सोमवार, ९ नोव्हेंबर, २०१५

पाहीजे…!

अर्धे आयुष्य सरले तरीही समज तशी कमीच आहे
जाणीवा प्रगल्भ असल्या तरीही जाण मला कमी आहे
'स्व'त्वाचा घोटून गळा, नाती सारी जपली पाहीजे
संवेदना मारून साऱ्या, दुनियादारी शिकली पाहीजे…

धार शब्दाला असली तरीही मनात प्रेमाचा आसरा आहे
राग रक्तात असला तरीही पिंडात क्षमेचा निवारा आहे
शब्दच नेहमी घात करतात, हे ध्यानात ठेवले पाहिजे
शब्दच्छल टाळून सारे, मौनात रहाण्या शिकले पाहीजे…

मनाच्या आत जे जे, तेच सारे बाहेर आहे
जगण्या-दाखवण्याचा चेहरा माझा एक आहे
करून मन मोठे, रित इथली जपली पाहीजे
कोंडून आतला आवाज, दांभिक होणे शिकले पाहीजे…

- दिनेश चंद्रात्रे, धुळे 


यंदाची दिवाळी बऱ्याच अर्थाने वेगळी आणि विशेष ठरणार हे निश्चित! मित्रांच्या भेटीगाठी आणि त्यांच्या सोबत बहरलेला क्षण अन क्षण (याला 'क्वालिटी टाइम' म्हणण्याचे फॅड आहे!) यापेक्षा वेगळा उत्सव, सोहळा किंवा मुहूर्त मला कधीही अभिप्रेत नव्हता, नाही आणि नसेल. दिवाळीच्या तोंडावरच सुहृदांची हृद्य (!) संगतच माझं आयुष्य काही वर्षांनी वाढवून गेली होती, त्यात सन्मित्र दिनेशने, माझ्या त्याच्याशी निरंतर चालू असलेल्या प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष संवादातून जाणीवपूर्वक सहवेदनांनी टिपलेली स्पंदने, इतक्या समर्पक, प्रत्ययकारी आणि तंतोतंत काव्यात्म अभिव्यक्तीत शब्दबद्ध केली आहेत की त्यायोगे एका दगडात चार पक्षी उडाले ('मारले' वगैरे कविमनाला पचायला जरा जडंच!), ते असे -

१. मी यापुढे, आत्मकथन वगैरे तर दूर, कविताही करायची गरज नाही इतक्या नेमक्या आणि नेटक्या शब्दात दिनाने माझा आजवरचा जीवनपट आणि अवस्था उलगडली आहे. ('मांडली' म्हणणार होतो पण माझी अवस्था गुंतागुंतीची असल्याने 'उलगडली' जास्त सयुक्तिक आहे…!)
२. माझ्या आजवरच्या 'कोहSम' च्या प्रवासाचे इतके मुद्देसूद तथा आकलनीय ('सुलभ' शब्दाला विनाकारणच भलतेच परिमाण प्राप्त झालेय… निचऱ्याशीच संबंधित असले तरी नकोच ते!) निरुपण माझ्यासह कुणालाही जमलेले नाही आणि जमेलसे वाटत नाही. आता फक्त त्यातले जे जे करायला 'पाहीजे' ते किती साधते बघायचे!
३. माझ्या अवस्थेच्या आणि अस्वस्थतेच्या निमित्ताने का असेना, दिनाने त्याची आजवरची सर्वात सुंदर काव्यनिर्मिती केली आहे! हे मी, या कवितेचा विषयवस्तू अस्मादिक असल्याने (आहे ना, दिना?) म्हणत नाहीये, तर आजवरच्या दिनाच्या काव्यप्रवासाचा मी कायमच प्रथम वाचक, नि:स्पृह रसिक, विचक्षण समीक्षक आणि खंदा समर्थक राहिलो असल्याने माझ्याहून जास्त हे कुणी खात्रीपूर्वक सांगू शकत नाही.
४. आणि शेवटी, मला स्वछ प्रतीवर्ती आरसा दाखवून त्याबरोबरच मेक-ओव्हरची सडेतोड रेसिपीही सांगणारे हे 'हित'-गूज, सर्वांशी शेयर केल्याने इतरही अनेक 'तू भ्रमत आहासी वाया' अशा नि:श्राप जीवांना यायोगे स्व-प्रतीमेवरचे मळभ दूर होऊन तेजोत्सावाच्या मुहूर्तावर प्रकाश दिसेल अशी आशा…

दिनाचे आभार मानावे अशा असंख्य गोष्टी आहेत पण आभार'प्रदर्शना'ला उपचाराचे ओझे असते तर अव्यक्त ऋणांना शेवरीचा स्पर्श…! तेव्हा तत्सम काही न व्यक्तता 'गेले द्यायचे राहूनी…' ही हुरहूर मला जास्त प्रिय आहे… इतकेच! शुभम भवतु…

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा