गुरुवार, ९ ऑगस्ट, २०१८

कागदी गाई आणि मोठी परीक्षा


एकदम लहानपणच आठवलं...
जून महिना, नवी ईयत्ता,
नवी पुस्तकं, त्यांचा तो नवाकोरा वास...
पहिल्या पावसातल्या मृद्-गंधाइतकाच विशिष्ट

आणि पिढीजात संस्कारी आप्तवाक्य...
पुस्तक म्हणजे विद्या, सरस्वती.
तरळलं डोळ्यापुढे सरस्वती – विद्याचिन्ह...
फुलल्या, नृत्यमान मोरपिसासाऱ्यासारखं.

आणि आता, एकदम स्वप्नातून पुन्हा वास्तवात...
परीक्षा हॉलमध्ये आवाज येताहेत.
असह्य..., टराटरा पानं फाडल्याचे...
जणू गाईचं आर्त हंबरणं,
अगदी शेवटचं... सरस्वतीच्या दरबारात
की विद्यारणमैदानात?

आणि जरा पहा इकडे...
हॉलच्या खिडकीखाली, पॅसेजमध्ये,
आणि मुतारीमध्ये सुद्धा...
कत्तलखान्यात रक्तमांसाचा चिखल व्हावा,
तशी पडलीत कागदी ज्ञानाची पानं, इतस्तत:
एकतर नागमोडी, लंगडी घालत, जपत,
किंवा बेदरकारपणे चिरडत चालावं लागणार!

काय गंमत आहे ना, बघा...
पवित्र कागदी गाईंना कोणीच नाहीयेत...!
ना सेवक, ना रक्षक, ना पूजक, ना भक्त.
ज्ञानपोलीस सामील मारेकऱ्यांना?
हतबल?... की पगारतृप्त?

तसं साऱ्यांना सारं ठाऊकच असतं आजकाल.
सारे होतात आंधळे – बहिरे – मुके
सारेच रहातात खुश.

पण हे व्यवहार्य चुलीत उदरभरणार्थ
बड्या घरचे पोकळ वासे घालणं आहे?
की चंगळवेदोक्त असुरी अर्थकामेष्टी यज्ञात
कागदी गाईंचा बळी दिला जातोय? 

हा प्रश्न कठीण, ही परीक्षा मोठी आहे!
-----------------------------------------
डॉ. सचिन चिंगरे, धुळे 
९४२१० ७६१४०
-----------------------------------------
आपल्या संपृक्त विश्लेषणात्मक अभिप्रायाने 'अभिजातता' विषयावरील चर्चेत घसघशीत भर घालणारे आमचे सन्मित्र डॉ. सचिन चिंगरे यांची ही आणखीन एक अभिजात रचना. माणसाने मोठे होतांना आपल्यातील मूल जपावे म्हणजे काय याचे मूर्तिमंत उदाहरण असणारे डॉक्टरसाहेब, निरंतर कुठ्ल्या ना कुठल्या विषयाचा अभ्यास आणि परीक्षा यात व्यग्र असतातच, शिवाय 'शालेय' संवेदना केवळ जपतच नाही तर खुपलेल्या प्रत्येक गोष्टीचा आपल्या विशिष्ट शैलीत खरपूस समाचारही घेतात. ग्रेस, जी.ए., नेमाडे गुरुजी यांनी जशी आपली स्वत:ची असामान्य शैली घडवली आणि जाणीवपूर्वक जोपासली तद्वतच आमचे मित्र आधीच समृद्ध असलेल्या मराठी भाषेला आपल्या अलौकिक प्रतिभेने नवनवीन पैलू पाडतात. 

अन्यथा 'आप्तवाक्य', 'नृत्यमान', 'विद्यारणमैदान', 'ज्ञानपोलीस', 'पगारतृप्त', 'चंगळवेदोक्त' किंवा 'अर्थकामेष्टी' असल्या 'उत्क्रांत' विशेषणांचा 'समास' सोडविण्याची 'संधी' रसिकांना मिळती ना...!

अजूनही आपल्या संवेदना आणि विवेक जागी असणारी आणि आपल्या भावना अत्यंत समर्थ शब्दात व्यक्त करणारी माणसे भवती असणं हे नशीब आणि ते आपले सखे सवंगडी असणं यापरते 'पुरुषस्य भाग्यं' ते काय... नाही का?

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा