गुरुवार, २० जुलै, २०२३

'सुशि'...!




११ जुलै ला 'सुशि'ला जाऊन २० वर्षे झाली. 

काल 'दुनियादारी' या संजय जाधव यांच्या मराठी चित्रपटाला १० वर्षे झाली. 

'वाढत्या' वयामुळे काळ फारच भरभर सरकतो आणि 'रात ढल जाये पर दिन ना जाये...' अशी परतवारीची प्रचिती प्रबळ होत राहते. अगदी कालच लिहिल्यासारखी वाटणारी 'दुनियादारी' ही पोस्ट आज दहा वर्षांची झाली. ही पोस्ट लिहिण्याचे निमित्त ठरलेल्या दिपक दादा आणि, आज याची आठवण करून देऊन 'इगो-वाईज'वरील या पोस्टचा दुवा 'इत्यादी'वर देण्याचे निमित्त ठरलेले सहकारी डॉ. नितीन जाधव, यांचे 'मना'पासून आभार ! 

खरं तर सुशिच्या 'समांतर'वर वेबसेरीज बनविण्याचा सतीश राजवाडेंचा धाडसी प्रयोग कसा 'सम अंतर'च राहिला आणि प्रेक्षकांशी सोडा, कथेशीही तादात्म्य कसा पावू शकला नाही या वरही एक पोस्ट लिखना बनता है. पण असे प्रयोग, ज्यांना 'सुशि' नावाचे गारुड काय आहे याची कल्पनाही नाही त्यांना 'सुशि'ची निदान तोंडओळख होण्यासाठी 'निमित्तमात्र' ठरतेय म्हणतांना अशा धाडशांचे (खलाशांच्या धर्तीवर) स्वागतच करायला हवे.  

समग्र 'सुशि' समजणे येरागबाळ्याचे काम नोहे आणि ते 'जाता... येता' इतके सहजसाध्यही नव्हे, नुसतीच 'लटकंती' व्हायची ! तरी 'सुशि'च्या रेंजची साधारण 'झलक' मिळण्यासाठी वाचायची पुस्तके:
१. दुनियादारी (उपरोल्लेखित चित्रपट पाहणे हा पर्याय नाही!)
२. समांतर (पहा: वरील सूचना, वेब सिरीज नव्हे!)
३. तलखी 
४. कल्पांत 
५. लटकंती 
६. दास्तान
७. वास्तविक       

'सुशि'ला लौकिकार्थाने ऐहिक जगातून जाऊन २० वर्षे झाली असली तरी त्याचे निकट सान्निध्य जाणवून देतो तो त्याने मागे ठेवलेला 'खजिना'. मनावर 'क्रमशः' 'बरसात चांदण्याची' करीत 'क्षण क्षण आयुष्या'तले 'मूड्स' आणि 'शेड्स' सांभाळीत 'असीम' 'अंमल' करणाऱ्या आणि कठीणातल्या कठीण प्रसंगीही 'हाSत तिच्या' 'एवरीथिंग... सोSसिम्पल' वाटेल असा 'माहौल' बनविणाऱ्या 'उस्ताद' सुशि नावाच्या 'मानवाय तस्मे नमः' असाच भाव 'सुशि'च्या चाहत्यांच्या 'मना'त 'कणा कणाने' फुलत राहतो...

किशोरदा, अमिताभ पासून नवाज, सचिन पर्यंत, जे 'आपले' वाटतात त्यांचाबद्दलच्या स्नेहादरात कुठेही कसर न करताही ज्यांचा, मानभावी आदरपूर्वक उल्लेख टाळून, सहजभावाने एकेरी उल्लेख होतो त्या यादीत 'सुशि'चे स्थान केवळ उच्चच नाही तर अढळ ! 'आदरणीय सुहास शिरवळकर' असे म्हणणे म्हणजे, बायकोला 'हर हायनेस' किंवा 'माय लॉर्ड' संबोधीत वेडावून दाखविल्यासारखे कर्णकटू वाटते. किशोर जसा आपला, सचिन जसा आपला तसा 'सुशि'ही आपलाच. या लोकांचे आपल्या मनातील स्थान आणि वय दोन्ही अबाधीत, जणू गोठवून (आणि साठवूनही) ठेवलेले... कालजयी !

तेंव्हा 'सुशि'चा मुलगा असला तरी श्री. सम्राट सुहास शिरवळकर यांचा नुकताच झालेला परिचय हा त्यांना थेट अरेतुरे करण्याइतपत मुरलेला नसल्याने तिथे संस्कार आडवे येतात. यांवर खुद्द 'सुशि' काय म्हणाला असता यावरचे कट्टामंथन उद्बोधक ठरावे. तेही 'सुशिप्रेमेच्छा बलीयसी...!' या लघुसूक्तानुसार लवकरच घडेल ही अपेक्षा !

सुशिच्या संपूर्ण लेखनसूचीसाठी हा ब्लॉग पहा:
http://suhasshirvalkar.blogspot.com/

२ टिप्पण्या:

  1. "सुशि" ला कॉलेज च्या दिवसांत वाचणं आणि ह्या वयात वाचणं ह्यात "वास्तविक" "जमीन - आसमान" इतका फरक आहे.

    "एक... फक्त एकच" गोष्ट म्हणजे त्याचा "अंमल"... तो आपल्याला तेव्हाही "हमखास" "स्पेल बाऊंड" करून विचारांच्या "वेशीपलिकडे" घेऊन "जाई" आणि आताही "मूड्स" बनवून जातो... "इत्यादी - इत्यादी"... "असो..."

    सगळ्याची "फलश्रुती" आणि "निदान" म्हणजे...

    "ओ गॉड" सुशि इज सुशि...!!!

    उत्तर द्याहटवा
    प्रत्युत्तरे
    1. धन्यवाद, दादा! आपल्या सुशिच्या १६८ पुस्तकांच्या यादीची आठवण झाली!

      हटवा