रविवार, ९ जुलै, २०२३

चातक...?


इष्क-विष्क, दिल-मोहोब्बत, प्यार-व्यार आणि ह्रदय पिळवटणारी वेदना यांच्या खालोखाल (किंवा बरोबरीने), 'पाऊस' हा संवेदनशील कविमनांचा कदाचित सर्वात लाडका विषय असावा. शिवाय या भावनांचा ओलावा रसिकाच्या थेट काळजाला भिडण्यासाठी पावसाचा जो मुक्तहस्ते वापर होतो, तो जमेस धरता, काव्यप्रेरणेच्या विषयात पावसाने पहिला नंबर काढायला हरकत नसावी. सन्माननीय, प्रथितयश कवीश्रेष्ठांपासून, प्रत्येक पहिल्या पावसात कावळ्याच्या छत्री टाईप उगवणाऱ्या, 'कवी काय म्हणतो...' अशा अविर्भावाच्या हौशी कवींपर्यंत, पावसाला विषयवस्तू बनविण्याचा मोह कुणालाही टाळता आलेला नाही. या साऱ्या कवितांची नोंद घ्यायची म्हटली तर खंड-काव्य-सूची करायला लागेल आणि त्या प्रबंधासाठी ही जागा आणि व्यासंग दोन्ही अपुरे पडतील.

अलीकडे साऱ्याच गोष्टी बेभरवशाच्या, अनियमित आणि तऱ्हेवाईक झाल्या असल्याने पावसालाही त्याची लागण झाल्यास नवल नाही. 'नेमेचि येतो मग पावसाळा...' हे 'सृष्टीचे कौतुक' आता केवळ छापील ओळीतूनच शिल्लक असल्याने आणि 'बाळा'ने आपले वेगळ्याच विषयातील कुतूहल शमविण्यासाठी भलत्याच मार्गांची निवड केली असल्याने त्याला कसलेच कौतुक वाटणे कधीच बंद झाले आहे. त्याला आता फक्त 'वॉव मोमेंटचे क्रेव्हिंग' असते, यु नो !

अशा परिस्थितीत, कितीही पारंपरिक, संस्कृतीजन्य आणि 'अभिजात' असले तरी, 'ये रे ये रे पावसा...' ला रिटायर होण्याशिवाय पर्याय नाही. पण त्यामुळे पोकळी वैगरे तयार होण्याचे कारण नाही, आजच्या अत्याधुनिक जीवनशैलीत, लोकल-मेट्रो-बस पासून मंदिर-शाळा-हॉटेल साऱ्या ठिकाणी पुढच्याला हुसकावून आपला नंबर लावण्याची इतकी 'चढा'-'ओढ' आहे की शहरात कुठेही ब्रिथिंग स्पेसही शिल्लक नाही याचा प्रत्यय पदोपदी येतो. बऱ्याच अर्बनाईट्सना तर पाऊस ही अनावश्यक कटकट वाटते, बघा: सौमित्रची कविता - 'त्याला पाऊस आवडत नाही...'

तर मुद्दा असा की प्रत्येक पावसाळ्यात पाऊस या विषयावर कवितांचा अक्षरश: पाऊस पडतो पण सगळ्याच कविता 'मना'ला भिडतात, पापणी भिजवतात किंवा हृदय ओलावतात असे नाही. सवडीने निवड करू म्हटलं तर ऋतू बदलून गुलाबी थंडीच्या कवितांचा सिझन उगवायचा ! पण सन्मित्र प्रसादने पाठविलेल्या या कवितेने काही घाव ताजे केले आणि बऱ्याच जुन्या जखमा नव्याने भळभळू लागल्या. 'गेले ते दिन गेले...' ची आर्त जाणीव अधिक गहिरी करणाऱ्या आणि दाहक वर्तमानाच्या वास्तव चित्रणाबरोबर, भविष्यातील धोक्यांचे सूचन करणारी ही कविता.

अत्यंत बारकाईने शोध घेऊनही, सदर कवितेमागील भावना आणि तिचे प्रत्ययकारी सृजन करणाऱ्या दार्शनिक कविमनाचा थांगपत्ता लागू शकलेला नाही. एक अगदीच क्षीण दुवा सापडला तो फेसबुकावर Unofficial: Poetry या पेजवर पण तिथेही विश्वासार्ह, सप्रमाण नामोल्लेख आढळत नाही. प्रत्येक कलाकाराला त्याच्या कलाकृतीच्या श्रेयसौजन्याचं भाग्य लाभतच असं नाही आणि त्यामुळे त्या कलाकृतीच्या रसास्वादनात काही उणीव राहते असंही नाही, पण त्या काव्यानुभवात चिंब झाल्यावर मनाच्या तळाशी राहते ती, ...मऊ पिसांच्या सात थरांच्या गादीवर झोपतांना, त्याच्या तळाशी असलेला इवलासा मोती टोचणाऱ्या राजकन्येच्या टोचणीसारखी... त्या अदृश्य निर्मात्याला जाणून घेण्याची हुरहूर ! 

काही समजले तर जरूर कळवा, चातकाप्रमाणे वाट पाहतोय...! 

पाऊस

चोचीने कोरले नखांनी ऊकरले
तरी जमिनीत झरा लागत असे,
व्याकुळलेल्या जिवांची पूर्वी
सहज तहान भागत असे !

'येरे येरे...' म्हणताच
पाऊस येत असे मोठा,
त्यालाही ठाऊक असे
पैसा आहे खोटा !

पैसा खोटा होता तरी
माणूस मात्र खरा होता,
प्रत्येकाच्या काळजात
जिव्हाळ्याचा झरा होता !

'ये गं ...ये गं' म्हणताच
सर यायची धावून,
चिमुकल्यांच्या मडक्याला
तीही न्यायची वाहून !

एकदा पाऊस आला की
मुक्कामी राहत असे,
निघून जा म्हटलं तरी;
मुद्दाम जात नसे !

हल्ली 'येरे येरे...' म्हटलं तरी
पाऊस साद देत नाही,
ख-या पैशालाही
मुळीच दाद देत नाही !

कत्तल केली जंगलांची
पशू-पक्षी राहिले नाही,
जमिनीला भोसकताना
मागेपुढे पाहिले नाही !

हौद हरवले गुरांचे
पाणपोई दिसत नाही,
बाजार मांडलाय पाण्याचा
ह्यावर विश्वास बसत नाही !

कॅन, बाॅटल, टँकर आले
मडके केंव्हाच फुटले,
कशी येणार सर धावून
नाते आपुलकीचे तुटले !

कुठे राहिली ओढ्याला
सांग बरं ओढ ?
कितीही प्रगती केली विज्ञानाने
पाऊस होतो का डाऊनलोड ?

तुझ्या स्वार्थासाठी
पाऊस येईल तरी कशाला ?
तुझ्यामुळेच कोरड पडली
नदी-विहिरीच्या घशाला !

तूच भोग तुझी फळे
फेड तुझे तूच पातक,
बघ कसा शाप देतोय
तहानलेला चातक !

- अनामिक

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा