रविवार, २६ फेब्रुवारी, २०२३

भावगर्भ...!


उद्या २७ फेब्रुवारी २०२३ रोजी महाराष्ट्र वैभव, मराठी भूषण, वि. वा. उर्फ तात्याराव शिरवाडकर अर्थात महाराष्ट्राचे ऋषितुल्य कविवर्य कुसुमाग्रज यांचा १११ वा जन्मदिवस आणि त्या औचित्याने साजरा होणार मराठी भाषा दिन. या निमित्ताने यापूर्वी इत्यादीवर ३ वेळा प्रकटन झाले आहे - मीच...! (२७ फेब्रुवारी २०१७)एक तरी ओवी अनुभवावी...! (२७ फेब्रुवारी २०१८) आणि गाभारा...! (२७ फेब्रुवारी २०२२).

आजही भावना त्याच, तेवढ्याच, किंबहुना वयोमानानुसार अधिकच उत्कट असल्या तरी या लिखाणाचे प्रयोजन (खरं तर उर्मी... की उबळ?) मिळाले ते आमचे धुळ्याचे आणखी एक रसिकोत्तम सन्मित्र शाम वाघ यांनी या निमित्ते पाठवलेल्या, ‘हिरवळ आणिक पाणी, तेथे मजला सुचती गाणी...’ म्हणणाऱ्या भावकवी बाकीबाब अर्थात कविश्रेष्ठ बा.भ. बोरकर यांच्या अत्यंत सटीक, समर्पक आणि समुचित कवितेचे !

आता ही कविता, भावगर्भतेचे प्रमाण असलेल्या बाकीबाब यांनी, संतांच्या मांदियाळीचा पाया रचत, 'विश्वाचे आर्त माझ्या मनी  प्रकाशले...' म्हणणाऱ्या आणि अवघ्या जगास 'भावार्थदीपिके'च्या माध्यमातून प्रकाशित करणाऱ्या संतश्रेष्ठ ज्ञानियांचा राजाच्या वियोगाच्या विवशतेतून लिहिली असतांना, त्यावर आपल्या अल्पमतीने एवढ्या विवेचनाची गरज नाही हे शामने सूचित करून देखील, 'त्याचा येळकोट राहीना। मूळ स्वभाव जाईना...!'

'भाषेची अवस्था' हा फावल्या वेळातील चर्वितचर्वणासाठी एक खमंग विषय असतो आणि 'अभिजातता' यावर देखील बराच खल निरंतर चालूच असतो. अशा निमित्ताने तर मोसमी भाषाभिमान्यांच्या प्रतिभेला अधिकच धुमारे फुटतात. त्या साऱ्यांना मराठी भाषेची महती कळावी आणि, ज्या कलाकृतीने कंठ दाटून येतो आणि डोळ्यांच्या कडा पाणवतात ती 'अभिजात' हे आकळावे म्हणून बाकीबाब यांची 'ज्ञानदेव गेले तेव्हा...' ही अत्यंत भावस्पर्शी रचना आणि, विंदांच्या जन्मशताब्दीनिमित्त चालविलेल्या, 'रोज एक कविता' उपक्रमादरम्यान आम्हाला गवसू न शकलेली दुसरी विंदांची कविता - 'तेथून दूर जावे...'  दोन्ही रचना सन्मित्र शामच्या सौजन्याने साभार !

ज्ञानदेव गेले तेव्हा

ज्ञानदेव गेले तेव्हा, कोसळली भिंत।
वेद झाले रानभरी, गोंधळले संत ।।

ज्ञानदेव गेले तेव्हा, आटे इंद्रायणी ।
मराठीच्या वडातळीं, जळूं लागे पाणी।।

ज्ञानदेव गेले तेव्हा, ढळला निवृत्ती ।
आसवांच्या डोही, झाली विझू विझू ज्योती।।

ज्ञानदेव गेले तेव्हा, तडा विटे गेला ।
बाप रखमा देविवरु, कटीत वाकला ।।

ज्ञानदेव गेले तेव्हा , बापुडला नामा।
लागोपाठ भावंडें, तीं गेली निजधामा।।

माझ्या ज्ञानराजा, तें रे कळों आले आज।
भरदुपारीं ही तशी, झाली तीनसांज।।

तेव्हांच्यासारखा, पुन्हा बावला मोगरा।
भुईभर झाल्या कळ्या, तुटला आसरा।।

इथे आळंदीत , आतां ऊर फाटे।
पंढरीच्या वाटेंतही, बाभळीचे काटें।।

कळ्यांचाहि वास जिवा, जाहलासे फांस।
एकाकीं प्रवास आतां, उदास उदास।।

- बा. भ. बोरकर

तेथून दूर जावे

सर्वस्व अर्पिती जे, त्यांचेच गीत गावे;
त्याची घडे टवाळी, तेथून दूर जावे.

नसता विनोद काही हसतात, लोक सारे;
चाले असा तमाशा, तेथून दूर जावे.

संगीत ज्या ठिकाणी, रसहीन चाललेले;
बुद्धीस खाजवाया, तेथून दूर जावे.

विद्वान कल्पनांचा, काढीत कीस जेथे,
सामान्य माणसांनी, तेथून दूर जावे.

जनतेस नागवूनी, बनतात जे पुढारी,
त्यांचा झडे नगारा, तेथून दूर जावे.

बागेत हिंडताना, कुंजात लाडकीशी,
कुजबुज कानि येता, तेथून दूर जावे.

मोहान्ध होऊनिया, जे दार गाठलेले,
ते उघडण्याच पूर्वी, तेथून दूर जावे!

- विंदा करंदीकर

मराठी भाषा गौरव 'दिना'च्या 'मना'पासून शुभेच्छा आणि अभिष्टचिंतन !

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा