रविवार, २३ मे, २०२१

या चिमण्यांनो...


एक छोटीशी चिमणी आपल्याच नादात चिवचिवत भुर्रकन इथून तिथे उडत होती. तेवढ्यात एक भलामोठा भेसूर काळा पक्षी तिला ओलांडून पुढे झेपावला आणि मागे वळून चिमणीकडे बघत स्वतःशीच पुटपुटला, 'हे कसे शक्य आहे...?'

त्याचा अवतार, अविर्भाव आणि उद्गाराने भ्यायलेली चिमणी आणखी जोरात उडू लागली. काहीच वेळात पुन्हा तो काळा पक्षी तिच्या मागून येऊन तिला ओलांडून जातांना पुन्हा पुटपुटला, 'हे कसे शक्य आहे...?'

आता प्राणभयाने थरथरणारी चिमणी आपल्या इवल्याशा पंखात सगळी शक्ती एकवटून सर्व ताकदीनिशी उडू लागली. पुन्हा काहीच वेळात काळा पक्षी तिच्याच मागावर असल्यासारखा झेपावला आणि जाता जाता म्हणाला, 'हे कसे शक्य आहे...?'

भीतीने अर्धमेली झालेली चिमणी नकळत इतक्या वर गेली की साऱ्या छोट्या पक्षांचे टप्पे ओलांडून थेट गरुडाच्या अवकाशात दाखल झाली. गगनभरारी मारत सावजाचा शोध घेणारा गरुड आपल्या बाजूला इवल्याशा चिऊताईला बघून हादरला !

'चिऊताई, तू इथे एवढ्या वर काय करतेस...?'
'बर झालं गरुडदादा तू भेटलास. अरे, एक भलामोठा काळा पक्षी केव्हापासून माझ्या मागे लागलाय आणि, 'हे कसे शक्य आहे, हे कसे शक्य आहे...' असे म्हणून मला घाबरवतोय...'
'काळजी करु नकोस, मी तुला लांब त्या उंच डोंगरकपारीत नेऊन ठेवतो. तू तिथे विश्रांती घे, तोपर्यंत तो पक्षीही तू सापडत नाहीस म्हणून कंटाळून निघून जाईल. मग तू सावकाश खाली उतर आणि जा आपल्या घरट्यात परत. चल, बस माझ्या पाठीवर, मी आत्ता पोहोचवतो तुला उंच डोंगरात...'

चिमणीला खूपच हायसे वाटले आणि सुरक्षित होण्याच्या कल्पनेने ती पटकन् गरुडाच्या पाठीवर बसली. गरुड ढगांच्या वर आकाशात झेपावला आणि खरोखरच अगदी काही क्षणात उंच डोंगर कपारीत पोहचला. तिथे सारे कसे शांत शांत आहे हे पाहून चिऊताईला हुरूप आला. 

'गरुडदादा, तुझे आभार कसे मानावे तेच कळत नाही, आज तू नसतास तर मी काही वाचले नसते बघ !' 'काय चिऊताई तू पण, आपण पंखवाले पक्षी एकमेकांच्या उपयोगी नाही पडलो तर काय शेपटीवाले प्राणी येतील आपल्या मदतीला...? काहीतरीच तुझं ! बरं, आता इथे थोडावेळ विश्रांती घे, फळं खा, पाणी पी आणि ताजीतवानी होऊन सावकाश खाली उतर, मला निघायला हवं...'

चिमणीच्या निरोप घेऊन गरुड खाली झेपावला आणि पुन्हा सावज शोधण्याच्या कामात गर्क झाला. असाच काही वेळ गेला आणि उंच डोंगरावरच्या आपल्या गरुडासनाकडे परतत असताना वाटेत गरुडाला तो काळा पक्षी भेटला.

'अरे, तू इथे काय करतोयस ? पुन्हा त्या बिचाऱ्या चिमणीला उगाच घाबरवू नकोस !' गरुड म्हणाला.
'पक्षीराज, मी स्वतःच्या इच्छेने काही करत नसतो, मी फक्त आज्ञापालन करतो!' काळा पक्षी उत्तरला.
'म्हणजे ? मी समजलो नाही !' गरुडाने विस्मयाने विचारले.
'अहो, पक्षीराज मी काळदूत आहे, माझा मालक काळ जेव्हा सांगेल तेव्हा, जिथे सांगेल तिथे आणि ज्यांचे सांगेल त्यांचे प्राण हरण करणे हेच माझे काम !'
अजूनही निटसा उलगडा न झालेला गरुडाने विचारले, 'पण मग त्यासाठी चिऊताईला घाबरवायची काय गरज...?'

'अहो असं काय करताय ? त्या चिमणीचाच जीव घ्यायचा आदेश होता पण ते काम मला उंच डोंगरकपारीत करण्याच्या सूचना होत्या. वेळ भरत चालली होती आणि इतक्या कमी वेळात ही एवढीशी चिमणी एवढ्या उंच डोंगरावरच्या कपारीत पोहचणार कशी हेच मला समजत नव्हतं. काळाची वेळ आणि ठिकाण चुकणं कदापि शक्य नाही म्हणून मी म्हणत होतो, 'हे कसे शक्य आहे...!' असो, आपल्या मदतीने माझी कामगिरी फत्ते झाली त्याबद्दल आपले मनापसून आभार...!'

-------------------------------------------------------------------

या पारंपारिक जातककथेचे बाळबोध तात्पर्य 'काळाचा महिमा गौरविणारे विधिलिखित' असे काहीसे असावे. तथापि आजच्या संदर्भात हे तात्पर्य आपण 'भित्यापाठी ब्रह्मराक्षस' असे समजायला हरकत नाही. चिऊताई हे आपल्यासारख्या सामान्य प्रजेचे रूपक असेल तर पक्षीराज गरुड ही 'व्यवस्था' अर्थात 'सिस्टीम' मानायला हरकत नाही, जिचा एक पंख शासन, दुसरा प्रशासन आणि चोच अर्थात मुखपत्र म्हणजे मिडिया आहे. काळ घिरट्या मारतो आहेच आणि अजाणतेपणी ही व्यवस्थाच चिऊताईची वेळ भरण्यास मदत करून काळदूताची सोय करतेय... 

तेव्हा, सुमारे ९०% विकार हे मानसिक असतात, दुर्बल मन शरीराची प्रतिकारशक्ती (इम्युनिटी) कमी करते आणि अशक्त शरीरसंस्था किटाणू-विषाणूंच्या सहज शिकार होतात... एवढी त्रिसूत्री लक्षात ठेवून सर्व खबरदारी नेमस्तपणे घेतली तर गरुडाच्या अवकाशात पोहचण्याची वेळच येणार नाही...

शुभम भवतु !
----------------------------------------------------------

बाय द वे... बरेच वर्ष झाले, टेरेसवर पसरलेले दाणे टिपायला आणि भांड्यातले पाणी प्यायला सकाळी चिवचिवाट करणाऱ्या चिमण्या अलीकडे दिसत नाहीत. कुठे गेल्यात कोण जाणे... की वयोमानानुसार आपलीच दृष्टी अधू झालीय...?

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा