शनिवार, २९ डिसेंबर, २०१८

(अ)व्यवस्था...!


ही मला म्हणाली, ‘आपले पूर्वज आपल्यापेक्षा नक्कीच पुढारलेले होते!’
मी म्हणालो, ‘नि:संशय, उगाच का त्यांनी एवढे भव्यदिव्य निर्माण केले!’
ही म्हणाली, ‘आज एवढ्या आधुनिक तंत्रविज्ञानाने देखील ते का शक्य नाही?’
मी म्हणालो...

‘कारण तेव्हा विचार-आचार-व्यवहार यात शुद्धतेचा संस्कार होता.
समाजात काही व्यापारी होतेच पण व्यापाऱ्यांचाच समाज नव्हता...

प्रत्येक गोष्ट विक्रीला उपलब्ध नव्हती, काही कमवाव्याच लागायच्या आणि
ज्यांवर आपला अधिकार नाही त्या, मोह पडूनही, गमवाव्याच लागायच्या!

समग्र जगण्या-वागण्याची झाली व्यावसायिक वृत्ती नव्हती आणि
पदोपदी भेटणारी जाहिरात हीच एक अभि’व्यक्ती’ नव्हती.

लोक भेटायचे एकमेकांना कारणाशिवाय तसेच उदात्त हेतूंनीही
चर्चा घडायच्या चहासोबत आणि चहा शिवाय संवाद सेतूंनीही!

बुद्धी-प्रामाण्य-वादाच्या झडायच्या फैरी अन निघायचे काही ठराव सकल सृष्टी जगविण्याचे
'सृष्टी' संज्ञेत सारेच सामावयाचे, नव्हते विचार केवळ काही 'विशेष' मानव समूह तगविण्याचे!

सगळ्या राजकीय खेळींचा ‘बळी’ असला तरी शेतकरी औट घटकेचा का होईना ‘राजा’ होता
भ्रष्टाचार शिष्टाचार होण्याचा समाजमनावर व्रण नव्हता झाला, तो घाव अजून तसा ताजा होता!

आज विद्रोही कविताही वर्णनवादी शब्दबंबाळ पण उपाय शोधत नाही जाऊन मुळाशी खोल,
शिवारे भले जलयुक्त झाली असतील पण हरवत चालली माती धरून ठेवणारी मुळाची ओल!

अंतराळात उपग्रह सोडण्यापासून छोट्या देशांना मदत देण्याएवढा झाला आपला विकास आहे
वंचित मुले, भिकारी, बेघर, हताश शेतकरी अन बेरोजगार यांचे जगणे मात्र अजून भकास आहे!

समाजधारणेचे शुद्ध राजकारण होतांना धंद्यांच्या गणितात विकासाची गाडी नेहमीच फसते
आणि शांताबाईच्या शाळाबाह्य सोनूला व्हायरल होतांना पाहून अलेक्सा खळखळून हसते!'

एवढे प्रवचन ऐकून कंटाळलेली ही म्हणाली, ‘व्यवस्था बदलायची तर व्यवस्थेत राहून काम करा!’
मुंढेंच्या नव्याने पुनर्नियुक्तीची ताजी बातमी दाखवीत मी म्हणालो, ‘... आणि व्यवस्थेचे पाणी भरा?’

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा