने घेत जावे , घेता घेता एक दिवस - देणार्‍याचे हात घ्यावे’ 
किंवा
‘तीर्थाटन मी करीत पोचलो, नकळत शेवट तव दारी, अन् तुझिया देहात गवसली, सखये मज तीर्थे सारी’
या त्यांच्या कविताही विलक्षण परिणाम साधतात.

विंदा करंदीकर, मंगेश पाडगावकर व वसंत बापट या तीन कवींमुळे मराठी कविता महाराष्ट्राच्या कानाकोपर्‍यात पोहोचली. हे तिघेही आपल्या कवितांचे एकत्रितपणे कविता वाचनाचे कार्यक्रम करत सार्‍या महाराष्ट्रभर फिरले.

विंदा करंदीकरांना त्यांच्या साहित्यातील देदिप्यमान कारकीर्दीसाठी जनस्थान पुरस्कार, कबीर पुरस्कार, सिनियर फुलब्राईट बहुमान असे अनेक पुरस्कार मिळाले. पण सर्वांत महत्त्वाचा, मानाचे पीस खोवणारा पुरस्कार म्हणजे ज्ञानपीठ पुरस्कार! या पुरस्काराने मराठी साहित्याचा झेंडा पुन्हा एकदा अखिल भारतीय स्तरावर, खर्‍या अर्थाने फडकला.'

- योगेश शुक्ल 

सदर लिखाणास कुठे पूर्वप्रसिद्धी मिळाली असल्यास आणि येथे पुनःप्रकाशित करीत असतांना काही चूक झाली असल्यास, आपल्या अभिप्रायासह अवश्य कळवावे. धन्यवाद!

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा