रविवार, ५ ऑगस्ट, २०१८

मैतर...!


आपण कुठे, कसे आणि कुणाच्या पोटी जन्माला यावं हे आपल्या हातात नसतं.
जन्मामुळे आपल्याला अनेक संदर्भ चिकटतात... आणि काही नाती देखील!
यातली काही आपल्याला भावतात काही आपण निभावतो... पर्याय नसल्याने.
आपला जन्म आणि त्याबरोबर येणारे अटळ वास्तव नाही बदलू शकत आपण...

पण...
आपण कसे जगावे, कोण व्हावे, काय करावे, काय टाळावे हे नक्कीच ठरवू शकतो.
शाळा, कॉलेज पालकांनी निवडले तरी तिथे काय शिकायचे हा चॉईस असतोच.
पॅकेज कंपनीने ठरवले तरी ते स्वीकारण्या इतकाच नाकारण्याचा हक्क नसतो का?
सहचरणी ही भार्यालक्षणांमध्ये बसणारी हवी की ‘सखी’ ही निवड ‘करू’च शकतो.

मग...
आपण इथे का आहोत आणि जे करतोय ते कशासाठी हे प्रश्न उत्तरार्धातच पडावे?
जगणे एवढे गुंतागुंतीचे व्हावे की काय कमवतोय नी काय गमवतोय समजूच नये?
आपण समाधानी आहोत हे वास्तव आहे की आपणच आपली घातलेली समजूत?
बघता बघता निरोप घेण्याची वेळ येईल तेव्हा काहीच करायचे राहिलेले नसेल?

आणि...
आपली ‘शाश्वत’ मूल्ये, चिरंतन निष्ठा आणि प्राथमिकता एवढ्या कशा बदलल्या?
नात्यांचा ‘इव्हेंट’ करून साजरेपणाचे हे सोंग आणि ढोंग का लागते आपल्याला?
आयुष्याची इतिकर्तव्यता 'इएमआय' आणि त्याला पुरून उरणारे 'पॅकेज' एवढीच?
आणि मग तारुण्यात यंव करू अन त्यंव करू म्हणून मारलेल्या डिंग्या समाधिस्थ?

बघा...
आयुष्य मिळाले आहे विनासायास पण जगायचे आहे प्रयासाने, श्रेयस कमविण्यासाठी.
मनुष्य जन्म अति दुर्लभ: हे शास्त्र वचन खोटे ठरविण्यासाठी पशुतुल्य जगणे सार्थक आहे?
मी-माझे-मला या दुष्टचक्रात भिरभिरण्याने स्वत:च गर्तेत ओढणारा भोवरा तयार होतो.
ज्ञानेंद्रिये सजग आणि संवेदना जाग्या ठेवल्या म्हणजे स्वत:पलीकडचे जगही दिसू शकते.

तेव्हा...
जगण्याचे मोल कळण्यासाठी आणि करण्यासाठी जरा काचा खाली करून बाहेर बघू या...
पावसाच्या आणि तृषार्त जमिनीच्या प्रेमालापाने हिरवा शालू नेसून नटलेल्या रानवाटा...
मन उल्हसित करणारी चित्र, काव्य, गीत, संगीत किंवा कांदाभजी आणि कडक चहासुद्धा!
आणि या सगळ्याचा आनंद शतपटीने वाढविण्यासाठी आपण स्वेच्छेने निवडलेले मैतर...

अरे,
आज तो शिंचा ‘फ्रेंडशिप डे’ का काय म्हणतात तो आहे नाही का...? विसरलोच होतो की...
हे वरचे सगळे बिनकामाचे चऱ्हाट राहू दया, बघू म्हणे पुन्हा कधीतरी, नेहमीप्रमाणे...
ते ‘फ्रेंडशिप डे’चे मेसेज मात्र आठवणीने पाठवा हो... मला नको, ज्यांना ‘उमजतात’ त्यांना!
मी माणूस शोधणारा निरुप‘योगी’ माणूस, त्या शब्दबंबाळ हृदयस्पर्शी भावनांचे मला काय?

असो...
आपापल्या स्वीकारलेल्या आयुष्याच्या सोनेरी चौकटीत सुखी रहा आणि व्हॉटसप्प, फेसबुकवर दिसत रहा...
डिजिटल युगातील सुपरफास्ट लेनमध्ये स्क्रीनवर भेटण्याच्या काळात ‘फ्रेन्डशिप डे’च्या व्हर्च्यूअल  शुभेच्छा...!

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा