रविवार, १५ नोव्हेंबर, २०२०

गोताखोर...?

मुलांचं 'करीयर' चांगलं घडावं म्हणून...
लहानपणापासून त्यांना दिवसभर कुठल्या ना कुठल्या...
क्लास, ट्रेनिंग किंवा डेव्हलपमेंट ॲक्टीव्हीटी मध्ये गुंतवून,
सतत घड्याळाच्या काट्याला बांधून घ्यायला लावून आणि
ते जे जे काही करतील त्यात पुढे (पुढे?) राहण्यासाठी...
एका निरंतर स्पर्धेच्या अंतहीन गर्तेत लोटून,
अष्टोप्रहर जिंकण्याचा विचार आणि
त्यासाठी लागेल ती तडजोड करण्याचे
बाळकडू पाजणाऱ्या पालकांनी,
‘बेटा, आज तरी लवकर घरी ये...’ किंवा
‘मुले आम्हांला वेळच देऊ शकत नाही...’
असे म्हणणे हे गोताखोराने,
'मला पोहण्याचा आनंदच घेता येत नाही...'
असे म्हणण्यासारखे नव्हे काय...?

...दिवाळीच्या सुट्टीमध्ये फराळासोबत तेवढचं बुद्धीलाही खाद्य;

'डाएट'वर असाल तर सोडून द्या... दीक्षित आणि दिवेकरांवर!

शुभ दीपावली!

रविवार, ८ नोव्हेंबर, २०२०

निर्गुण...?



बोलभांड ते चिडीचूप
अळीमिळी गुपचिळी
लोकशाहीची नवी खेळी
देखीली गा !

काळ आला वेळ आली
तसे धुरंधरही धारातिर्थी
लाभार्थी झाले शरणार्थी
एकाएकी !

चढती कमान उतरतेही
निसर्गचक्र वलयाकार
त्यात निर्गुणही साकार
कधी कधी !

बाजू पालटता 
बदलाचे वारे 
भासती न्यारे 
सर्वालागी !

रविवार, २५ ऑक्टोबर, २०२०

विजय...!


भक्ती-शक्ती, दया-माया, लक्ष्मी-बुद्धी ‘रूपेण संस्थिता’
अशा ‘देवी-स्वरूप’ मुलीस जन्मालाच न येऊ देण्यापासून,
तिच्या आयुष्यात पदोपदी काटे पसरण्यात धन्यता मानणाऱ्या,
निसर्गत: तिला भोगवस्तू म्हणून शुद्र लेखणाऱ्या दांभिक समाजात...

आपल्या मातृशालेचे संस्कार संवैधानिक उच्चपदावरून मिरविणाऱ्या
पालकांच्या जल्पकांनी सामाजिक सौहार्द्राला धार्मिक रंगात हिणवणे,
‘जय जवान जय किसान’ आणि ‘सत्यमेव जयते’ यांच्या थडग्यावर   
मतपेटीसाठी नागरिकांना त्यांच्या मुलभूत हक्कांचे प्रलोभन देणे...

काही दशकांच्या एकत्रित प्रयत्नांच्या फलश्रुतीला सुरुंग लावत  
प्रतिकात्मक गर्दीला अभिवादन करत अदृश्य मानवंदना स्वीकारणे
या साऱ्यात दशाननाचे नेमके कुठले प्रतिक दहन झाले आणि
कशात ‘राम’ उरला... या विचारात बुडालेली ‘विजयादशमी!’

रावणही आपल्यातच आहे आणि रामही,
मात्र अंती कोण जिंकेल हे ठरेल,
आतील विकार बळावतो की विवेक
आणि विखार वाढतो की विचार यावर!   

तोवर, खालावलेल्या अर्थव्यवस्थेला उभारी देण्यासाठी
माध्यमातून ओसंडून वाहणाऱ्या साजऱ्या वस्तूंची
खरेदी करण्यासाठी लगबग करू या,
दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर...!

रविवार, १८ ऑक्टोबर, २०२०

मास्क...!



अलीकडे बोलत नाहीस म्हणे...

मास्क लावलाय ना जीव वाचवण्यासाठी... स्वत:चा; आत्मनिर्भर असायला हवे म्हणून!
तसा लावला कधीचाच आहे, आज दिसतोय सगळ्यांना... उघड उघड, एकमेकाचा 

म्हणजे असं बघा साधारण चलन आलं चलनात आणि
दळणवळण सुरू झालं... आडवळणानं, तेव्हापासून घालतोय मुखवटा!
आता तो मास्क म्हणून केवळ लब्धप्रतिष्ठितच नाही तर 
ब्रँडेड, अनिवार्य, कायदेशीर आणि वॉशेबल ही झाला! 
त्याच्याशिवाय जगायच म्हटलं तर होतो मुजोर कायदेभंग 
आणि एकटे पडण्याचा धोका... तो वेगळाच
काही बोलावे म्हणून तोंड उघडलं तर नुसतच मायमिंग... 
शब्द गिळावेच लागतात, काढयासोबत 
पण नाहीतरी बोलण्याची मुभा सगळ्यांना होतीच कधी...?
आणि बोललीच समजा उसासून...
ऐकतयं कोण आणि समजतयं कुणाला? 

धून वही सुनाई देती है जंहा ध्यान लगा हो!
बाकी... इतना सन्नाटा हमेशाका है भाई! 
बरं अस्वस्थ वर्तमानाचं भविष्यातील इतिहासासाठी चित्रण करावं तर,
कागद एसीतल्या कार्पोरेटचा आणि शाई उन्हात राबत्या मजूराची... 
कशी व्हावी युती आणि कशी घ्यावी आघाडी?
थोडे आगाडी बाकी पिछाडी अन चलती का नाम गाडी
असंच चाललंय युगानुयुग...

शेवटी तीनच चेहरे खरे... ययाती, देवयानी आणि कचाचे;
बाकी सगळेच मुखवटे 'कच'कड्यांचे... शुक्राचार्यांसह!
 
आणि लिहिलाही समजा इतिहास आजच्या वर्तमानाचा,
उद्याच्या भविष्यासाठी... कुणी काही शिकेल म्हणता...?  
अहो, जो ‘जाणता माणूस’ स्वत:च्या उत्क्रांतीपासून आणि
अनेकानेक राज्यक्रांत्यातून तर सोडाच,
अजूनही ज्याच्या सावटाखाली वावरतोय त्या
स्थानबद्ध साचलेपणातून काही शिकतांना दिसत नाही,
तो आपण ‘जाणते’ कसे झालो आणि नेणतेपणी 
उलट्या प्रवसास का लागलो समजून घेईल म्हणता?
नाव नको...!

तरी आशा सोडून चालणार नाही... 
'रात्रीच्या गर्भात असे उद्याचा उष:काल...' एक कवि म्हणतो
आणि दुसरा म्हणतो ‘अरे, पुन्हा आयुष्याच्या पेटवा मशाली...’
मग उमेद हरून आणि प्रयत्न सोडून कसे चालेल?

मी नाहीच सोडलीय आशा आणि थोडी धुगधुगी आहे...
अजूनही उमेदीत शिल्लक... 
फक्त कधीतरी खूप विषाद दाटून येतो
माणुसपणाचा... अमानुष होतांना!
मग उचलावा वाटतो छिन्नी हातोडा, 
नको तो भाग फोडून काढण्यासाठी
आणि घडविण्यास ते शिल्प...
जे ‘माणूस’ शब्दात पहिले असेल नियतीने!

बघू, जमेलही म्हणे कधीतरी, कुणी सांगावं...!

शनिवार, १९ सप्टेंबर, २०२०

मर्मबंधातली ठेव ही… २

बंडूकाकांच्या कविता इत्यादीवर याव्यात ही आमची इच्छा फलद्रूप होतांना खरेतर काकांना सरप्राइज द्यायचे म्हणून त्यांची मदत घ्यायची नव्हती. पण यासाठी आवश्यक ऐवज आमच्याकडे लिखित स्वरूपात सापडेना झाला आणि स्वत:च्या स्मृतीच्या (किंवा ‘भक्ति’-’भावा’च्या?) भरवशावर उगाचच चुकीचे काहीही दडपून छापून टाकायला हे काही कुणाचे मुखपत्र नसल्याने, काकांकडूनच या कविता संवादून घ्यायचे ठरले. काकांच्या या दुसऱ्या कवितेला निश्चितच अजून किमान दोन कडवी आहेत याची आम्हाला खात्री होती, पण काकांना त्या दिवशी या दुसऱ्या कवितेची एकूण तीनच कडवी आठवली. तथापि काकांचा सुपुत्र तन्मय याने काकांना आठवण करून दिल्याने उर्वरित तीन कडव्यांबद्दल काकांची खात्री झाली आणि आमचे समाधान!

मग त्या दडून बसलेल्या तीन कडव्यांची शोध मोहीम सुरू झाली आणि शेवटी काकांनाच त्यांच्या एका जुन्या वहीत ही संपूर्ण कविता सापडली आणि आम्हा सगळ्यांना ‘आज मुझे उस बूढ़ी अलमारी के अन्दर पुराना इतवार मिला है...!’ असे ‘गुलजार’ फिलिंग आले. शिवाय काकांच्या पहिल्या कवितेच्या निमित्ताने सुरू झालेल्या ‘डाऊन द मेमरी लेन...’ प्रवासात दरम्यान अनेक सहप्रवासी सामील झाले आणि अनेकानेक गतस्मृतींना उजाळा मिळाला. या समुद्रमंथनातून अर्थातच अनेक रत्ने हाती लागली, त्या साऱ्यांना देखील इत्यादीवर मानाचे पान यथावकाश मिळेलच; तूर्त काकांची दुसरी कविता...

या कवितेच्या जन्माची कथा मोठी रंजक असली तरी काका ती जशी खुलवून सांगतात तशी मला शक्य नसल्याने आणि माझ्या प्रतिभेच्या(?) मर्यादांची मला पुरेपूर जाण असल्याने मी अधिक फुटेज न खाता फक्त एवढेच सांगतो की ही कविता काकांनी चक्क इरेस पडून केली आहे. ‘कविता करणे ऐऱ्यागैऱ्याचे काम नव्हे, त्यासाठी दैवी प्रतिभा लाभावी लागते’ अशी अंधश्रद्धा (‘श्रद्धा डोळस कशी असेल, ती अंधच असावी लागते...’ इति काका!) बाळगणाऱ्या आणि त्या काळी गाजणाऱ्या (आणि आजही एक मानदंड असलेल्या) एका अत्यंत लोकप्रिय गझलेचे, ते जणू काही पसायदानच असावे अशी भलामण करत असलेल्या एका भक्ताच्या उद्बोधनासाठी अक्षरश: बसल्या बसल्या कागद पेन मागवून काकांनी ही गझल लिहिली आहे...

अशा तऱ्हेने जन्मलेल्या या नितांतसुंदर गझलेचे, काळाच्या ओघात राहून गेलेले, नामकरण करण्याची आणि तिला गीताचे रुपडे देण्यासाठी धृवपद आणि कडवी अशी रचना करण्याची क्रिएटिव्ह लिबर्टी (??) मी काकांच्या अनुमतीने घेतली आहे, त्यात काही न्यून आढळल्यास तो सर्वस्वी माझा दोष असल्याने मूळ रचनेच्या रसपरिपोषात त्याचा अडथळा मानू नये. आज सादर आहे काकांची ही दुसरी अभिजात रचना…

रात्र

शृंगार चांदण्याचा नेसून रात्र गेली,
निःशब्द यातनांना भेदून रात्र गेली II धृ II

श्वासांवरी हवाला जग शांत झोपलेले,
माझ्याच मंचकी या जागून रात्र गेली II १ II

जागेपणी कळेना मनी काय स्वप्न होते,
दारात स्वप्न तोरण बांधून रात्र गेली II २ II

दिवसा कधी न कळल्या ज्या सूक्ष्म तरल गोष्टी,
त्या सर्व भावनांना स्पर्शून रात्र गेली II ३ II

निद्रेस मीही जेव्हा बोलावण्यास धजलो,
निद्रेस दूर तेव्हा पळवून रात्र गेली II ४ II

मी 'थांब, थांब' म्हणता ती चालली निघाली,
'येते पुन्हा उद्या मी' सांगून रात्र गेली II ५ II

- गोपाळ बापू पुराणिक (१९८५)

रविवार, १३ सप्टेंबर, २०२०

मर्मबंधातली ठेव ही...!

३० ऑक्टोबर २०१८ च्या ‘कवित्व’ या पोस्टमध्ये आमचे आजोबा अण्णा अर्थात ‘केशवतनय’ यांचा अत्यल्प परिचय झाला होता आणि अण्णांपासून सुरु झालेली साहित्यिक प्रतिभेची परंपरा आज पाचव्या पिढीत समृद्ध होतांना पाहून समाधान वाटते. आमच्या वडिलांची दुसरी पिढी आणि या पिढीतील ज्येष्ठ, आमचे थोरले काका, यांच्याबद्दल १ ऑक्टोबर २०१८ च्या ‘गदिमा’ या पोस्टमध्ये आपण वाचले. आज या दुसऱ्या पिढीतील सर्वात धाकटे काका गोपाळ पुराणिक अर्थात आम्हां तिसऱ्या पिढीतील सर्वांचे अत्यंत लाडके बंडूकाका यांच्या प्रतिभेची एक झलक पाहू या.

वर्तमानपत्रामध्ये बंडूकाकांनी पुष्कळ लिखाण केले आणि त्यांचे तत्कालीन राजकारणावर आणि इतरही सामजिक, सांस्कृतिक विषयांवर केलेले मार्मिक भाष्य हे त्या वर्तमानपत्राच्या स्थानिक आवृत्तीचा मानबिंदू (आजच्या बाजारू पत्रकारितेच्या भाषेत टीआरपी!) होते. काकांनी अनेक क्षेत्रात उमेदवारीही केली आणि मुशाफिरीही केली पण जीवनाचा चिंतनशील भाष्यकार तथा रसाळ कथाकथनकार ही त्यांची सगळ्यात आवडती भूमिका! कुठल्याही घटनेचे, प्रसंगाचे अथवा कथेचे अत्यंत तपशीलवार तरीही रंजक वर्णन करावे ते काकांनीच. या ग्रहणशक्ती आणि सादरीकरणाच्या कौशल्याचा त्यांना फारसा व्यावहारिक उपयोग झाला नाही (किंवा करता आला नाही) पण यामुळे लोकसंग्रह उदंड झाला!

आम्ही लहान असतांना तर बासरी, हार्मोनियम वाजवणारे, एकामागून एक धमाल गोष्टी सांगणारे, हिंदी चित्रपट आणि त्यातील गाण्यांचे इत्यंभूत ज्ञान असणारे आणि त्या काळातील प्रथेनुसार राजेश खन्नाचे फॅन असल्याने त्याची स्टाईल कॉपी करणारे 'काका' आम्हां मुलांचे हिरो नसते तरच नवल! काव्य-शास्त्र-विनोदाची गोडी आम्हांला लागली ती काकांमुळेच. वाचनाच्या व्यसनामुळे दिवाळी अंकांचे फिरते वाचनालय चालवायची आयडिया आम्हाला सुचली तिचे श्रेयही काकांचे. ते वाचनालय जरी फारसे चालले नसले तरी त्या निमित्ताने त्या वर्षीचे बहुतेक सारे दिवाळी अंक आम्हांला वाचायला मिळाले आणि शिवाय काही संग्रही ठेवता आले याचाच आनंद जास्त! कलाभान जपतांना व्यवहारज्ञानाचा सपशेल अभाव हा संस्कारही बहुदा काकांमुळेच नकळत घडला असावा... असो!

अशा आमच्या हरहुन्नरी, कलाकार आणि कबिरी वृत्तीच्या काकांनी काही पद्य रचना केल्या नाहीत असे कसे होईल? काकांच्या कविता हा एक स्वंतत्र विषय असला तरी त्यांच्या एका अतिविशिष्ट रचनेसाठी आजची पोस्ट. सर्वकालीन समाजव्यवस्थेचे व्यवच्छेदक लक्षण दाखवून देतांना स्वत:च्या व्यक्तिमत्वाचे परखड परीक्षण आणि तेही ऐन तिशीमध्ये करणे हे सोपे काम नाही. या अभिव्यक्तीसाठी कर्णाहून सुयोग्य आणि चपखल रूपक कालत्रयी सापडणे शक्य नाही म्हणूनच काकांनाही तो मोह टाळता आलेला नाही. भल्या भल्या प्रतिभावंतांना भुरळ पाडणारी कर्णाची व्यामिश्र व्यक्तिरेखा काकांनी आत्मानुभवाच्या पातळीवर अशी काही प्रतिबिंबित केलीय की याला कर्णाचे लघुत्तम चरित्र म्हणण्यास खुद्द कर्णाचाही आक्षेप नसावा!

आयुष्याच्या भाष्यकाराची चिंतनशीलता, सिद्धहस्त गझलकाराची गेयता आणि प्रकटनातल्या प्रामाणिकपणाची मोहकता अशा त्रिगुणांनी सजलेल्या या रचनेला इत्यादीवर मानाचे पान देण्याची अनेक वर्षांची दुर्दम्य इच्छा आज पूर्ण होण्यास पुन्हा एकदा मदत झाली ती बंधुसखा योगगुरू कलाकार रंगवैभव अर्थात कुमारची! छापील स्वरुपात काकांकडे आणि हस्तलिखित स्वरुपात आम्हां दोघांकडे असलेल्या या रचनेच्या प्रती कुठल्या ना कुठल्या कारणाने गहाळ झाल्या आणि काही केल्या कुणालाही सापडेना. खुद्द काकांनाही संपूर्ण रचना मूळ स्वरुपात स्मरत असेल का अशा संभ्रमात खूपच कालापव्यय झाला.

शेवटी, कुठल्यातरी निमित्ताने काकांशी भ्रमणध्वनीवर संभाषण चालू असतांना योगगुरूंनी अत्यंत खुबीने या विषयी संवाद साधत काकांची कळी खुलवली आणि गतस्मृतींना उजाळा देत, ‘जलते है जिसके लिये...’ स्टाईलमध्ये काकांच्या डिक्टेशनने संपूर्ण गझल उतरवून घेतली! आपल्या छापील अक्षरात ‘होतो महारथी मी...’ कागदावर उतरवून त्याचा फोटो काढून तत्परतेने मला पाठवला तेव्हा तेवढ्याच तत्परतेने ती टंकलिखित करून ठेऊन लवकरात लवकर इत्यादीवर प्रकाशित करणे मला आगत्याचे वाटले! हे ‘नमनाला घडाभर तेल’ नसून, हिऱ्याला शोभिवंत करणारे कोंदण मिळावे म्हणून केलेला अट्टाहास आहे याची प्रचीती येईल ही अपेक्षा! तेव्हा, आजच्या मुहूर्तावरगोपाळ बापू पुराणिक अर्थात आमचे लाडकेबंडूकाका यांची ही एक अभिजात रचना...

कर्ण

होतो महारथी मी पण कर्ण नाव होते…
त्यांच्याच सोंगट्या अन् त्यांचेच डाव होते !

स्पर्धेत कोणत्याही माझा नसा प्रवेश... 
त्यांचेच पंच आणि त्यांचेच गाव होते !

सांभाळली सुबुद्धी अन रंक जाहलो मी... 
गेले लुबाडूनी जे सगळेच राव होते !

त्यांनीच मांडले हो घनघोर युद्ध जेव्हा... 
माझ्या शरांत तेव्हा गतिमान ठाव होते !

मी एकटाच होतो समरांगणी लढाया... 
त्यांच्याकडून लढण्या साक्षात देव होते !

भगवंत कृष्ण म्हणूनी जग वंदते जयाला... 
माझ्या समोर त्याचे फसवे ठराव होते !

होतो महारथी मी पण कर्ण नाव होते… 
त्यांच्याच सोंगट्या अन् त्यांचेच डाव होते !

- गोपाळ बापू पुराणिक (१९८५)

शनिवार, १५ ऑगस्ट, २०२०

स्वतंत्र...?


मानवाने विकासाच्या मार्गावर,
अनेकानेक यशस्वीतेचे टप्पे गाठले म्हणून...
माणसाच्या साऱ्या विजयांची पताका मिरवावी की,
वाढत्या विषमतेने आणि असंवेदनशील स्वकेंद्रिततेने
बिघडत्या समाजस्वास्थ्याची चिंता वहावी...

रोज चढत्या-उतरत्या बाजाराची पर्वणी अनुभवावी की
ऊंच मनोऱ्यांच्या पायथ्याशी कोंडलेली घुसमट ऐकावी...
नित्य शेकड्याने वाढणाऱ्या कोट्याधीशांची की
कोटी कोटीने वाढत्या वंचितांची मोजदाद करावी...

प्रच्छन्न दांभिकतेचे नयनरम्य सोहळे मिरवावे की
मूकनायकांच्या निर्मम प्रशांत सादेस प्रतिसादावे...

स्वातंत्र्यदिन साजरा करावा की
'आत्मनिर्भर' व्हावे या संभ्रमात,

आज 'मी' स्वतंत्र...?

रविवार, २ ऑगस्ट, २०२०

मैत्र...!



एक गुपित सांगू तुला...?

चिकटत गेल्या जन्माआधीपासून पाती
अन भेटत गेली जन्मल्यापासूनच नाती...
काही रक्ताची, काही हक्काची...
काही भक्तीची तर काही सक्तीची!

नातेवाईकही होते आणि तऱ्हेवाईकही...
सगे सोयरे तसे भक्त अन उपभोक्तेही
माझ्या स्वप्नांशी नव्हता त्यांचा संबंध,
माझ्या आकांक्षा तर त्यांच्या गावीही नव्हत्या
माझी विवंचना त्यांना वंचना वाटली आणि
माझ्या भविष्याच्या कल्पनांना तर
‘वेध’ सोड ‘वेड’ ही म्हटले नाही रे त्यांनी!
म्हणून मला प्रतीक्षा होती, आहे, राहील...

माझ्यातल्या वेडेपणाला समजून घेणाऱ्या,
मी जिंकलोच कधी तर माझ्याहून अधिक धन्य होणाऱ्या
आणि हरलोच नेहमी तरी तेवढेच खिन्न होणाऱ्या पण
‘धिस इज नॉट द एंड ऑफ द वर्ल्ड...'
असं धीरोदात्त बाण्याने निक्षून सांगणाऱ्या
बाकी काहीच नाही तरी, ‘मी आहे रे...'
अशा आश्वासक शब्दांची फुंकर घालत,
माझ्या अव्यवहारी, अ-मूल्य धडपडीला तेवढीच
निर्हेतुक, निनावी पाऊलखुणांची सोबत करत,
न भेटता न बोलताही सतत उमेद देत आणि
कटू भावनांचे निर्माल्य नेमाने विसर्जित करीत...

पाणकळा लागलेल्या ढगाने उसासून बरसावे, मोकळे व्हावे
तसे ज्याच्यासमोर मोकळे उघडे रिते रिकामे होता येईल...
असा एक तरी नि:संदर्भ, बेहिशेबी, बेमतलबी किनारा असावा 
चित्रगुप्ताच्या चोपडीतून निसटलेला आणि
ऋणानुबंधाच्या जंजाळातून मुक्त असा भावबंध...
विशुद्ध, निखळ, निरागस, शहाण्या मैत्रीचा...

निरपेक्ष मैत्र... तू देशील?

रविवार, २६ जुलै, २०२०

उपसंहार...!



गेल्या चार महिन्यापासून कोरोना विषाणूच्या सावटाखाली, एकामागे एक ५ लॉकडाऊन भोगलेल्या पुणेकरांना उद्यापासून थोडा दिलासा मिळणार असला तरी, कोरोनाचे काय करायचे?’ या त्रिलोक व्यापून दशांगुळे शेष तात्कालिक प्रश्नासह, त्याच्याच अनुषंगाने काही मुलभूत प्रश्नांचा आढावा घेणे गरजेचे ठरते. या विषाणूशी लढण्यासाठी अनेक शासकीय व्यवस्था, स्वयंसेवी संस्था आणि अनेकानेक अनामिक करोना योद्धे अहोरात्र प्राणाची बाजी लावून लढत असले तरी, या विषाणूच्या अनिर्बंध फैलावाने अनेक घटनात्मक व्यवस्थांच्या आणि लोकाभिमुख संस्थापानांच्या मर्यादा उघड झाल्या’, हे सत्यही नाकारता येत नाही.

'सदरक्षणाय खलनिग्रहणाय' या ब्रीदाबरहुकुम स्वत:ला ‘अहर्निशं सेवामहे’ उपलब्ध करून देणारे पोलीस दल आणि स्वत:च्या जीवाची पर्वा न करता अखंडित आरोग्यसेवा देणारे वैद्यक, परिचारिका व त्यांचे सहाय्यक यांच्या निरपेक्ष कार्याला सलाम करून, त्यांना या परिस्थितीत ढकलणाऱ्या व्यवस्थेचे आणि त्यामागील कार्यकारण भावाचे विश्लेषण करणे आवश्यक वाटते. या विषयाच्या खोलात जातांना जागतिक अर्थकारण, भौगोलिक राजकारण, नवमूल्यव्यवस्थाधीन बाजारपेठ आणखीन भ्रामक विकासाचे घातसूत्र असे अनेक आयाम असले तरी त्या साऱ्याचा प्रस्तुत प्रकटनात अंतर्भाव न करता, व्यक्ती – समष्टी – सृष्टी यांचा मनुष्यधर्माच्या परिप्रेक्ष्यातून उहापोह करू या.

स्वत:च्या उत्कर्षासाठी, सोयीसाठी आणि सुरक्षित, आरामदायी जगण्यासाठीची धडपड अनुचित नसली तरी अशी अभिलाषा ही व्यक्तीनिष्ठ आणि परिणामी संकुचित असते. अशा स्वार्थी धडपडीने इतर कुणाचे दमन किंवा प्रसंगी नुकसानही होऊ शकते आणि या ‘इतर’मध्ये समस्त सृष्टीमधील कुणीही, अगदी ‘पर्यावरण’ही असू शकते. स्वत:च्या विलासी वास्तव्यासाठी कुणा धनिकाने बहुमजली प्रासाद बांधणे आणि समाजधनातून, सामुहिक श्रमदानातून गाडगेबाबांनी गावोगावी धर्मशाळा बांधणे यांचा तौलनिक अभ्यास केला तर हा मुद्दा सूर्यप्रकाशाइतका लख्ख समजू शकतो. अलीकडच्या कळीच्या शब्दांच्या अर्थात ‘कीवर्ड्स’च्या काळात ज्याला ‘कॉमन गुड’ म्हणतात त्याला आपल्या संस्कृतीमधील ‘वैश्विक कल्याण’ आणि त्यासाठी योग्य जीवनमूल्यांची जोपासना ही शिकवण चिरंतन आहे.

व्यक्तीनिर्माणाआधी (किंवा शिवाय) समाजधारणा अथवा राष्ट्रनिर्माण म्हणजे हलक्या प्रतीच्या तांदळाची बिरबलाची खिचडी शिजत का नाही म्हणून चिंतीत होण्यासारखे आहे. आडातच नाही तर पोहऱ्यात कुठून येणार या न्यायाने, व्यक्तीतच न रुजलेली जीवनमूल्ये समाजात कुठून येणार आणि असा मूल्यहीन (पण मौल्यवान?) समाज मनुष्यधर्माची जोपासना करून वैश्विक कल्याण साधण्यासाठी सृष्टीशी त्याची जन्मजात बांधिलकी कशी जपणार हा मूळ प्रश्न आहे. ‘समूहप्रिय’ असलेल्या माणसाने आपल्या सोयीसाठी आणि सुरक्षिततेसाठी ‘समाज’ नावाची व्यवस्था तयार केली आणि तिच्या धारणेसाठी काही नियम, कायदेकानून तयार केले असे मानले तर समस्त मनुष्यप्राण्यांचे काही समान हक्क मान्य करायला हवे. सामाजिक सुरक्षिततेच्या निकषांमध्ये केवळ दोनच मुलभूत गोष्टींचा समावेश करायचा ठरवला तरी, निरामय स्वास्थ्यपूर्ण जीवनासाठी निदान प्राथमिक आरोग्यसेवा आणि, सर्वांना समान संधी मिळावी म्हणून किमान शिक्षणसुविधा यांना अग्रक्रम मिळायलाच हवा.

प्राप्त परिस्थितीत नेमक्या याच दोन आघाड्यांवर आपण केवळ चीतपट झालेलोच नाही तर अगदीच भांबावलेलो आहोत हे त्या विषयीच्या रोजच्या बदलत्या निर्णयांमागील धरसोड वृत्तीने स्पष्ट दिसून येते. असे होण्याचे कारण हे दोन फसलेल्या नीतींचे फलित असावे काय? संकुचित लघुदृष्टी तात्कालिक योजनांमध्ये सर्वसमावेशक सर्वकालिक दूरदृष्टीच्या अभावामुळे भविष्यवेधी नियोजनातील निर्णायक त्रुटी आणि ‘शिक्षण’ या संकल्पनेच्या मुळातच अत्यंत चुकीच्या धारणेमुळे सपशेल फसलेले शिक्षणविषयक धोरण आणि त्याची तेवढीच निर्बुद्ध विध्वंसक कार्यवाही!

आजच्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या प्रवाहात आणि स्मार्ट उपकरणांच्या काळात माणसे देखील स्मार्ट व्हायला हवी असतील तर शिक्षणाचा मूळ उद्देश हा स्मार्ट होणे एवढाच असायला हवा आणि स्मार्ट असण्याचे केवळ तीन निकष पुरेसे ठरावे –

१. प्रश्न पाडणारी जिज्ञासा आणि पडलेले प्रश्न विचारण्याचे, त्यांची समर्पक उत्तरे शोधण्याचे स्वातंत्र्य,
२. सुचलेल्या उत्तरांवर, कल्पनांवर कृती करण्याची धडाडी आणि अशा कृती आराखड्यांना पोषक वातावरण,
३. आपल्या कृतीच्या समग्र परिणामांची संपूर्ण जबाबदारी स्वीकारण्याची सामाजिक बांधिलकी.

अशा प्रकारच्या तत्वनिष्ठ शिक्षणप्रणालीतून तयार झालेले युवक कुठल्याही क्षेत्रात गेले तरी स्वार्थापूर्वी (किंवा किमान स्वार्थाबरोबर तरी) समाजस्वास्थ्याचा म्हणजेच ‘यष्टी’ बरोबर ‘समष्टी’चाही विचार करतील आणि सृष्टीचे संवर्धन ओघानेच होईल. अशा तरुणांचे नियोजन हे अगदी परिपूर्ण (परफेक्ट) नसले तरी सर्वसमावेशक आणि भविष्यवेधी नक्कीच असेल. मग भले यासाठी आपल्याला एका संपूर्ण पिढीच्या परिवर्तनाची प्रतीक्षा करावी लागली तरी हरकत नाही!

आणि हो जाता जाता... कोरोनावर औषध सापडेपर्यंत, उपलब्ध साऱ्या संभाव्य उपायांचा भडिमार करण्यापेक्षा, केवळ एकच गोष्ट आपल्या हातात आहे – आपली प्रतिकारशक्ती (इम्युनिटी) वाढवणे आणि हे करण्यासाठी ज्यांनी शरीर-बुद्धी-चित्त यांना सुदृढ राखण्यासाठी कायम किमान योगसाधना केली आहे, करीत आहेत त्यांना निश्चितच धोका कमी, खरतर नगण्य आहे. तद्वतच शिक्षण, प्रशिक्षण, शिबिरे, कार्यशाळा या ‘केजी ते पिजी’च्या माध्यमातून आपण मुलांवर, युवकांवर अक्षरश: हजारो प्रकारच्या ‘ज्याला स्कोप आहे’ अशा विषय-कौशल्यांचा भडीमार करत असतो. त्या सगळ्या ऐवजी एकच अत्यंत मुलभूत कौशल्य मुलांनी वृत्तीत बाणवले तर त्यांना आयुष्यात कधीच कशाचीही उणीव भासणार नाही... ते कौशल्य म्हणजे शिकायला शिकणे (लर्निंग टू लर्न!) आजच्या तथाकथित ‘शिक्षणा’चा सारा भर हा लर्निंग (शिकणे) सोडून ‘अर्निंग’ (कमावण्यावर) आहे आणि तो मुख्यत्वे बदलेली जीवनमूल्ये, अनाठायी आदर्श आणि अत्यंत आत्मकेंद्री विचार याचा परिपाक आहे.

‘मी म्हणजे व्यक्ती हा समष्टीचा अर्थात (मानव) समूहाचा भाग आहे आणि समष्टीचा सृष्टीशी अन्योन्य संबंध असल्याने माझ्या प्रत्येक विचार-विकार आणि कृती-रीतीचा एक तदनुषंगिक सर्वव्यापी परिणाम होत असतो आणि तो ‘पूर्णात्पूर्णमुदच्यते’ न्यायाने माझ्यापासून सुरु होऊन माझ्यातच विलय पावतो आणि तरीही शिल्लक राहतो...’ ही शिकवण मानवधर्माचे मूलतत्व आहे, ते समजून घेऊन धारण करणे यात विश्वकल्याण आहे हेच अंतीम सत्य!

शुभम भवतु!

बुधवार, १ जुलै, २०२०

टाहो...!


ना नाचल्या
दिंडी पताका 
टाळ-मृदूंगाचा
स्वरही मुका,
रिंगण न धरी
फेरा म्हणून
ज्ञाना विव्हल,
उदास तुका...!

विठ्ठल नामाचा रे टाहो...!