शनिवार, ८ डिसेंबर, २०१८

माती...!

आमचे जळगावचे स्नेही-सुहृद, शुभचिंतक परममित्र आणि प्रेरणास्थान 'टिकटिक'कार श्री. प्रदीप रस्से सर हे खरे गोताखोर रत्नपारखी आहेत. रोज सकाळी हा गृहस्थ कुठल्या जगात फेरफटका मारून येतो आणि त्याच्या 'सुभग विश्वाच्या' पदरात त्याने वेचलेली फुले, मौक्तिके, स्वर आणि गंध, कधी एकादशी देवीच्या सुबक आणि मोहक मूर्तीच्या माध्यमातून तर कधी स्वतःच टिपलेल्या एखाद्या बालिकेच्या तन्मय मुद्रेतून आणि एरवी त्याच्या, मेंदूला फार झिणझिण्या न आणता थेट हृदयाला भिडणाऱ्या शब्दातून टिकटिकत असतो. रस्से सरांच्या या अद्भुत नित्योपासनेने आम्ही अचंबित आणि प्रभावित आहोतच, तेवढे पुरेसे नाही म्हणून हे महाशय कधी कधी असे काही शोधून आणून पदरात घालतात की वाचणाऱ्यानेही 'दुबळी माझी झोळी' म्हणत लिहायला प्रवृत्त व्हावे. बाय द वे, 'प्रवृत्त करणे' आणि 'भडकावणे' यामध्ये 'भाविक' आणि 'भक्त' यात असतो तोच फरक आहे... तंतोतंत! हे आपले उगाच पॉलिटिकली करेक्ट असावे म्हणून... असो!

आज रस्से सरांनी 'रोज मिलिगन' या कवयित्रीची अभिजाततेच्या सर्व निकषांना पार करून दशांगुळे उरणारी अत्यंत दार्शनिक तथा विचक्षण कविता 'DUST IF YOU MUST' शेअर केली आणि तिची आशयघनता, हृदयस्पर्शी मांडणी आणि शाश्वत विचार मनाला इतका भावला की हा भाव मराठीत आलाच पाहिजे या उर्मीने, 'रोज'च्या अथवा रस्से सरांच्या परवानगीशिवायच, हा मुक्त भावानुवाद उमटला. मूळ कवयित्री बद्दल फारशी माहिती माहितीजालावर उपलब्ध नसली तरी ती जिथे असेल तिथे तिची क्षमा मागून आणि रस्से सरांचे अधिकच ऋणाईत होऊन हे क्षणभंगुर जीवनावरील अनुवादित भाष्य आपल्या सर्वांच्या जाणिवांसाठी सादर...


मातीच करायची आयुष्याची जरूर करा, पण येऊ दे काही आतुनही
रंगवता येते चित्र इंद्रधनुषी रंगाने नी करता येते हितगूज पत्रातुनही!
बनवता येतो साजूक तुपातला शिरा अन लावता येते बकुळीचे रोप
अपुऱ्या इच्छांमागे धावतांना का ओढवावा फुलत्या क्षणांचा कोप?

मातीच करायची आयुष्याची जरूर करा, पण वेळेचही ठेवा भान
चढायचेत डोंगर ओलांडून नद्या आणि ते पहा वाट पाहतेय रान!
गोंजारावे स्वर जे आले भेटी, भरून घ्यावे शब्दनाद श्वासातून
सजवावे जगणे मैत्रीच्या कोंदणात, उद्धारावे मानव्य ऱ्हासातून!

मातीच करायची आयुष्याची जरूर करा, पण जगण्याचीही ऐका साद
सूर्यबिंब उगवावे डोळ्यात कधी लागावा कधी भणाणऱ्या वाऱ्याचा नाद!
कवडसे उन्हाचे सुखविणारे, पाऊस देत सृजनाची ग्वाही
आला क्षण गेला क्षण हाच क्षण फिरुनी पुन्हा येणार नाही!

मातीच करायची आयुष्याची जरूर करा, पण हे देखील लक्षात ठेवा
संध्या छाया भिवविती हृदया हे प्राक्तन कुणालाच चुकत नाही देवा!
जन्माबरोबर प्रत्येकाचे सूर्य मावळण्याइतके निश्चित आहे जाणे
मातीच होईल आयुष्याची अन कापरासारखे उडून जाईल गाणे!




या निमित्ताने, पुण्यातील 'श्री शिवाजी प्रिपरेटरी मिलिटरी स्कूल'च्या प्रांगणात उभारलेला शिवाजी महाराजांचा ब्राँझमध्ये घडविलेला अश्वारूढ पुतळा घडविणारे आणि ‘एका पुतळ्याची आत्मकथा’ या आपल्या लेखात या पुतळ्याच्या जन्माची रंजक कहाणी सांगणारे महाराष्ट्राचे पद्मश्री शिल्पकार विनायक पांडुरंग करमरकर अर्थात नानासाहेब करमरकर यांचा एक किस्सा ऐकला होता, तो आठवला.

नानासाहेबांकडे एक ‘शिष्ट’मंडळ त्यांना हव्या असलेल्या कुठल्याशा पुतळ्याच्या कामासंबंधी बोलणी करण्यासाठी गेले. नानासाहेबांनी पुतळ्याच्या तपशिलाचा अदमास घेवून काही रक्कम शिल्प बनविण्याचे शुल्क म्हणून सांगितली. शिष्टमंडळातील एका ‘विशिष्ट’ व्यक्तीला ही रक्कम खूप जास्त वाटल्याने त्यांनी थोडी सखोल चौकशी करण्याच्या मिषाने नानासाहेबांना विचारले, ‘नेमके असे काय विशेष साहित्य अन वेळ लागणार आहे पुतळा बनवायला?’ त्यावर नानासाहेब उत्तरले, ‘बाकी साहित्य आणि माझ्या वेळेचे शंभरातले १० रुपये पण पुतळ्यासाठी लागणाऱ्या मातीचे शंभरातले ९० रुपये!’ जिज्ञासू म्हणाले, ‘अशी कुठली खास माती वापरणार आहात जिची किंमत ९०% आहे?’ पद्मश्री नानासाहेब सहजभावाने उद्गारले, ‘तीच जी मी आजवर माझ्या आयुष्याची केली...!’ पुढील तपशील ज्ञात नाही...

असो. हा मातीचा महिमा आज रस्से सरांच्या ‘टिकटिक’ आणि ‘रोज’ च्या ‘Dust if you must च्या निमित्ताने!

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा