रविवार, १६ डिसेंबर, २०१८

अपराजित...?



त्या धनुर्धराला आपल्या धनुर्विद्येचा दुराभिमान होता. अनेक स्पर्धा जिंकत आणि अनेक धनुर्धरांना धूळ चारत तो एका गुरुकुलात पोहचला. आश्रमाच्या कुलगुरूंनी आपल्या पर्णकुटीत त्याचे यथोचित आदरातिथ्य केले आणि ख्यालीखुशाली विचारली. गुरूंच्या क्षमतेबद्दल अनभिज्ञ असलेल्या धनुर्धराने आपल्याच गुर्मीत आपल्या धनुर्विद्येची महती गर्विष्ठ भावाने गुरूंना सांगितली आणि त्यांनी स्वत: त्याच्या अलौकिक कौशल्याची प्रचीती घ्यावी म्हणून आग्रह धरला. ‘अतिथी देवो भव’ या संस्कृतीचे पाईक असलेल्या गुरूंनी त्याचा बालहट्ट पूर्ण करावा म्हणून त्याच्या कौशल्याचा नमुना बघायची तयारी दर्शवली.

धनुर्धराने आपले दोन्ही पाय जमिनीवर घट्ट रोवले, योग्य ती स्थिती घेतली आणि आकर्ण प्रत्यंचा ओढून एक बाण दूरवर झाडाच्या दिशेने सोडला. वायुवेगाने हवा कापीत तो बाण सरळ रेषेत झाडाच्या बुंध्यात मधोमध रुतला आणि धनुर्धराने विजयी मुद्रेने सभोवार नजर फिरवली. आश्रमातल्या विद्यार्थ्यांच्या नजरेतले कौतुक त्याला सुखावून गेले आणि आपल्या पुढील कृतीने त्यांच्या चेहऱ्यावर उमटणारा विस्मयचकित भाव पाहण्यासाठी तो अधीर झाला. त्याने दुसरा बाण प्रत्यंचेला लावला, नेम साधला आणि पुन्हा एकदा प्रत्यंचा आकर्ण ताणून बाण सोडला. या सणसणीत बाणाने झाडाच्या बुंध्यात रुतलेल्या बाणाचा मधोमध वेध घेवून, त्याच्या चिरफळ्या उडवीत त्याच्या जागी आपले टोक झाडाच्या बुंध्यात त्याच ठिकाणी रुतवले!

चोहोबाजूंनी युवा धनुर्धारंनी हर्षातिरेकाने चित्कार केले आणि धनुर्धराच्या या अतुलनीय कौशल्याने सारा आश्रम मंत्रमुग्ध झाला, भारावून गेला. जो तो ‘आपण आजवर असा श्रेष्ठ धनुर्धर कधी बघीतलाच नाही’ याचा निर्वाळा देवू लागला. या सर्वत्र कौतुकवर्षावाने मूळचा गर्विष्ठच असलेला तो धनुर्धर अधिकच मदमस्त झाला आणि त्याने सभोवार मग्रूर नजर फिरवीत विचारले, ‘आहे इथे कुणी असा धनुर्धर जो माझ्या या कौशल्याची बरोबरी करू शकेल, मला हरवू शकेल...?’ सर्व दर्शक स्तब्ध झाले, कुणालाच काही सुचेना. या सर्व घडामोडींचे मूक दर्शक असलेले आणि कुणाच्याच कुठल्याच कृतीने कणभरही विचलित न झालेले कुलगुरू आपल्या स्थानावरून उठले आणि त्यांनी धनुर्धराला आपल्या बरोबर चलण्याची खूण केली. आश्रमवासियांना चकित अवस्थेत सोडून धनुर्धर गुरूंच्या मागोमाग, थोड्या अपेक्षेने आणि बऱ्याचशा उत्सुकतेने, चालू लागला.

आश्रम मागे सोडून कुलगुरू डोंगराच्या दिशेने चालू लागले आणि धनुर्धर त्यांच्या मागे निघाला. डोंगरावर बऱ्याच उंचावर गेल्यावर त्याने बघितले की गुरु एका भल्या मोठ्या घळीपाशी थांबले आहेत जीची लांबी-रुंदी आणि खोली एखाद्या प्रवराइतकी भासते आहे. या खोल घळीच्या वर पलीकडे जाण्यासाठी एक अत्यंत जीर्णशीर्ण झालेला दोरीचा पूल बांधला आहे आणि हवेच्या हलक्याशा झोताने देखील तो पूल सर्व दिशांनी हिंदकळतो आहे, हेलकावे खातो आहे. गुरूंनी अत्यंत शांतपणे त्या अत्यंत धोकादायक भासणाऱ्या, वाऱ्याबरोबर भेलकांडणाऱ्या जर्जर अशा दोरीच्या पुलावर आपले पाय रोवले आहेत आणि क्षणार्धात ते स्थिर, निश्चल उभे आहेत. गुरूंनी एका संथ पण अखंड लयीत धनुष्य उंचावले, भात्यातून बाण काढून प्रत्यंचा ओढली, बाण लावला आणि डोळ्याचे पाते लवण्याच्या आत गुरूंच्या धनुष्यातून सुटलेला बाण वेगाने घोंगावणाऱ्या वाऱ्याचा प्रवाह तप्त सुरीप्रमाणे कापीत दूरवरच्या झाडाच्या बुंध्यात मधोमध रुतला आहे आणि त्याच्या प्रवासाचा नाद वातावरणात गुंजतो आहे! पुलावरून सावकाश जमिनीवर परतलेल्या गुरूंनी धनुर्धराला म्हटले,
‘आता तुझी पाळी...’

आपण जे बघितले त्याच्या धक्क्यातून अजूनही न सावरलेल्या धनुर्धाराने विस्फारित नजरेने आणि पांढऱ्या पडलेल्या चेहऱ्याने जोरजोरात नकारार्थी मान हलवली आणि त्या घळीच्या खोलीने गर्भगळीत झालेल्या तरुण धनुर्धराच्या अवस्थेबद्दल सहानुभूती दर्शवत कुलगुरू अत्यंत सौम्य, स्निग्ध आणि निरहंकारी स्वरात म्हणाले,
‘मित्रा, धनुर्विद्येत तु निष्णात आहेस हे नि:संशय तथापि बाण सोडतांनाची एकाग्रता आणि दृढता ज्या मनोनिग्रहाने येते त्या चंचल मनावर अजून तुला बरेच काम करायचे आहे असे दिसते! हे धनुर्धरा, तुझ्या हिताची एक गोष्ट सांगतो ती लक्षपूर्वक ऐक – मनुष्यात जोवर जिज्ञासा, नम्रता आणि शिकण्याची वृत्ती शाबित असते तोवर त्याचा समग्र विकास होत असतो; तथापि ज्या क्षणी 'मी अजिंक्य, अभेद्य तथा सर्वश्रेष्ठ असल्याने अपराजित आहे' असा गर्व, असा दंभ उत्पन्न होतो ती त्याच्या विलयाची नांदी असते...! ’

[अस्वीकृती नव्हे, खुलासा – मला अत्यंत प्रिय असलेल्या झेन कथांमधील एका अतिशय मार्मिक आणि ‘भेदक’ अशा या बोधकथेचा, माझ्या प्रकटन मर्यादेत राहून मला जमला आणि भावला तसा हा मुक्त भावानुवाद असून मूळ कल्पनेचे श्रेय झेन सिद्धांताचेच आहे. आज मला पुन्हा एकदा रस्से सरांच्या ‘टिकटिक’मधील सुयश पटवर्धन यांच्या झेन संबंधीत ‘अनुभूती’च्या वर्णनाने हे लिहिण्याची प्रेरणा मिळाली त्यामुळे त्यांचे पुन्हा एकदा आभार आणि या बोधकथेचा कुठल्याही राजकीय, सामाजिक वर्तमानाशी किंवा सांप्रत शैक्षणिक अथवा संपादकीय घडामोडीशी दुरान्वयाने देखील संबंध नाही व तसा आढळल्यास तो निव्वळ योगायोग समजावा!]

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा